अध्याय : १५ पुरुषोत्तम योग
मधुसूदन हा पूर्ण पुरुष अवतरला ।
पुरुषोत्तम नामे योग सार्थ उलगडला ।।
अश्वत्थ असा हा वृक्ष श्रुती वेदांचा ।
गगनात मुले संभार खाली शाखांचा ।
अगणित छंदपर्णांनी ऐसा नटला ।
जाणिता तयाला वेद अर्थ हा कळला ।।१।।
चहूकडे पसरती शाखा वरती खाली ।
विषयांच्या फांद्या आसक्तीच्या वेली ।
ही सकाम कर्मे अडकविती मनुजाला ।
आसक्तीने तो सदा बांधला गेला ।। २।।
ना आदि दिसे न अंत दिसे वृक्षाचा ।
ना रूप दिसे आधार दिसे न त्याचा ।
त्या अश्वत्थाच्या मुळी घाव हा घाला ।
कर नि:संगाचे शस्त्र छेदणे त्याला ।।३।।
तो वृक्ष छेदिता स्थानी ऐशा जाणे ।
की तिथे जाऊनी पुन्हा न मागे फिरणे ।
ही परासृष्टी जन्मास घालिता झाला ।
जा शरण शरण त्या आद्य परमपुरुषाला ।।४।।
अभिमान रहित जे त्यजती खोटी प्रतिष्ठा ।
जे मोहजीत अध्यात्म ज्यांची निष्ठा ।
सुखदु:ख द्वंद्व टाकुनी संगदोषाला ।
शरणागत होऊनी जाती निजधामाला ।।५।।
ना सूर्य अनल ना चंद्र प्रकाशी त्याला ।
त्या स्वयंप्रकाशी धामाला जो गेला ।
तो पुन्हा न दिसला या भौतिक सृष्टीला ।
भवसागर तरला पूर्णब्रह्म तो झाला ।।६।।
माझेच अंश हे कृष्ण म्हणे जगतात ।
मन षड्गात्रांशी सदा युद्ध करतात ।
मायेचे झाले बंधन बद्ध जिवाला ।
तो कृष्णापासून दूर पारखा झाला ।।७।।
हा समीर जैसा अविरत वाहत जातो ।
परि गंधालाही सदा वाहुनी नेतो ।
आत्माही तैसा वही गुणदोषाला ।
तो बदलत राही नित्य जरी देहाला ।।८।।
हे नेत्र कर्ण नासिका स्पर्श अन जिव्हा ।
या पंचइंद्रिये देह नटे हा जेव्हा ।
मनस्वास्थ्याचे या अधिष्ठान मग ज्याला।
विषयात रंगुनी देह भोग जरी आला ।।९।।
हा देह पडे ज्या स्थितीत मन असताना ।
भोगतो भोग जे गुण देही वसताना ।
ना कळू शके जो अज्ञ अशा मनुजाला ।
परी खरे गुह्य आकळते ज्ञानियाला ।।१०।।
हे प्रयत्न योगी करिती जे बघण्याचा ।
ते पाहू शकती ठाव अंतरी त्याचा ।
जे विकसित नसती मुकती ते दृष्याला ।
अन यत्न करूनही बघती नच ते त्याला ।।११।।
जो जगज्जिवन सूर्यासी उष्मा देतो ।
अन चंद्रप्रकाशा परिवर्तित जो करतो ।
जो अग्नीमध्ये तेज निर्मिता झाला ।
त्या जाणून घ्यावे महातेजस्रोताला ।।१२।।
या विश्वामध्ये गोल ग्रहा अन ताऱ्या ।
जो धारण करतो कक्षा आखुन साऱ्या ।
दे चंद्र होऊनी रसमयता सृष्टीला।
तो पुष्प औषधींमध्ये भरी रसनेला ।।१३।।
वैश्वानर होऊन दीप्त करी जठराग्नी ।
ही पडे शुद्ध आहुती अशी जी यज्ञी ।
घे प्राण अपानसमान वायू मदतीला ।
पचवितो चतुर्विध अन्न धारी देहाला ।। १४।।
तो हृदयामधुनी सर्व वास करणारा ।
तो स्मृती विस्मृती ज्ञान दान करणारा ।
हे वेद निर्मिले असे जाणण्या ज्याला ।
तो ज्ञेय ज्ञान अन ज्ञाता तोची जाहला ।।१५।।
हे अक्षर आणि क्षर दो वर्ग जिवांचे ।
की लक्षण त्यांचे वर्णन करिता साचे ।
जो भौतिक जगती रमतो क्षर तो झाला ।
जो आत्मरंगी अध्यात्मी अक्षर झाला ।।१६।।
या दोन प्रकारांपलीकडे परमात्मा ।
यो अव्यय निर्गुण अविनाशी मुक्तात्मा ।
जो त्रिलोक धारणा करुनी पोसे त्याला ।
जाणणे असे या नित्य मुक्त तत्वाला ।।१७।।
तो अक्षर नाही क्षरही परि तो नाही ।
तो अरूप अजन्मा स्थितीत्रायातित राही ।
पुरुषोत्तम ऐसा वेदऋचांनी म्हटला ।
अन सर्व जगाने ईश म्हणोनी नमिला ।।१८।।
जो संशय नासुनी जाणी उत्तम पुरुषा ।
सर्वज्ञ तयाला भक्तीची अभिलाषा ।
हे गुह्य जाणुनी समजुनि घे शास्त्राला ।
हि भक्तभावना देई चार मुक्तीला ।।१९।।
मग कृष्ण म्हणे रे ऐक अर्जुना आता ।
मी सांगितले तुज गुह्य जया अनुसरता ।
तो यत्न करोनी ज्ञानवंत रे झाला ।
पुरुषोत्तम नामे योग सार्थ उलगडला ।।२०।।
राजेंद्र (?)
११ फेब्रुवारी २०११
