दीड रुपयाची चप्पल – २२ मार्च २०१९

/ / marathi

माझ्या वडिलांनी मला एकदा त्यांच्या वडिलांची म्हणजेच माझ्या आजोबांची एक गोष्ट सांगितली. माझे वडील लहान असताना सगळं कुटुंब आजोबांच्या एका स्नेह्यांकडे गेले होते. माझे वडील खूप लहान होते. काहीतरी कारण झालं आणि माझ्या वडिलांनी त्यांची चप्पल हरवली. इतक्या लांबून अनवाणी येणं तर शक्यच नव्हतं. म्हणून आजोबांच्या स्नेह्यांनी माझ्या वडिलांना चप्पल देववली. स्नेह्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली असल्यामुळे साधारण 75 वर्षांपूर्वी दीड रुपयाला ती चप्पल त्यांनीं दिली. आजोबांना फारच कानकोंडं झाल्यामुळे स्नेह्यांनी देऊ केलेली इतकी महाग चप्पल न घेण्याबद्दल आजोबा काहीच बोलू शकले नाहीत. पण तेव्हाच तो दीड रुपया परत करण्याच्या बोलीवर ती चप्पल घेणं त्यांनी मान्य केलं. खरं तर एका चपलेवर तेव्हा दीड रुपया खर्च करणं आजोबांना परवडणारं नव्हतं पण त्यांचा काही इलाज नव्हता. माझे वडील सांगतात की तो दीड रुपया शिलकीत पडण्यासाठी माझ्या आजोबांना सहा महिने लागले आणि त्या चपलेचा तो दीड रुपया त्यांच्या स्नेह्यांना परत देईपर्यंत ते खूप अस्वस्थ होते.
हा प्रसंग माझ्या आजोबांची समाजजीवनातील अतिशय स्वच्छ प्रतिमा का होती हे कळण्यासाठी पुरेसं आहे. एका सामाजिक संस्थेला तन मन धन अर्पण करून आणि त्या संस्थेसाठी भरपूर पैसे मिळवून देऊन सुद्धा एक पै चाही मोह कधी आजोबांना पडला नाही. ‘मन चंगा तो काठोति मे गंगा’ किंवा ‘ऐसे बोलावे कोणी न म्हणे झूट, ऐसे बसावे कुणी न म्हणे उठ’  हे त्याचे जीवन सिद्धांत होते. त्यांच्या शब्दाचं वजन आणि विश्वासार्हता ही कोर्टाच्या स्टॅम्प पेपरपेक्षाही अधिक होती.

सध्या बँकेच्या आर्थिक घोटाळ्यांची जी प्रकरण बाहेर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर माझ्या आजोबांचं तत्वज्ञान अधिक ठळकपणे उठून येतं. आपला दिलेला शब्द पाळणं, कुठल्याही परिस्थितीत निभावणं आणि आपल्या चारित्र्यावर शिंतोडे पडू नये म्हणून अतिशय पारदर्शक वर्तन ठेवणं ही आजोबांच्या आणि त्याच्या पिढीच्या अनेकांच्या जीवनाच्या तत्वज्ञानाची बैठक होती.

आता शब्दाचं महत्व तर सोडाच पण अगदी कायदेशीर स्टॅम्पपेपरचं सुद्धा महत्व आणि शाश्वती वाटत नाही.  दिवसेंदिवस आर्थिक घोटाळे आणि त्यात फसलेल्या समाजातील प्रतिष्ठित आणि यशस्वी समजल्या जाणाऱ्या व्यक्तींचा सहभाग पाहिला की प्रश्न पडतो की तीन पिढ्यात काय बदललं?

खोलवर विचार करता लक्षात आलं की ‘गुन्हा’ या शब्दाची व्याख्या आता बदलली आहे. पूर्वी  चुकीचं वागणं हे गुन्हा समजलं जायचं आणि त्याचा संबंध सरळसरळ माणसाच्या सदसद्विवेकबुद्धीशी होता. आता जो पर्यंत कायद्यात पकडले जात नाहीत तो पर्यंत कुठलंच वर्तन गुन्हा ठरत नाही. पूर्वी सिग्नल तोडला की मनाला चटका बसायचा, आता तेच वर्तन पोलीस पकडत नाही तोपर्यंत गुन्हाच ठरत नाही. याचा अर्थ गुन्ह्याची परिभाषाच बदलली आहे.
हीच बदललेली मानसिकता सामाजिक, आर्थिक गुन्हे करण्यासाठी कारणीभूत ठरते. म्हणून गुन्हा न करण्यापेक्षा तो पकडला कसा जाणार नाही याची अधिक काळजी घेतली जाते आणि त्यातूनच जे गुन्हा पकडू शकतील अशांशीच संगनमत करून भ्रष्टाचाराला हातभारच लावला जातो.
भारतीय संस्कृती सद्सद्विवेकबिद्धीला अनन्यसाधारण महत्व देते. भारतीय संस्कारांची बैठकच ही सदसद्विवेकबुद्धी व्यक्तीत जागृत करणं यावर भर देते आणि कायद्यापेक्षा वायद्यावर म्हणजेच  कागदापेक्षा शब्दांना अधिक महत्व देते.
मला असं लक्षात आलं आहे की माझ्या शब्दाला महत्व मिळण्यासाठी, वजन येण्यासाठी  संपूर्णपणे मीच जबाबदार असतो. त्यामुळे माझी सदसद्विवेकबुद्धी आणि व्यावहारिक वर्तन यांची सांगड घालण्याचा मी शक्यतोपरी प्रयत्न करायला पाहिजे. 
मला याचीही जाणीव आहे की व्यवहारात बऱ्याच वेळा ‘नरो वा कुंजरो वा’ करावं लागतं. विशेषतः   लोकसंपर्क असणाऱ्या व्यक्तींना कधीतरी मन मोडू नये म्हणून कधी काही आश्वासन द्यावी लागतात पण माझ्या दृष्टीने असे प्रसंग नियम सिद्ध करणारे अपवाद असावे आणि तेही शक्यतो माझी विश्वासार्हता कमी करणारे नसावे.
या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून केलेल्या वर्तणुकीमुळे बऱ्याच वेळा व्यावहारिक तोटे होतात पण शेवटी माझं मला ठरवायचं आहे की मला महत्व हे मऊ मऊ गादीचं आहे की गाढ झोपेचं. मला हे ठरवायचं आहे की लोकांनी माझ्या समोर गोड आणि आदरानं बोललेलं मला अधिक आवडेल की माझ्या पाठीवर आदराने आणि सन्मानाने बोललेलं?

निदान मी माझ्याबाबतीत तरी आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवायचं ठरवलं आहे. लोकांच्या झोपा उडवून मी खुशाल मऊ गादीत झोपण्यापेक्षा कुणाचा दीड रुपया द्यायचा आहे म्हणून सहा महिने अस्वस्थ झोप लागली तरीही चालेल मला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *