
इंजिनीरिंग कॉलेजमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा आयुष्यात प्रथमच पालकांच्या पंखाबाहेर येऊन जगाचा खरा अनुभव मला येऊ लागला. साधारण मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात खूप सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरणात राहताना बाहेरच्या जगात काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांनी काय धुमाकूळ घातलेला असतो याची अजिबात कल्पना नव्हती. सगळं जग आपल्यासारखं सरळ मार्गी असतं, कुणी कुणाला फसवत नाही इत्यादी गोष्टी गृहीत धरलेल्या होत्या. पण माझ्या कॉलेजच्या पहिल्या काही दिवसातच मला त्याबाबतीत माझा भ्रमनिरास होतोय असं वाटायला लागलं. ज्या संस्कारांचा पाया प्रमाण मानून योग्य काय आणि अयोग्य काय याचा नीर-क्षीर विवेक करण्याची सवय लागली होती तो पायाच डळमळीत होतोय की काय असं वाटायला लागलं. आणि जस-जसा अधिक लोकांच्या संपर्कात येऊ लागलो आणि जगाचे व लोकांचे अनुभव घेऊ लागलो तस-तसं लक्षात आलं कि जग असंच आहे अणि मीच ‘Odd Man Out’ आहे. त्याकाळात मन खूप गोंधळून गेलं होतं. पावलो पावली प्रश्न पडायचे पण त्याचं उत्तर कसं शोधावं हे कळत नव्हतं. खूप अनुत्तरित प्रश्न डोक्यात तसेच होते.
पुढे कॉम्पुटर इंजिनीअरिंग पूर्ण करून माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेल्यावर कोर्पोरेट जीवन जवळून बघायला मिळालं. तिथली स्पर्धा, असूया, मत्सर, स्वार्थ, आणि स्वतःच्या लाभासाठी दुसऱ्या सरळसोट माणसांचे बळी पडताना पाहिले. त्याचवेळी देशाचं आणि जगाचं राजकारण, समाजकारण, अर्थकारण याचीही समज यायला लागली होती. जे स्वार्थाने वाट्टेल तसे वागत आहेत त्यांचं सगळं हाम ठाम सुरु आहे आणि जे सचोटीने वागत आहेत त्यांचे मात्र हाल होत आहेत असं दिसत होतं. हे असं का हे लक्षात येत नव्हतं. काही वेळा तर ‘माणूस’ या प्राण्याशी संबंधसुद्धा नको इतकी निराशा मन ग्रासायची. मी जगाचे अनुभव घेत होतो अधिक विचार करत होतो पण या विषमतेची कारणमीमांसा लक्षात येत नव्हती. एका शायरने म्हटलं आहे त्याप्रमाणे,
मुझे किसी ने पूछी दर्द की कीमत, पर मै क्या बताता?
जिंदगीमे बस यही देखा था के लोग उसे मुफ्त में दे जाते है|
अशी काहीशी माझी स्थिती झाली होती. या सगळ्याला ‘कालाय तस्मै नमः’ या अगतिक मथळ्याखाली दुर्लक्षित करायला मन तयार नव्हतं. कारण माझं तर्कट मन यासगळ्या मागचा कार्यकारणभाव शोधण्याचा या विषमतेची संगती लावण्याचा प्रयत्न करत होतं.
नेमकं त्या दरम्यान हाती लागलं ‘श्री हिराभाई ठक्कर’ यांचं एक अप्रतिम पुस्तक, ‘कर्मसिद्धांत’. या अफलातून पुस्तकात माझ्या जवळजवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती. कर्म आणि कर्मफळ याचा परस्परसंबंध आणि त्याचा कार्यकारण भाव दाखवलेला होता. त्यामुळे मला मानवाच्या आजूबाजूच्या विचित्र विश्वामागची आणि त्यात घडणाऱ्या घटनांमागची अलौकिक रचना लक्षात आली. यात कुठेतरी चांगल्या वाईटाचा हिशोब ठेवला जातो आणि वेळ आली की त्या त्या जीवाला त्याने केलेल्या कर्माची चांगली वाईट फळं भोगायलाच लागतात हे जेव्हा त्या पुस्तकातील करणमीमांसेमधून पटलं त्यावेळी माझं मन बरंचसं शांत झालं.
पण पुढे प्रश्न पडला की , त्या पुस्तकात वर्णन केलेल्या त्या कर्मविपाकाच्या चक्राबाहेर पाडण्यासाठी माणसाने कसं वागलं पाहिजे? त्यावेळी हाती आली श्रीमद् भगवद्गीता. श्रीमद् भगवद्गीतेच्या अंतरंगात शिरल्यावर, या विश्वाचं चक्र जे स्थलकालाच्या चौकटीत युगानुयुगं सुरु आहे त्यामागील ‘devine design’ आणि त्या design मधील माझा सहभाग आणि आणि माझ्याकडून अपेक्षित असणारं कर्तव्य कसं ठरवायचं आणि ते पार पाडण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे याचा बऱ्याच अंशी उलगडा झाला. मग जगाकडून येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांकडे एका वेगळ्याच नजरेने पाहू लागलो, समोर आलेल्या प्रसंगातून, ते devine design समजून घेण्याचा आणि प्रत्येक प्रसंगात ‘त्याचा’ हात पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यामुळे
किसीने धूल क्या झोकी आखोंमे ।
कम्बख़्त पहले से बेहतर दिखने लगा ।
असं काहीसं होऊ लागलं आणि विपरीत प्रसंगांमुळे होणारी जीवाची तगमग काही अंशी कमी होऊ लागली.
