अध्याय १६ : दैवासुरसंपदविभाग योग ।
करिती पुढती वर्णन आता मोहन दोषगुणांचे ।
दैवी सदगुण सूरगणांचे दुर्गुण ते असुरांचे ।
जाणुनिया ते गूण जीवनी मलिन सरे चित्ताचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।१।।
निर्भय दानी सत्वशुद्ध करि चिंतन अध्यात्माचे ।
योग याग संयम चित्ताचा अनुशीलन वेदांचे ।
सत्य अहिंसा शांती व्रत सुर घेई अक्रोधाचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।२।।
नम्र असे ना दिसे कुणाचा दोष तया नेत्रांना ।
भूतदयाही वसे अंतरी दृढ तो लोभ विहीना ।
क्षमा धैर्य उत्साह बाळगी शुचितेने सुर वागे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।३।।
दूर मत्सरा करी कधी ना गणी मान अपमाना ।
मुक्त असे अभिलाषा त्यासी अडकुन टाकु शकेना ।
असे भारता वर्णन करिती सद्गुण सुरगण ज्यांचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।४।।
दुष्टवृत्ति ही असुर गणांची स्वाभाविक जन्मानी ।
उर्मट उच्छृंखल मानी अन उग्र अतिव अज्ञानी ।
दिव्य गुणांनी मोक्ष मिळे बांधतात गुण दुष्टांचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।५।।
नको काळजी तुजसी पार्था दुष्ट तू कि रे गुणी ।
दैवी तू जन्मत: तुजकडे दिव्यगुणांच्या खाणी ।
विसरून जा ही चिंता आणिक चिंतन कर युद्धाचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।६।।
वृत्ती दिसती दोन जगी असुरांची अन रे दैवी ।
वर्णन त्यांचे करितो रे लक्षणे तयांची केवी ।
कृष्ण म्हणे रे ऐक अर्जुना दोष असुर वृत्तीचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।७।।
योग्य तंऱ्हेचे कर्मच करणे अयोग्य ते टाकणे ।
असुर जनांना कळे न हे की कसे योग्य वागणे ।
सत्य शुचि अन सदाचार हे नसती गुण असुरांचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।८।।
असत्य हे जग म्हणे असुर तो ईश असा ना कोणी ।
कामेच्छेतुनि विश्व जन्मते नसे नियंता कोणी ।
असुर मानिना कारण काही इतर सृष्टि सृजनाचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।९।।
दृष्टिकोन हा स्वीकारुनिया असुर वागतो जगती ।
अविचाराने अल्पबुद्धिने विनाश ते ओढविती ।
उग्रकर्म ते करिति परंतू अहित होई जगताचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।१०।।
काम तृप्त ना कधी होतसे मदांध या असुरांचा ।
मोहित होऊनि असतवृत्तीने दंभ वाढतो त्यांचा ।
अशुद्ध अविचारी व्रत घेउनि जीवन जगणे त्यांचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।११।।
इंद्रियतृप्ती हीच संस्कृती मानित जे मनुजाला ।
अमर्याद भय चिंता ग्रासे आमरणांत तयाला ।
कामभोग लालसेत सरते जीवन व्यर्थ तयांचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।१२।।
काम क्रोध आहारी जाती सुचे न दुसरे काही ।
इच्छाकांक्षा मनी शेकडो तयात अडकुन राही ।
इंद्रियतृप्तीकरिता साठे धनही अन्यायाचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।१३।।
असुरा वाटे जे धन माझे त्याची वृद्धी व्हावी ।
वृद्धिंगत श्रीमंती माझी सदैव होत राहावी ।
पैशाची ही हाव सुटेना व्यसन लागते त्याचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।१४।।
शत्रुंना हरविले तयांना पूर्ण नष्ट मी केले ।
बलाढ्य होऊनि मीच सुखाचे ईशपद प्राप्तचि केले ।
असुर म्हणे मी सिद्धि भोगतो कारण मीच तयाचे।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।१५।।
वाटे असुरा गर्व जीवनी सगे सोयरे माझे ।
माझ्यासरिसा कोण असे की सुखमय जीवन ज्याचे ।
दान यज्ञ माझ्याने घडते ज्ञान अज्ञ असुरांचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।१६।।
अनेक चिंता भ्रांती यांनी फसती विमोह जाली ।
इंद्रियभोगामध्ये बुडते वृत्ती तिन्ही त्रिकाळी ।
अशुद्ध कामासक्ती उघडी तया द्वार नरकाचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।१७।।
सर्वश्रेष्ठ मानिती स्वत:ला उद्धट धन सत्तेने ।
यज्ञ असुर करती ते होती पूर्णतया दंभाने ।
विधिविधाने टाकून त्यांचे यज्ञहि अहंपणाचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।१८।।
अहंकार बल गर्व काम क्रोधाचा आश्रय घेती ।
द्वेष असुर करितो देवाचा देही त्याचिच वसती ।
धर्माची ते करिती निंदा असुरी प्रवृत्तीचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।१९।।
क्रूर नराधम असुर वृत्तिचे तया टाकि नरकात ।
असुरी योनी हाच नरक असुरास टाकितो त्यात ।
असुर योनी हे अंतिम ठरते चिरस्थान असुरांचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।२०।।
असे असुर जे जन्मो जन्मी असुर योनिसी येती ।
हळू हळू ते पतन पावती अधिक अधम ते होती ।
असे अधम ना कधीच मिळती मलाच येउन साचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।२१।।
क्रोध मोह लोभाची दारे तीन अशी नरकाची ।
बुद्धिमान जो त्यजे तयां हत्यारे विनाशाकाची ।
क्रोध मोह लोभाचे ठरते आकर्षण घाताचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।२२।।
क्रोध मोह लोभतुन सुटला सद्भागी या जन्मी ।
कर्म करी ऐसे तो होई अत्मोन्नत सत्कर्मी ।
साधन होता मिळे सद्गती स्थान मिळे मोक्षाचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।२३।।
शात्रविधीसी टाकुनि जो अत्यंत वा गतो लहरी ।
त्यास सिद्धि ना मिळे गती ना सुख न बाह्यांतरी ।
असुरी वृत्ती टाकुनी करणे कर्म स्वत:चे साचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।२४।।
फरक जाणुनी कार्याकार्यी वर्ते शास्त्राधारे ।
शास्त्रविधाने जाणुनि कर्मा करीत जो निर्धारे ।
हळू हळू उन्नती साधते सत्य वचन कृष्णाचे ।
दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।२५।।
राजेंद्र (?)
१९ फेब्रुवारी २०११
