माझ्या लहानपणी म्हणजे साधारणतः चाळीस वर्षांपूर्वी आमच्या घरी कृष्णधवल दूरदर्शन संच आला. त्यावेळी दूरदर्शनचं दर्शनच इतकं दुरापास्त होतं की टीव्हीवरचा कुठलाही कार्यक्रम पाहायला आम्हाला आवडायचा. त्या काळातील एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे बातम्या बघण्याचा माझ्या आजोबांचा शिरस्ता. त्याच त्या बातम्या माझे आजोबा मराठी , हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत पाहत असत आणि त्याच बातम्या त्याच दिवशी तीन वेगवेगळ्या भाषेत पाहण्यात त्यांना काय आनंद मिळायचा हे अजूनही माझ्यासाठी कोडं आहे. अर्थात आजोबांना हा प्रश्न विचारण्याची त्यावेळी आमची टापच नव्हती. असो.
तर त्या काळात शेतकरीबंधूंसाठी असणारा एक कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवण्यात येत असे. ‘आमची माती आमची माणसं’ असं त्या कार्यक्रमाचं नाव होतं. शेतकरीबंधूंसाठी असणारा कार्यक्रम सुद्धा. आम्ही पहायचो कारण काचेवर काहीतरी चित्र हलतय एवढं आम्हा लहान मुलांचं मनोरंजन होण्यासाठी पुरेसं असायचं.
‘आमची माती आमची माणसं’ पाहताना शेतकरी बंधूंचं जे त्या वेळचं चित्र माझ्या डोक्यात अजून आहे तेच चित्र आताही शेतकरी बंधूंवर बेतलेला कृषीविषयक
कार्यक्रम पाहताना पाहतो तेव्हा कृषिवलांच्या समस्यांचं चित्र पूर्वी कृष्णधवल दिसायचं आणि आता एलइडी संचात रंगीत आणि भव्य दिसत या पलीकडे फार फरक झालेला मला तरी जाणवत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पिकाचा बेभरवसा, पावसाचा बेभरवसा, इतर प्रश्न हे गेली चाळीस वर्ष जसेच्या तसे आहेत. ‘ही काळी आई, धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती आमची माणसं’ हे त्या कार्यक्रमाचं शीर्षक गीत लहानपणी त्याच ठसक्यात आम्ही मुलं गुणगुणत असू. पण आता त्या शीर्षकगीतातला शब्दार्थ, मथितार्थ, भावार्थ, लक्ष्यार्थ काहीच शिल्लक न राहिल्याची एक जाणीव मनाला अस्वस्थ करते आहे. इथली मातीही आमचीच आणि माणसंही आमचीच पण मग आता मनामनाची नाती का जुळत नाहीत?
एकीकडे शेतकऱ्यांची दुर्दशा, काळ्या आईची दुरवस्था आणि एकीकडे त्याच शेतकऱ्याच्या नावावर केलेले लाखो करोडोंचे आर्थिक घोटाळे याचा मेळ बसत नाहीये मनात. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिश राज्यात मी या दुरावस्थेचं कारण एकवेळ समजू शकतो कारण त्यावेळी मातीही आमच्या ताब्यात नव्हती आणि त्या मातीवर राज्य करणारी माणसंही आमची नव्हती. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर मातीही आमची झाली आणि त्यावर राज्य करणारी माणसंही आम्हीच आमच्यातूनच निवडली. तेव्हा वाटलं आता सर्व आलबेल झालं म्हणून आम्ही ‘आमची माणसं’ म्हणून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर भिस्त ठेऊन निर्धास्त झालो आणि काही कालांतराने निष्क्रिय सुद्धा. मग हीच आम्ही निवडलेली आमची माणसं आमच्यासाठी राज्य करायचं सोडून आमच्यावरच राज्य केव्हा करायला लागली हेच आम्हाला कळलं नाही. किंवा तसं खूप खुबीने कळू दिलं नाही. ब्रिटिशांपासून आपली माती स्वतंत्र झाली खरी पण आपली मती मात्र अजून गुलामच आहे हे आपण निवडून