
१६.१
दोन मित्रांची खूप गट्टी होती. ते नेहेमीच त्यांचं सगळं एकमेकात वाटायचे. त्या दिवशी दंगल झाली आणि त्यांच्याच समाजाने त्यांना मारून टाकलं. कारण मारेकऱ्यांनी फक्त कपडे पाहिले आणि त्यांचे रंग. त्यांना कुठून माहीत असणार त्या दोघींनी आदल्याच रात्री त्यांच्या आवडत्या ड्रेसची अदलाबदल केली होती एकदाच घालून पाहण्यासाठी.
१६.२
त्याचा भोंगा सुरू झाला की याच्या तेवढ्याच जोराने झांज आणि घंटा सुरू व्हायच्या. त्या दोघाही वेड्यांना हे कळलं नाही की यामुळे नुसताच गोंगाट वाढला, मूळचा प्रश्न सुटलाच नाही..
१६.३
एकाच गावाला जाणाऱ्या दोन रस्त्याचं भांडण झालं आणि त्यांनी एकमेकांना उखडून टाकलं. यात झालं इतकंच की लोक त्या गावाला जाण्यासाठी त्या दोन्ही रस्त्यांना टाळू लागले आणि गावही ओसाड पडलं. यात जास्त नुकसान कुणाचं झालं हे मात्र कुणालाच ठरावता आलं नाही.
१६.४
चौसष्ट घरात युद्ध खेळण्यासाठी आपणहून पुढे सरसावलं खरं पण एकावेळी एकच घर चालण्याची आपली हैसीयत आहे हे त्या प्याद्याला कळलं नाही पण खरी शोकांतिका ही होती की त्याच्या मागे उभ्या असलेल्या राजाला अस वाटत राहिलं की हे प्यादं समोर उभं राहून आपलं संरक्षण करील आणि म्हणून तोही चेकमेट होई पर्यंत जागचा हलला नाही.
१६.५
त्याला खूप नटवलं सजवलं, त्याचं खूप कौतुक करून त्याची प्रतिमाही उंचावायचा प्रयत्न झाला पण पोपटच तो , शिकवलेल्या वाक्यांपालिकडे तो बोलूच शकत नव्हता त्याला तो तरी काय करणार बिचारा !