
८.१
एकदा एका ठिकाणी पाहिलं की खूप संगणक त्यांच्या समोर बसलेल्या माणसांना खेळवत होते. एका संगणकाला विचारलं काय करतो आहेस ? तर तो उत्तरला. आमच्या आभासी बुद्धीचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर करून माणसाची बुद्धी वाढवायचे प्रयोग चालले आहेत.
८.२
एका संतांच्या तीर्थक्षेत्राला गेलो असता तिथल्या एका विविधवस्तू भांडारात जाण्याचा योग आला. मी सहज चौकशी केली,”सर्वात जास्त काय खपतं इथे?. दुकानदार म्हणाला “प्रसादाची पाकिटं”. मी अधिक कुतूहलाने विचारलं,” आणि सर्वात कमी?”
तो उत्तरला,”त्या संतांच्या प्रवाचनांची पुस्तकं”
८.३
तो नेहेमीच खरं बोलायचा. एकदा एका कॅन्सर झालेल्या लहान मुलाने त्याला विचारलं,”मी बरा होईन ना?” “होशील रे बाळा” असं उत्तर देऊन तो निघून गेला. आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोलला म्हणून त्याचं मन त्याला खात होतं. नंतर कळलं त्या दिवसापासून त्या मुलाची तब्येत सुधारायला लागली होती.
८.४
त्याचा महिन्याचा पगार दीड लाखाचा दोन लाख झाला. तिचाही एक लाखाचा दीड झाला. दोघांनी एकत्र आनंद साजरा करायचं ठरवलं आणि ते नवराबायको जवळजवळ दोन वर्षांनी प्रत्यक्ष भेटले एकमेकांना.
८.५
“मला सारखं सारखं भेटायला नाही आवडत तुला.” असं ओघळून जाताना एक अश्रूचा थेंब पापणीला म्हणाला. त्यावर पापणी त्याला म्हणाली,” अस असेल तर मग विठुरायाचं दर्शन होतं त्यावेळी का येतोस न बोलावता?”