अध्याय ६ – ध्यानयोगांतर्गत मन:संयम
अर्जुन वादला हे हृषिकेषा चंचल मन हे पाही ।
बलिष्ठ दृढ अन अस्थिर माझे चित्त स्थिरावत नाही ।।१।।
कधी आवरू जाता मन हे हाती येतच नाही ।
कधी बंधनामधे जसा हा वारा मुळी न राही ।।२।।
निष्फळ का ते यत्न जयांची वृत्ती साधक नाही ।
विरती का ते जसा दुभंगे मेघ दिशांना दाही ।।३।।
सांगावे मज हे प्रद्युम्ना तुजविण कोणी नाही ।
कसा मोक्ष पावे या जन्मी कसा स्थिरावे देही ।। ४।।
कृष्ण म्हणे रे ऐक अर्जुना उत्तर समजुन घेई ।
चंचल मन हे दृढ अन दुष्कर याची शंका नाही ।।५।।
असे जरी ते अनिर्बंध अन अथांग जरी ते राही ।
दृढ अभ्यासे स्थिरे चित्त हे यत्ना करून पाही ।।६।।
एका जन्मी घडते नच हे यत्न निरंतर होई ।
यत्नश्रुंखला जन्मोजन्मी मोक्षपदाला नेई ।।७।।
इच्छा असो नसो हा आत्मा ज्ञानमुमुक्षु होई ।
शब्दब्रह्म ते पार होऊनी अन्ति मुक्तता होई ।।८।।
इहपरलोकी अविनाशी तो पुरुष यशस्वी होई ।
नसे दुर्गती त्यासी ज्याची कर्मशुद्धता होई ।।९।।
जन्मे मग तो योग्य कुळी अन दुर्लभ जन्मा येई ।
शुचिर्भूत अंड बुद्धिमंत तो योगस्थितीला जाई ।।१०।।
मोक्षसिद्धिचा प्रवास ऐसा अनंतजन्मी होई ।
पहिले पाउल या जन्मी तू यत्ने टाकुन पाही ।। ११ ।।
कर्मयोग हा श्रेष्ठ मानुनी ज्ञानतपस्वी होई ।
कर्मयोगी तू मन:संयमी होउनि मोक्षा जाई ।। १२।।
जरी योग हा साधे तुजला चित्तसंयमन होई ।
भाक्तीवाचुनि निष्फळ ऐसा कर्मयोगही राही ।।१३।।
यासाठी भगवदभक्तीचा अनुभव घेऊन पाही ।
तोच खरा योगी ज्या चित्ती भक्ती भरुनि राही ।। १४।।
राजेंद्र (?) २४ नोव्हेंबर १९९९