
आजच्या अलक नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या लिहिल्या गेल्या. कुठल्याही कथेचा सुखांत किंवा दुःखांत एक साहित्यकृती म्हणून करता येऊ शकतो आणि साहित्य म्हणून, लेखकाचे विचार म्हणून, किंवा त्या साहित्यकृतीची गरज म्हणून त्या दोन्ही प्रकारचे शेवट करण्यात काहीच योग्य किंवा अयोग्य असं नाही.
परंतु आजच्या अलक लिहीत असताना मनात विचार आला की अलकचं एखादं कथाबीज सुचल्यावर अलक एका टप्प्यापर्यंत आल्यावर तिथून वेगवेगळे शेवट होऊ शकतात. मग जे शेवट सुचतील ते त्या व्यक्तीच्या मनाचा काही अंशी आरसा असेल का ? मानसशास्त्र हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे पण सर्व साधारणतः अलक चा कथाभाग वाचल्यावर त्यावर ढोबळ मानाने सकारात्मक वा नकारात्मक या दोन प्रतिक्रियांपैकी आधी कुठली मनात येईल त्यावरून त्या व्यक्तीला निदान आत्मपरीक्षणासाठी प्रवृत्त करता येईल का हा विचार मनात आला आणि आज या प्रकारे अलक लिहिण्याचा प्रयत्न केला. पहिल्या अलक मध्ये त्या कथेचे दोन शेवट कसे असू शकतील याची उदाहरणं सांगितली.
हा माझ्यासाठी एक प्रयोग होता. बऱ्याच मंडळींनी, वाचकांनी अगदी प्रामाणिकपणे नाकारात्मकताच मनात आली अशी प्रांजळ कबुली दिली. असं का असावं याचा विचार करू लागलो तेव्हा यामागे स्वतःचे अनुभव हा एक महत्वाचा घटक नक्की असू शकेल पण मला असंही वाटतं की सध्या एकंदरीतच माध्यमांमुळे जी नकारात्मकता संथ विषबाधेप्रमाणे समाजात मूळ धरू पाहते आहे त्याचा हा परिणाम नसेल ना? वास्तवतेचं चित्र म्हणून मालिकांमधून नकारात्मकता प्रदर्शित केली जात असेल त्याचा हा परिणाम असेल? तर इतक्या वाहिन्यांवरील इतक्या धारवाहिकांमध्ये इतकी नकारात्मकता लोक आवडीने पाहतात अगदी त्या आभासी कुटुंवाचा एक घटक होऊन जातात इतके भावनिक संबंध जोडले जातात तर मग त्या मालिकेमधील नकारात्मकतेचा परिणाम समाजावर होणार नाही असं म्हणता येईल का ? आणि आणि चॅनेलच्य TRP युद्धाचे आपण भावनिक बळी होत नाही ना याचा प्रस्तऐक व्यक्तीला स्वतःच स्वतःशी पडताळून पाहिलं पाहिजे. मला मनापासून वाटतं की जगात वाईटापेक्षा चांगुलपाणाचं प्रमाण खूप अधिक आहे पण नकारात्मकता सकारात्मकतेपेक्षा अधिक प्रक्षेपित केली जात आहे जे दुःखदायकही आहे आणि भीतीदायकही…
असो प्रत्येकाच्या अनुभवाप्रमाणे, परिस्थितीनुसार आणि मनोधर्मप्रमाणे विश्लेषणाला खूप वाव आहे पण या समाजात आणि वैयक्तिक मनात माध्यमांमुळे पसरणारी नकारात्मकता तरी आयुष्यातून हद्दपार करता आली तरी खूप फरक पडेल असं मनापासून वाटतं.
या अलक मी माझ्या कल्पनेनुसार पूर्ण केल्या त्या इथे मांडतो.
अलक ५०.१
त्याला बातमी कळली आणि तो लगोलग सरांच्या घरी पोहोचला. सर तपोवृद्ध तर होतेच , पण वयोवृद्धही होते. कधीतरी ही बातमी अपेक्षित होतीच. तो पोहोचला तेव्हा घराबाहेर लोक जमा झालेच होते. सर्वजण आनंदात होते कारण आज खरं तर सरांना बहाल होऊन पद्मश्री पुरस्कार सन्मानित झाला होता.
अलक ५०.२
तो विचारात गढून गेला होता. चेहऱ्यावर चिंता होती. अचानक त्याला लांबवर मुलाच्या रडण्याचा आकांत ऐकू झाला. त्याची तंद्री भंगली. पहिल्या अपत्याचं पाहिलं रडणं कानावर पडलं की पुरुषाचा बाबा होतो असं का म्हटलं जातं हे त्याला तेव्हा पटलं..
अलक ५०.३
तो परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी कॉलेजमध्ये गेला होता. त्याच्या हातात निकाल पडला. तो निकाल घेऊन तसाच बाहेर पडला रेल्वेच्या पुलावर त्याचे पाय थबकले. तो इंडियन रेल्वे सर्व्हिसेसची परीक्षा पास झाला होता. ज्या पुलाच्या दिव्याखाली त्याने अभ्यास केला होता त्या पुलाच्या पायऱ्यांवर मंदिरात जाण्याआधी डोकं टेकवलं त्यानं.
अलक ५०.४
त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ते एकमेकांशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नव्हते. एक दिवस बेल वाजली म्हणून त्याने दार उघडलं समोर ती उभी होती आणि हातात लग्नाची पत्रिका. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेचं डिझाईन तिला त्याला सगळ्यात आधी दाखवायचं होतं.
अलक ५०.५
तो आता निवृत्त झाला होता. सगळा व्यवसाय मुलाच्या हाती सोपवून मोकळा झाला होता. मृत्युपत्रही करून ठेवलं होतं. आता केवळ बँकेत सह्या बदलणं इतकंच राहिलं होतं. दुसऱ्या दिवशी लगोलग मुलगी आणि जावई घरी आले. सर्व इस्टेटीवर केवळ दादाचा हक्क आहे असा बदल बाबांनी मृत्युपत्रात करावा हे सांगणारं अफेडेविट त्यांच्या हातात होतं आणि ते पाहिल्यावर बाबांच्या डोळ्यात कृतकृत्यतेचे अश्रू तरळले…
खूप छान
सुरेख अलक.