२८.१
परवा फ्युजन म्युझिकची धून खूप आवडली म्हणून एका गाण्यावर बेभान होऊन नाचले लोक एका चित्रपटगृहात. बऱ्याच लोकांना लक्षातच आलं नाही की ते राष्ट्रगीत वाजत होतं. हे जेव्हा कळलं त्यावेळी मात्र कोणीतरी त्यांना त्यांच्या भावना दुखावल्याचं लक्षात आणून दिल आणि म्हणून त्यावेळी चित्रपटगृहच जाळून टाकलं त्यांनी.
२८.२
जेव्हा खिशात पडत होते तेव्हा काहीच वाटत नव्हतं पण आता खात्यात पडायला लागल्यावर खूप कमी मिळतात अशी अचानक जाणीव झाली त्यांना.
२८.३
त्याच्या घरी त्याने एका मुलाला दया येऊन आश्रय दिला. तो मुलगा सज्ञान झाल्यावर त्याने वारसा हक्काचा दावा ठोकला आश्रयदात्यावर. गम्मत म्हणजे लोकांची सहानुभूती त्याच्याकडे वळवण्यातही यशस्वी झाला तो मुलगा. आता तो आश्रयदाता कोर्टाच्या पायऱ्या झिजवतोय न्यायासाठी.
२८.४
मी आणि माझा मित्र एकदा जॉगिंग करायला गेलो. पूर्ण रस्ताभर मित्र कटकट करत होताच की माझी कंपनी त्याला आवडत नाही म्हणून. शेवटी टपरीवर माझ्याच पैश्याने चहा पिऊन झाल्यावर मला म्हणाला ,”बरं मग उद्या भेटू परत.” मला कळेना मी याला मित्र म्हणायचं की नाही ?
२८.५
पूर्वी एकाच ताटात जेवायचे दोघे. त्यांना कुणीतरी उचकवलं,”उष्ट काय खाता एकमेकांचं?” दोघे चवताळले आणि दोन तुकडे केले ताटलीचे. आता तुटलेल्या ताटलीत नीट खाता येत नाही म्हणून दोघे उपाशी असतात आणि उचकवणारा ढेकर देऊन निवांत झोपतो चेहऱ्यावर पांघरून ओढून.
२८.६
त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाची दाद मिळावी म्हणून कोर्टात गेला तो परवा. तिथे पाहतो काय तर न्याय मिळावा म्हणून न्यायाधीशच धरणं धरून बसले होते कोर्टा बाहेर. ते पाहून तो गोंधळला आणि त्याला प्रश्न पडला की नक्की या देशात न्याय देणारं आहे कोण ?



