७.१
एकदा शिष्य गुरूंना विचारतो,” गुरुजी एखाद्या माणसाच्या विचाराची खोली कशी ओळखायची?”
गुरुजी म्हणतात,” तो स्वतःविषयी किती बोलतो यावरून”
“आणि उंची?” शिष्य विचारतो.
गुरुजी उत्तरतात,” तो इतरांविषयी कसं बोलतो यावरून”
७.२
काल माझ्या मित्राचा मेसेज आला,”काय करतोयस आत्ता? कंटाळा आलाय. कट्ट्यावर भेटूया?” मी मेसेज लिहिला,”नाही जमणार खूप बिझी आहे”
त्यानं ,” बरं” असा मेसेज टाकला आणि तो शेजारून उठून निघून गेला .
७.३
दोघांचं लग्न होतं. त्यानं खूप खरेदी केली. तिनं त्याच्याही पेक्षा अधिक खरेदी केली. मग दोघेही अनाथालयात गेली आणि त्यांच्या सगळ्या नातेवाईकांचं रीतसर मानपान करून मग लग्न केलं त्यांनी सगळ्यांच्या आशीर्वादाने.
७.४
माझ्या एका फौजी मित्राच्या उघडलेल्या कपड्याच्या बॅगेत एक तिरंगा नीट घडी करून ठेवलेला पाहिला. मी हसत विचारलं “इतकी देशभक्ती?” तोही हसत उत्तरला,” तसं नाही रे, कधी लपेटायची वेळ आली तर साथीदारांना मिळायला सोपा जावा म्हणून ठेवतो बरोबर नेहमी”
आणि मला वाटायचं माझ्या व्यवसायात मी खूपच रिस्क घेतो!
७.५
एकदा भावांच्यात वाटणी झाली. त्यांनी खूप प्रयत्न केले पण सामायिक तळ्यातल्या पाण्यावर विभाजनाची रेषच उमटेना त्यांच्याकडून.



