अध्याय ५ : कर्म संन्यास योग
पार्थ म्हणे कर्म सोडण्यास तूच सांगतो ।
परि फिरुनी भक्तियुक्त कर्म तू प्रशंसतो ।
श्रेयस्कर काय पार्थ सांगण्यास विनवितो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।१।।
कर्म संन्यास एक एक कर्मयोग तो ।
दोन्ही मार्ग आक्रमोनी व्यक्ती मुक्ती साधतो ।
भक्तियुक्त कर्म परी त्यात श्रेष्ठ मार्ग तो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।२।।
द्वेषरहित तो असे न कामना करीत तो ।
तोच असे जाण खरा नित्य संन्यस्त तो ।
द्वंद्वमुक्त बंधनातुनि सुखे विमुक्त तो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।।३।।
कर्मयोग सांख्ययोग भिन्न अज्ञ मानितो ।
एक मार्ग अनुसरिता योग्य फळे साधतो ।
कोणताही मार्ग दोन्हिच्या फळास मिळवितो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।४।।
साध्य सांख्यमार्गी कोणी जीवनात साधतो ।
तेच साध्य कर्ममार्गी जीवनात साधितो ।
सांख्य कर्म योग एक पाही तोच पाहतो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।५।।
भक्तीवीण कर्मसंन्यासयोग व्यर्थ तो ।
भक्तियुक्त कर्ममार्गी तत्क्षणी स्थिरावतो ।
हाच भक्तियुक्त कर्म मार्ग इष्ट साधतो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।६।।
योगयुक्त शुद्धचित्त आत्मसिद्ध भक्त तो ।
लोकप्रिय प्रेमरूप गात्रसंयमीत तो ।
कर्म होत जाई मात्र सर्वथा अलिप्त तो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।७।।
त्यागुनी फलास सर्व ईश्वरास पाहतो ।
बंधनात राहतो तरी सदा विमुक्त तो ।
कमलपत्र लिप्त न जळी तसा अलिप्त तो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।८।।
पाहतो परीसतो विसावितो विसर्जितो ।
खाद्य गंध स्पर्श शब्द इंद्रियांनी सेवितो ।
गात्र भोगती तयातुनी मुनी अलिप्त तो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।९।
देहबुद्धी गात्र चित्त व्यग्र कर्मवंत तो ।
शुद्ध भाव शुद्ध चित्त शुद्धभक्ती साधतो ।
हीच शुद्धता मनात राखुनी अलिप्त तो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।१०।।
संयमात राहतो कशात ना वहावतो ।
देह नवद्वार मंदिरात शांत राहतो ।
स्वांत कर्म न करीत न दुजास करवितो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।११।।
ईश पाप ना कधी ग्रही कधी न पुण्य तो ।
प्रकृतीस्वधर्म कर्म लाभ खेळ मांडितो।
झाकतो यथार्थ ज्ञान अंतरी विमोह तो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।१२।।
सूर्य हा जसा हरेक वस्तुसि प्रकाशितो ।
ज्ञान होऊनी यथार्थ जीव तेज फाकतो ।
तोच तेजगोल परमअर्थ मार्ग दावितो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।१३।।
श्वान हत्ती गाय ब्राह्मणा समान मानितो ।
एक तत्व स्थीर त्या सजीवमात्र जाणितो ।
हाच शोध ब्रह्मतत्व ते समान मानितो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।।१४।।
बाह्यविश्वज्ञान स्पर्श इंद्रियास ओढितो ।
संयमात स्थीर समाधीत जणू राहतो ।
भोग भोगी अंतरात सौख्य दु:खमुक्त तो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।१५।।
काम क्रोध अग्निजाळ संयमात राखितो ।
तोच योगी तोच सौख्यपूर्ण काळ कंठितो ।
मुक्त तोच जीव अन्यकारणी समर्पितो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।१६।।
कर्मसंन्यास सार एक तत्व सांगतो ।
कर्म व्यग्र इंद्रिये जरी अलिप्त जीव तो ।
हीच साधनाच कर्म संन्यास योग तो ।
कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।१७।।
राजेंद्र (?) २७ जुलै १९९९