या सगळ्या वाचन आणि चिंतनामुळे काही लौकिक, काही अलौकीक, काही पारमार्थिक प्रश्न सुटले खरे पण माझ्यातल्या इंजिनीअरला एक तांत्रिक प्रश्न मात्र सतावत होता की प्रत्येक जीवाचा जन्मोजन्मीचा हा कर्मविपाकाचा हिशोब इतक्या अचूकपणे प्रत्यक्षात कसा ठेवला जात असेल?
भगवान श्रीकृष्णांनी ‘ज्ञानविज्ञान योग’ या गीतेच्या सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जर ज्ञान(परा) आणि विज्ञान(अपरा) यांना जोडणारा धागा हा परमेश्वर असेल तर हा सगळा अलौकिक हिशोब ठेवण्यासाठी आणि त्याचा संबंध मानवाच्या प्रत्यक्ष जन्ममृत्यूशी जोडला जात असेल तर अलौकिकाला लौकिकाशी जोडण्यासाठी वापरला जाणारा तो विज्ञानाचा धागा मानवाच्या संदर्भात कोणता असेल?
माझ्या मनात खूप वर्ष हा प्रश्न होता आणि अचानक एका सहज म्हणून घडलेल्या चर्चेतून मला दिशा मिळाली. काहीच दिवसांपूर्वीची गोष्ट. माझ्या एका स्नेह्यांनी मला प्रश्न विचारला की गुगलसारख्या कंपन्या काही करोड लोकांच्या कितीही वर्षांच्या ई-मेल कशा स्टोअर करतात आणि बरोब्बर त्याची ईमेल त्याला कशी पोहोचती केली जाते? या प्रश्नाचं उत्तर देताना मी त्यांना थोडं क्लाउड कॉम्पुटिंगबद्दल सांगितलं आणि ही सगळी माहिती माहितीजालाच्या ढगात (क्लाउडमध्ये) कशी साठवलेली असते आणि तुमचा ई-मेल आयडी हा त्यातील फक्त तुमच्याच ई-मेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाटी कसा वापरला जातो इत्यादी जुजबी प्रारंभिक माहिती मी त्यांना दिली.
आमच्या या संभाषणानंतर मी अधिक विचार करू लागलो आणि डोक्यात एक गोष्ट चमकून गेली की हा परमेश्वराचा धागा म्हणजे DNA असू शकेल का ? माणसाचं DNA हा प्रत्येक माणसाचं ओळखपत्र आहे असं म्हटलं जातं. वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलं आहे की जगात प्रत्येक माणसाचा DNA हा कधीच एकाचा दुसऱ्यासारखा नसतो आणि माणसाची शारीरिक, मानसिक, भावनिक रचना, त्याच्या आवडीनिवडी इत्यादी अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा त्या व्यक्तीच्या DNA रेणूंची ची संरचना ठरवते. हा DNA मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे म्हणजेच आईवडिलांकडून त्यांच्या मुलांकडे संक्रमित होत असते पण DNA रेणू हा जगात प्रत्येकाचा एकमेवाद्वितीयच असतो.
माझ्या मनात आलं की हाच DNA रेणू म्हणजेच कर्मविपाकाचा हिशोब ठेवणारा आणि त्या प्रमाणे माणसाचं प्रारब्ध ठरवणारा परमेश्वराचा विज्ञानाचा धागा नसेल कशावरून?
मानवाच्या अस्तित्वापासून लाखो वर्षांपासून DNA माणसाच्या शरीरात आहेच पण आधुनिक वैज्ञानिक जगातील DNA चा शोध मात्र जेमतेम दीडशे वर्षापूर्वींचा आणि त्यातही साधारण गेल्या केवळ पन्नास साठ वर्षांत त्यावर खूप संशोधन सुरू झालं. या संशोधनानंतर DNA संदर्भात अधिकाधिक माहिती वैज्ञानिकांना उपलब्ध होत आहे आणि मानवाच्या अस्तित्वाबद्दलचं गूढ उकलण्याची आणि मानवाच्या लौकिक आणि अलौकिक शक्तीची गुपितं या DNA वर होणाऱ्या संशोधनातून शास्त्रज्ञांच्या ध्यानात येतील. एक गम्मत म्हणजे माझ्या वाचनात हेही आलं आहे की DNA च्या अभ्यासासाठी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या महाप्रचंड माहितीचा साठा करण्यासाठी सर्वात सोयीचं तंत्रज्ञान हे क्लाउड कॉम्पुटिंगच असणार आहे .
हे सगळं वाचल्यावर माझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जरी मला पूर्णपणे मिळालेली नसली तरी आता माझ्यातला तर्कट इंजिनीअर थोडा शांत नक्कीच झाला आहे. एक मात्र नक्की की जितकं गूढ कर्मविपाकाचा हिशोब कसा ठेवला जातो याबद्दल आहे तितकंच गूढ सध्या शास्त्रज्ञ DNA च्या बाबतीत अनुभवत आहेत. त्यामुळे जोपर्यंत विज्ञान DNA बद्दल आणि त्याच्या मानवाच्या जडणघडणीशी असणाऱ्या संबंधाबद्दल अधिक विस्तृतपणे माहिती सांगू शकत नाही तो पर्यंत भगवान श्रीकृष्णांनी हजारो वर्षांपूर्वी श्रीमद भागवद्गीतेत उलडगून सांगितलेल्या कर्मसिद्धांतावर आणि भगवंताच्या गूढ क्लाउड कॉम्पुटिंग वर श्रद्धा ठेऊन सबुरीने आपलं समोर येणारं निहित कर्म करत राहणं हाच सध्या माझ्या साठी सर्वोत्तम मार्ग आहे.
अप्रतिम