
जन्माला येऊन थोडं कळायला लागल्यावर प्रत्येक श्वास हा आपण जगापासून वेगळे आहोत ही जाणीव करून घेणे आणि मग जगात आपलं वेगळेपण प्रस्थापित करण्यात खर्च होतं. आपण जगावेगळ काहीतरी कराव, आपण चार चौघात उठून दिसावं, आपलं चार चौघात कौतुक व्हावं यासाठी आपल्या अजाणतेपणी आपले आईवडील आणि नंतर जाणते झाल्यावर आपण या इच्छेला खात पाणी देतो आणि या इच्छेची पुढे महत्वाकांक्षा होते आणि मग प्रवास सुरु होतो आपण जे नाही ते बनण्याचा. कारण मग आपला वेगळेपणा हा इतरांच्या तुलनेत सापेक्ष असल्यामुळे मी कोण आहे या पेक्षा जगाच्या दृष्टीने मी कोण असलं किंवा भासलं पाहिजे या खटाटोपात बराचसा वेळ आणि शक्ती खर्च व्हायला लागते. आणि ही स्वतःचं वेगळेपण सिद्ध करायची महत्वाकांक्षा एकदा की डोक्यात चढली कि मग आत्मभान आणि आत्मसंशोधन या साठी वेळ राहतोच कुठे.
मग ना आयुष्य आपलं ना आपल्या आयुष्याचं यशापयश मोजण्याचे मापदंड आपले. आपलं आयुष्य दुसऱ्याच्या चष्म्यातून बघायचं आणि सतत बदलत असणारा हा चष्मा दुनियेनी बदलला की दुनिया दाखवेल ते रंग आपले मानायचे. हा चष्मा करियरचा असू दे, घराच्या आकाराचा असू दे, गाडीच्या किमतीचा असू दे , युरोप ट्रिप चा असू दे, किंवा सेकंड होम चा असू दे. या वेगवेगळ्या चष्म्यातून आपल्याकडे पाहत राहायचं आणि स्वतःच स्वतःचं दुनियेच्या नजरेत बदलणारं रुपडं आपलं मानायचं.
हे कुठपर्यंत ? जो पर्यंत तो चष्मा डोळ्यावरून निघत नाही तो पर्यंत. तो चष्मा एकदा उतरला की स्वच्छ दिसायला लागतं. अगदी रंगविरहित निव्वळ जीवन. मग लक्षात येत की आपण आपल्याला जसे पाहत होतो आणि त्या रंगीत चष्म्यामधून आपण आपल्यालाच जे भासत होतो ते आपण नाहीच मुळी. वेगळं, असामान्य बनण्याचं मृगजळ आजूबाजूच्या भासमय सृष्टीसह मग विरून जातं आणि राहते ती केवळ एक निर्मनुष्य, निर्मम जाणीव. आपण क्षुद्र असल्याची जाणीव. आपण खूप अगतिक असल्याची जाणीव, आपण निराधार असल्याची जाणीव.
मग येतं एक स्फुरण !! निर्मनुष्यत्वातल्या एकांताचा आनंद देणारं स्फुरण, निर्ममत्वातल्या निरासक्तीचा आनंद देणारं स्फुरण, क्षुद्रत्वातील शरणागतीचा आनंद जाणवणारं स्फुरण, अगतिकतेमध्ये आर्ततेचा अर्थ समजवणारं स्फुरण, निराधार वाटणं हेच निराधार आहे याचा अर्थबोध देणारं स्फुरण,
याच स्फुरणात मग सापडणार असते उलटी वाट. सहज असण्याची, कोणी होण्यापेक्षा केवळ असणारी, एक एका पावलाने पुढे पुढे दिसत जाणारी त्या अनाहताच्या दिशेने… निर्मम, निरहंकारी पण निस्सीम ओढीनं….