अध्याय १४ : गुणत्रयविभागयोग
ज्ञान असे जे करी मुनींना उघडी कवाडे सिद्धीची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।धृ ।।
असे ज्ञान जे उत्तमातले उत्तम आहे सर्वांसी ।
असे ज्ञान जे सुस्थिर होता देई दिव्य अनुभूतीसी ।
ज्ञान हेच साधले जयाला तमा न सृजना विलयाची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।। १।।
रज तम सत्वाने बनलेली भौतिक सृष्टी तीन गुणी ।
जडे जीव जो प्रकृतीस तो बद्ध होतसे त्याच क्षणी ।
तीन गुणांचा अविष्कार हा दावी रचना विश्वाची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।२।।
स्फुरे ब्रह्म गर्भात सृष्टिच्या देई जन्म या जगतास ।
जीव जन्मती द्रव्य उपजती चढे स्फुरण या विश्वास ।
पिता होऊनी बीज पुरवितो करी निर्मिती योनींची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।३।।
सत्वगूण निर्मल सुखदायी प्रकाशमय अन ज्ञानमयी ।
करी मनुष्या पापमुक्त अन करी जीवना फलदायी ।
सत्व गुणांची आस परी घडविते शृंखला जन्मांची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।४।।
तृष्णेचा अन कामुकतेचा रजोगूण हा पुत्र असे ।
महानतेच्या आकांशेने सकाम कर्मी व्यग्र असे ।
रजोगुणांचा प्रभाव जोडी प्रीत पुत्र अन दारेची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।। ५।।
प्रमाद घडणे आळस करणे वेळ जाई तो निद्रेत ।
तमोगुणाची हीच लक्षणे बद्ध जीवांसी करतात ।
अधोगतीचा मार्ग हाच येतसे अवस्था दैन्याची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।। ६।।
परमसुखासी सत्व बांधितो गुरफटतो रज कर्मात।
विन्मुख ज्ञानापासुनी करुनी तम रत होई मुर्खात ।
विविध रुपातुनी व्यक्त होतसे वृत्ती रज तम सत्वाची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।। ७।।
चक्र चालते तीन गुणांचे तीव्र कधी तर मंद कधी ।
वरचढ होई सत्व कधी तर रज तम ते बलवान कधी ।
वर्चस्वाची स्पर्धा चाले तीन गुणाची चुरशीची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।८।।
प्रकाशती देहाची सारी नऊ ही दारे ज्ञानानी ।
प्रभा फाकते रंध्रामधुनी कांती उजळे तेजानी ।
खूण हीच या सत्वगुणांच्या यथार्थ प्रकटीकरणाची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।। ९।।
लोभ लालसा स्पृहा घडविते कर्म हातुनी मनुजाच्या ।
आकांशेचे पंख लावुनी अंकित होई मायेच्या ।
रजोगुणांचे अधिक्य निर्मी विविध रूपे आसक्तीची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।१०।।
अहंकार मद मोह मूढता येई तमाने निष्क्रियता ।
आलस्याची वृद्धी होई सत्वर जाते तत्परता ।
तमोगुणांचा प्रभाव होता भ्रष्ट होतसे कर्मशुची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।११।।
सत्वगुणाचा वृक्ष देतसे सात्विकतेची शुद्ध फळे ।
रजोगुणाची फळे चाखता दु:खाग्नीने जीव जळे ।
तमोगुणांचे फलित म्हणोनी मिळते संगत अज्ञांची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।१२।।
सत्वगुणांनी ज्ञान जन्मते लोभ जन्मतो रजोगुणी ।
तमोगुणाने प्रमाद घडतो त्याज्य असे तो सर्व जगी ।
स्वर्ग सताची धरा रजाची वाट तमाची नरकाची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।१३।।
तीन गूण हे कर्म घडविती कर्त्याचे कर्तुत्व नसे ।
तीन गुणांचा खेळ रंगतो खेळाडू हे यंत्र असे ।
गुणातीत हा परमपुरुष जाणिता स्थिती ती भाग्याची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।१४।।
शरिरबद्ध या जिवास मिळता गुणातीत ही आत्मस्थिती ।
जरा मृत्युचे टळे दु:ख अन टळे क्लेशकर गर्भस्थिती ।
अमृतवल्ली ब्रह्मस्थितीची फुले देतसे मुक्तीची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।१५।।
पार्थ विचारी गुणातीत हा कसा असे अन कसा दिसे ।
दृश्य लक्षणे काय तयाची वर्तन त्याचे कसे असे ।
हृषीकेश वर्णितो लक्षणे गुणातीतशा व्यक्तींची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।१६।।
प्रवृत्ती वा निवृत्तीचा तया कदापि ध्यास नसे ।
द्वेष नसे वा प्रीत नसे वा मनात त्यांच्या द्वंद्व नसे ।
तुल्यस्थिती राखतो सर्वदा अविचल वृत्ती चित्ताची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।१७।।
त्रिगुणांचा हा प्रभाव घडवी ना ना कर्मे हातूनी ।
जाणुनी या नियमास राहतो उदासीन तो आतूनी ।
दु:खसुखे सारखी त्याला समता सुर्वर्ण दगडाची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।१८।।
मित्र शत्रु समसमान त्यासी निंदा कौतुक समान ते ।
मान मिळो अपमान घडो वा महत्व त्याचे ना त्याते ।
भौतिक कर्मे टाकुनी सारी स्थिती ठेवतो मुक्ताची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।१९।।
अव्यभिचारी भक्ती त्याची एकनिष्ठ तो भक्त असे ।
गुणातीत तो बनुनी जाई ब्रह्मस्तराचा स्वामी असे ।
भोगी तो उत्तम उन्नतसी ब्रह्मस्थिती हि भाग्याची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।२०।।
तीन गुणांच्या मुळात असते अमृत अव्यय शाश्वतशी ।
ब्रह्मस्थिती ती बांधुन ठेवी व्यक्ताला अव्यक्ताशी ।
व्यक्तरूप तिचिये त्रिगुणाचे ब्रह्म खून अव्यक्ताची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।२१।।
त्रिगुणांचा जो खेळ प्रकृती खेळी पुराण पुरुषाशी ।
त्रिगुणांचा तो योग वर्णिला रमावराने पार्थासी ।
शंका उरली नच किंचितही त्रिगुणांच्या अस्तित्वाची ।
करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।२२।।
राजेंद्र (?) ३० मार्च २००८
