अध्याय १२ : भक्ती योग
पार्थ म्हणे रे सांग माधवा ।
योगी श्रेष्ठ कि भक्त केशवा ।
व्यक्तमयी अव्यक्त मांडिती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।१।।
स्थिरबुद्धी माझिया रूपाशी ।
नित्ययुक्त सश्रद्ध मनाशी ।
उपासती ते मला पावती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।२।।
समानदृष्टी गात्र संयमी ।
आत्मचिंतनी अंतर्यामी ।
तेही अंती मला पावती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।३।।
इंद्रिय अतित अचल स्थिर आत्मा ।
सर्वव्याप्त अविकारी अजन्मा ।
भजती तया ते मजसी मिळती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।४।।
निर्विशेष तत्वास पूजती ।
सर्वभूतहित मग्न राहती ।
अंती प्राप्त ते मजसी होती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।। ५।।
निर्गुणरूप मनी आस जयाला ।
दु:ख क्लेश यातना तयाला ।
देही या मार्गात कष्टती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।६।।
सर्व कर्म जे मला अर्पिती ।
अनन्यभावे करिती भक्ती ।
सर्वकाळ ते मलाच भजती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।७।।
मृत्युमयी संसार सागरी ।
ध्यान असे माझेच अंतरी ।
संसारी ते या उद्धरिती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।८।।
मन बुद्धी स्थिर माझ्या ठायी ।
शरण येई जो माझ्या पायी ।
नि:संशय मज येउन मिळती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।९।।
मना स्थिर जर जमे न करणे ।
भक्तिमार्ग सोपा आचरणे ।
भक्तीने जन मला जिंकिती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।। १०।।
भक्तीचा जर ध्यास जमेना ।
अर्पण कर्म करी मज ना ना ।
कार्मार्पण करुनी मज मिळसी ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।११।।
ज्ञानज श्रेष्ठ अभ्यासापरते ।
ध्यान सरस परी ज्ञानापरते ।
सर्वश्रेष्ठ फलत्याग मानिती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।१२।।
कर्मफलासी त्यागुनी ज्याने ।
मनबुद्धी स्थिर केली तयाने ।
तेथ निरंतर वसते शांती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।१३।।
द्वेषरहित प्रिय जगन्मित्र जो ।
क्षमाशील सुखदु:ख रहित तो ।
मनात करुणा निर्मम शांती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।१४।।
दृढनिश्चयी विरागी योगी ।
मन बुद्धी अर्पित अनुरागी ।
असे भक्त प्रियतम मज होती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।१५।।
मनात हो उद्विग्न कधी ना ।
कधी कुणा उद्विग्न करी ना ।
हर्ष खेद सम चिंता मुक्ती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।१६।।
शुचिर्दक्ष निरपेक्ष विमुक्त ।
सर्वकर्मफलत्यागी विरक्त ।
प्रिय मम भक्त तयांची भक्ती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।। १७।।
मान कधी अपमान घडो वा ।
मित्र अरी सम उन गारवा ।
समान त्यांसी भक्त मानिती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।१८।।
स्तुती कुणी वा करोत निंदा ।
संगरहित संतुष्ट सर्वदा ।
गृहचिंता नच तयास भीती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।१९।।
भक्तिमार्ग हा जे अनुसरती ।
धर्मामृत ते मुक्त प्राशिती ।
तयावरी मम अतीव प्रीती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।२०।।
भक्तीच्या जे पुरात न्हाती ।
काय वाचे मनात भजती ।
कर्म हरिच हरी विश्रांती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।२१।।
भरुनि प्रपंची हरी रहावा ।
परमार्थीही हरी पहावा ।
हरीच शक्ती मुक्ती भक्ती ।
भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।२२।।
राजेंद्र (?)
२८ नोव्हेंबर २०००