दिलेल्या आपल्याच माणसांनी हेरलं आणि मग मनामनाची नाती जोडायच्या ऐवजी ‘फोडा आणि झोडा’ हीच ब्रिटिशांची नीती पुढे रेटून त्या काळ्या आईने उदंड दिलेलं धनधान्य ही आपली म्हणवणारी माणसं ओरबाडत लुबाडत राहिली. झेंडे बदलले , टोप्या बदलल्या, चिन्ह बदलली पण परिस्थिती बदलली नाही कारण आपल्यावर कुणीतरी राज्यकर्ता असणं आवश्यक आहे असं आपण मान्यच केलं आहे. राजांचे पोशाख बदलले पण त्यांचे दरबार भरतच राहिले आणि अजूनही भरतात पण बहुसंख्य मंडळींना त्यात काहीच अयोग्य वाटत नाही. पूर्वी पंचहजारी मनसबदार म्हणायचे आता गटप्रमुख, शाखाप्रमुख , शहरप्रमुख असं काहीतरी म्हणतात. पण राजे आणि संस्थानं याना अत्युच्च स्थानी मानायची मानसिक गुलामी अजूनही गेलीच नाहीये आपली. ‘आपल्या मातीवर आमच्यासाठी काम करणारी माणसं निवडण्याइतकी लोकशाही अजून रक्तात भिनलीच नाहीये आपल्यात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला बघितलं तर सध्या आमचीच माणसं, आमच्याच मातीची निंदा करत आहेत आणि परदेशाच्या मातीशी इमान राखण्यात धन्यता मानत आहेत. का असं?
खोलात जाऊन उकल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की ‘आमची माती आणि आमची माणसं’ यापेक्षा सर्व जण ‘आपली माती आणि आपली माणसं’ यांचं भलं करण्याच्या मागे लागली आहेत. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी निर्माण झालेली राष्ट्रभावना विरून जाऊन आता पुत्रप्रेमामुळे धृतराष्ट्रभावनेने जोर धरला आहे. ‘धर्मम् जानामि। नच मे प्रवृत्ती। अधर्मम् जानामि। नच मे निवृत्ती’ असं म्हणणारे दुर्योधन पुन्हा राज्याराज्यात निर्माण होत आहेत आणि त्यांच्या राक्षसी महत्वाकांशेपुढे अंध किंवा हतबल असण्याचं कारण देऊन दुर्लक्ष करणारे धृतराष्ट्रवादीही सर्वत्र फोफावले आहेत.
मग अशावेळी माझ्या हातात काय आहे? माझ्या हातात आहे ते, कर्मयोग स्वतः आचरुन अर्जुनाला समजावून सांगून युद्धप्रवण, कार्यप्रवण करणाऱ्या कर्मयोगी कृष्णावर आणि त्याच्या ‘संभावमी युगे युगे’ या अभिवाचनावर विश्वास ठवून ‘धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री’ एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या अठरा अक्षौहिणी सैन्यांपैकी धर्माच्या बाजूने उभ्या असणाऱ्या सात अक्षौहिणी सैन्यातील एक सैनिक होणं. होय ! हे नक्कीच हातात आहे माझ्या. एक असा सैनिक की ज्याची नोंद इतिहासात कधी घेतलीही जाणार नाही कदाचित पण,
धरुनी उभा तू खडग हे जरी।
लढशील तू या धर्मसंगरी।
ठेव भाव माझाच अंतरी।
जरी इंद्रिये तुझी झुंजती।
अर्पि मज तू मना ।
अर्जुना, ओळख माझ्या खुणा।।
अर्जुना ओळख माझ्या खुणा।।
ही भगवदगीतेतल्या अक्षरब्रम्ह योगात सांगितलेली खूणगाठ मनाशी बांधून राष्ट्रभवानेने उभा असणारा एक सैनिक. असा सैनिक बनून मी माझ्या परिघात माझं कर्तव्य पार पाडत नवीन भारताच्या निर्मितीसाठी होऊ घातलेल्या धर्मयुद्धात माझा स्वल्प वाटा तर मी उचलूच शकतो.
आणि मी जर असं केलं तरच “आमची माती आणि आमची माणसं” या दोन्हीशी माझ्या मनाची नाती जोडण्याचा प्रयत्न माझ्याकडून केल्याची कृतकृत्यता नक्कीच माझ्यापाशी असेल.




खूप छान लेख