भगवद्गीता अध्याय १३ : क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग
कैसे प्रकृती पुरुष ज्ञान ज्ञेय क्षेत्रज्ञाचे ।
क्षेत्र काय ते केशवा पार्थ म्हणे सांग साचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।१।।
क्षेत्र अपुलीच काया हेचि जाणी रे कौंतेया ।
हेचि जाणी तो क्षेत्रज्ञ ऐसे मत ज्ञानियांचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।२।।
सर्व क्षेत्री मी क्षेत्रज्ञ जाण ऐसे रे भारता ।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे हेचि ज्ञान असे साचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।३।।
क्षेत्र काय कैसा होई याच क्षेत्रात विकार ।
कोण प्रभावे तयासी म्हणे कृष्ण ऐक साचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।४।।
गीती ऋषींनी गाइले किती छंदात गोविले ।
ब्रह्मसुत्रात मांडिले हेतू परिणाम यांचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।५।।
अहंकार महाभूते बुद्धी अव्यक्त सांगाती ।
मन आणि पंचेंद्रिय पाच विषय तयांचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।६।।
इच्छा द्वेष सुख दु:ख धैर्य चेतना समुह ।
सर्व विकार सहित घडे स्वरुप क्षेत्राचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।७।।
अमानित्व दंभाभाव क्षान्ति अहिंसा आर्जव ।
गुरूपासना शुचिता स्थैर्य आत्मानिग्रहाचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।८।।
इंद्रियांच्या भोगांहूनी दूर विरागी विनम्र ।
जन्म मृत्यू जरा व्याधी दु:ख पाहुनी दोषांचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।९।।
पुत्र पत्नीची गृहाची सोडी कामना मनात
जरी घडे बुरे भले नित्य सम चित्त त्याचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।१०।।
भक्ती अनन्य अखंड मजचरणी जडली ।
सेवी एकांत निर्जन मन सदाकाळी ज्याचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।११।।
ज्ञान नित्य अध्यात्माचे ज्ञान यथार्थ तत्वाचे ।
बाकी अज्ञान केवळ हेचि ज्ञान ठरे साचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।१२।।
आता वर्णी मी जे ज्ञान असे अमृताची खाण ।
सतासताच्या पल्याड माझ्या स्वाधीन ब्रह्माचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।१३।।
हात पाय नेत्र मुखे कान व्यापिले सर्वत्र ।
तैसे व्यापुनी अस्तित्व राही रूप परेशाचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।१४।।
सर्वेन्द्रियांचा निर्माता असे इंद्रिया रहित ।
अनासक्त हा निर्गुण भोगी गुण सगुणाचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।१५।।
आतबाहेर सर्वत्र प्राणीमात्रात व्यापले ।
सूक्ष्म तत्व अज्ञेय जे दूर भासे अंतरीचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।१६।।
भिन्न जीवांमध्ये एक अविभक्तचि कोंडिले ।
ज्ञेय निर्मिते पाळीते कार्य करी संहाराचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।१७।।
सर्व तेजाचा तो स्रोत अंधकाराच्या अतीत ।
ज्ञेय ज्ञान ज्ञानधेय स्थान हृदयात त्याचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।१८।।
ज्ञेय ज्ञान सांगितले क्षेत्र संक्षेपी वर्णिले ।
जाणे भक्त हेचि तया मिळे मर्म मद्भावाचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।१९।।
असे पुरुष प्रकृती दोघे जाण रे अनादि ।
गुण आणिक विकार पुत्र दोन्ही प्रकृतीचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।२०।।
कार्य कारण सगळे घडे प्रकृती कर्तृत्वे ।
जीवा स्वातंत्र्य केवळ सुख दु:ख भोगण्याचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।२१।।
त्रिगुणांच्या साधनांनी जीव भोगी प्रकृतीसी ।
संग घडे ज्या गुणांचा फेरे तैसेचि योनींचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।२२।।
राही स्वामी महेश्वर साक्षी अंतरी सर्वांच्या ।
तोचि अनुमती देई भोग भोगण्या देहाचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।२३।।
जाणे पुरुष निर्गुण नसे प्रकृती यापरी ।
असो वर्तमान काही पुनर्जन्म ना तयाचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।२४।।
कोणी ध्यानात पाहतो कोणी चित्तात शोधतो ।
कोणी योगाने चर्चेने कर्म निष्काम कुणाचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।२५।।
अज्ञ करी उपासना कुणा पाहुनी थोरासी ।
श्रुतीपारायण करी पार मुक्काम मृत्यूचे ।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।२६।।
काही स्थिर काही चर जे जे दिसते विश्वात ।
क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोग आहे कारण तयाचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।२७।।
एक परमेश राही सर्व जीवात समान ।
अविनाशी हा नश्वर तया पाही पाही साचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।२८।।
जो जो पाहतो सर्वत्र समस्थितीत ईश्वर ।
अधोगती टाळी तोचि उच्च गतीशी पोहोचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।२९।।
कर्मे करते शरीर आत आत्मा राही स्थिर ।
पाही तया साक्षित्वाने रूप यथार्थ आत्म्याचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।३०।।
वेगवेगळ्या शरीरी ब्रह्म एकचि राहते ।
नसे विस्तार क्षेत्रांचा कळे तया ब्रह्म साचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।३१।।
दिव्य शाश्वत हा आत्मा पार्था त्रिगुण अतीत ।
असे अलिप्त शरीरी नसे कर्म काही त्याचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।३२।।
सृष्टी व्यापून राहते परी अलिप्त आकाश।
तैसा आत्माही अलिप्त घर करुनी देहाचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।३३।।
एक रवि हा पुरेसा उजळी तो पूर्ण सृष्टी ।
तैसा उजळी भारता आत्मा घट हे देहाचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।३४।।
भेद क्षेत्र क्षेत्रज्ञाचा पाही ज्ञानाच्या डोळ्यांनी ।
मिळे मुक्ती साधे साध्य तया परम लक्ष्याचे ।।
ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ।।३५।।
— राजेंद्र (?) जून १३ २०१५
