अध्याय ९ : राजविद्या राजगुह्य योग
कृष्ण म्हणे पार्था । गुह्यतम अर्था ।
जनी त्या सर्वार्था । दु:ख मोक्ष ।।१।।
गूढ ऐसे ज्ञान । पवित्र निधान ।
अनुभवे जाण । धर्म सुख ।।२।।
जया होई ज्ञान । आकळे विज्ञान ।
तया मोक्ष धन । दु:ख मुक्ती ।।३।।
राजविद्या ऐसी । म्हणती तयासी ।
भक्तभाविकासी ।साह्य करी ।।४।।
अश्रद्ध पुरुषा । धर्माची न मनीषा ।
न टळे नरा तैशा । जन्म मृत्यू ।। ५।।
पाहता जगात । प्रत्येक वस्तूत ।
भरला अव्यक्त । ईश्वरची ।। ६।।
पंच महाभूत ।असती त्यात ।
परी हा अद्भुत । भूतांविणा ।।७।।
माझ्यामध्ये स्थित । नाही पंचभूत ।
जन्म स्थिती अंत । देतो जरी ।। ८।।
कल्पाच्या अंतास । भूतांचा निवास
इशाच्या पदास । होत असे ।। ९।।
आरंभी कल्पाच्या । पायासी इशाच्या ।
सर्व वस्तू साच्या । जन्मा येती ।।१०।।
पुरुष प्रकृती । संगती मिळती ।
भूतांची उत्पत्ती । तेथ होई ।।११।।
परी अनासक्त । ईश्वर अव्यक्त ।
बांधतुनी मुक्त । उदासीन ।। १२।।
बनुनी अध्यक्ष । प्रकृती परोक्ष ।
सृष्टी हि प्रत्यक्ष । जन्मा घाली ।। १३।।
भूतांचा ईश्वर । अवमानी नर ।
मानवी आकार । देऊनिया ।। १४।।
व्यर्थ त्याचे कर्म । भ्रष्ट मनोधर्म ।
त्यास ज्ञान वर्म । ना कळले ।। १५।।
दैवी साधू जन । येउनि शरण ।
करिती भजन । सर्व काळ ।। १६।।
कुणी ते एकत्वे । कुणी बहुतत्वे ।
आपुल्या परत्वे । जो तो पाही ।। १७।।
त्रिवेद पूजन । करिती यजन ।
निष्पाप सुजन । स्वर्गी येती ।। १८।।
पुण्य संचयन । संपता भोगून ।
जन्मे तो फिरून । धरेवरी ।।१९।।
अनन्य चित्ताचा । सात्विक वृत्तीचा ।
योगक्षेम त्याचा । ईश वाहे ।। २०।।
विविध रूपांची । पूजा सगुणाची ।
अंती निर्गुणाची । भक्ती घडे ।।२१।।
कुणी देवतांसी । कुणी पितरांसी ।
पाच त्या भूतांसी कुणी भजे ।।२२।।
ज्याची भक्ती जैसी । जी त्या गतीसी ।
भजे तो इशासी । मुक्त होई ।।२३।।
फळ फुल पाने । जल ही प्रेमाने ।
अर्पि जो भक्तीने । ईश्वराला ।।२४।।
युक्त पुरुषाची । अर्पण वृत्तीची ।
भेट हि भक्तीची । मान्य होई ।।२५।।
ताप दान कर्म । नित्याचे स्वधर्म ।
करावे सत्कर्म । ईशार्पण ।। २६।।
कर्म जरी हाती । अर्पण प्रवृत्ती ।
योगयुक्त मुक्ती । त्याला लाभे ।।२७।।
शुभाशुभ फळे । त्यातुनी मोकळे ।
बंधना वेगळे । कर्म होई ।। २८।।
उच्च नीच ऐसे । ईशासी ना तैसे ।
भक्त सहवासे । एक रूप ।। २९।।
असो कि पापात्मा । भजता परमात्मा ।
अन्तासि धर्मात्मा । तोही होई ।। ३०।।
कुणाही जातीचा । कुणाही वृत्तीचा ।
आश्रित ईशाचा । मुक्त होई ।। ३१।।
ईशाचे स्मरण । ईश परायण ।
ईश समर्पण । वृत्ती ठेवी ।। ३२।।
दिसे वेळोवेळा । ईश्वर सकळा ।
आयुष्य सोहळा । त्याचा झाला ।। ३३।।
राजेंद्र (?)
२५ डिसेंबर १९९९