
१०.१
तो नेहेमी एका प्रार्थनास्थळाबाहेर लोकांच्या चपला सांभाळायचा. पण त्याला आत जाताना कधी पाहिलं नाही. त्याला विचारलं तर तो म्हणाला. प्रत्येक माणसात ‘तो’ आहे तर मी आत जाऊन अजून वेगळं असं पादुकांचं दर्शन काय घेणार ?
१०.२
प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या इच्छेने होत असते असं लहानपणापासून त्याचे वडील त्याला सांगत आले. पण जेव्हा डॉक्टर म्हणाले ,” आता आशा नाही. वडलांना व्हेंटिलेटरवर ठेवायचं की काढायचं हे तुम्ही ठरवा” तेव्हा ईश्वराची इच्छा काय हे त्याला ठरवता येईना.
१०.३
भिकू रात्रभर जागून शिणून अड्ड्यावरची दारू सगळीकडे पोहोचती करी. त्यातून मिळालेल्या पैशातून त्याने आणलेली शाळेची पुस्तकं एकदा त्याच्या बापाने दारूसाठी विकून टाकली. लहानग्या भिकुला ठरवता येईना दारू चांगली की वाईट?
१०.४
एक फकीर एकदा एके ठिकाणी उभा राहून हवा विकत होता. कुणी कुचेष्टेने विचारलं,” बाबा कोण विकत घेणार तुमच्याकडून हवा?” त्यावर तो उत्तरला,” ज्याला कुणीच पाहिलं नाही वा अनुभवलं नाही त्या उपरवाल्याला विकून लोकांनी बंगले बांधले. मी दुनियेला जिवंत ठेवणारी हवा तरी विकतोय!”
१०.५
सीमेच्या अलिकडून आणि पलिकडून एकाचवेळी दोन गोळ्या सुटल्या, दोन मुलं अनाथ झाली , दोन स्त्रिया विधवा झाल्या आणि दोन घरं उध्वस्त. त्याचवेळी राजधानीत पुन्हा त्याच जुन्या कागदावर पुन्हा एकदा नवीन दोन सह्या झाल्याचा आनंद दोन पांढरी कबुतरं आकाशात उडवून व्यक्त झाला.