विसंभर पलंबर- १५ सप्टेंबर २०१७

/ / marathi

आमच्या घराजवळच एक पाटी लावलेली आहे. त्यावर पुढीलप्रमाणे ओळी आहेत.

“विसंभर पलंबर. 5739201938. लिकेज पेशालीस”

या एका पाटीवरून केवळ ‘लिकेज’ या शब्दामुळे ती पाटी एखाद्या पलंबर म्हणजेच प्लम्बरची असावी असा आम्ही बरेच दिवस कयास करत होतो. एकदा खरंच घराच्या वॉशबेसिन चा नळ अचानक लीक व्हायला लागला आणि आम्ही त्या पाटीवाल्या नंबरवर फोन लावला आणि त्या पलंबरला पाचारण करण्यात आलं. त्या पाटीदाराचं नाव “विश्वंभर” असं होतं आणि त्याच्या बोली भाषेत अपभ्रंश पावून ते ‘विसंभर’ झालं होतं हेही लक्षात आलं. तो ‘विसंभर’ आल्या आल्या लगेच कामाला लागला आणि लिकेज काढण्यात गर्क झाला आणि मी त्या विश्वंभराची लीला पाहण्यात.

काम सुरू असताना बोलता बोलता तो सहज म्हणाला “देखो साहब मै इतने साल से बिजनस में हू पर आप मुझको अबतलक कभी याद नाही किया. पर जैसाही लिकेज हुवा, तुरंत फोन घुमाया. हम पलंबर लोक का ऐसाही है साब. जबतक सब ठीकठाक है कोई याद नही करता पर जैसाही लिकेज हुवा तो विसंभर को आधी रात भी फोन घुमाया. अगर बीच बीच मे बुलाते है तो लिकेज होनेही नाही दूंगा मय. पर इतना कोन सोचे साब”

तो त्याचं गाऱ्हाणं सांगत होता पण माझ्या मनात आलं की हा ‘विसंभर पलंबर” आणि आकाशातला जगद्नियंता विश्वंभर यांचं गाऱ्हाणं एकच असेल नाही? त्या विश्वंभरालाही माणसं त्यांच्या आयुष्यात काहीतरी लिकेज किंवा चोकअप व्हायला लागलं की तेव्हाच अगदी अर्ध्या रात्री सुद्धा अगदी हात जोडून प्रार्थना करून त्याचा धावा करतात. त्यांना वाटतं त्या विश्वंभरानी यावं, अगदी बोलावल्यावर ताबडतोब हजर राहावं, आयुष्यातलं लिकेज थांबवावं, वासनांनी चोकअप झालेली आमची मन साफ करावी, आयुष्याचा प्रवाह पुन्हा एकदा व्यवस्थित करून द्यावा आणि सव्वा अकरा किंवा लिकेज अगदीच जास्त असेल तर एकशे एक रुपये आणि नारळ हा लोकांनीच ठरवलेला मेहेनताना घेऊन आपल्या मार्गानी निघून जावं. आणि पुढची आठवण फक्त आयुष्यात पुन्हा काहीतरी गळायला लागेल, चोकअप होईल तेव्हाच.

आमचा ‘विसंभर पलंबर’ माझ्याकडे त्याची तक्रार तरी मांडू शकतो, पण तो जगद्नियंता विश्वंभर, सगळ्यांच्या जीवनाचा प्लंबर मात्र कधीही तक्रार न करता कुठल्याही वेळी कोणाही साठी त्यांच्या आयुष्यातली गळती थांबवायला सदैव हजर असतो.

मला वाटतं आपण निदान आमच्या ‘विसंभर पलंबर’ चा सल्ला तरी मानू. म्हणजे वेळोवेळी आणि वेळेवारीच जर आपण त्या ‘विश्वंभराने’ योगसूत्रात सांगितलेल्या कृती करून आपल्या षडचक्र युक्त कुंडलिनीच्या पाईपची काळजी घेतली तर त्या ‘विश्वंभराला’ आपल्या आयुष्यातलं लिकेज काढायची वेळच येणार नाही कदाचित….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *