
नुकताच घडलेला एक प्रसंग. मी रेल्वेमधून प्रवास करत होतो. माझ्यासमोरच एक ‘ज्येष्ठ नागरिक’ या गटात मोडणारी व्यक्ती बसली होती. (हल्ली केश-कलपाच्या काळात कुणाला ‘वृद्ध’ म्हणायला धीर होत नाही. त्यापेक्षा ‘ज्येष्ठ नागरिक’ हा अधिक मनमिळावू आणि कमी भोचक शब्द हल्ली रूढ झाला आहे तोच वापरतो) तर त्या ज्येष्ठ नागरिक व्यक्तीने आपल्या पाऊच मधून त्यांचं श्रवणयंत्र बाहेर काढलं आणि आपल्या कानाला लावलं. ते यंत्र इतकं सुबक आणि छोटं होतं की त्यांनी ते लावलं आहे हे लक्षात देखील येत नव्हतं. मला या गोष्टीचं खूप अप्रूप वाटलं म्हणून कुतूहल म्हणून त्यांना त्या यंत्रबद्दल विचारलं. ती ज्येष्ठ व्यक्ती स्वभावाने खूप खुसखुशीत होती. त्यांनी आपल्या शैलीत त्या यंत्राबद्दल सांगायला सुरुवात केली. त्या श्रवणयंत्राचे फायदे आणि त्यांनी ते कुठून घेतलं इत्यादी. ते श्रवणयंत्र त्यांच्या स्मार्ट फोनशी कसं संधान बांधतं, त्याचप्रमाणे त्यांच्या मनगटावर बांधलेल्या स्मार्टवॉच च्या माध्यमातून ते त्यांच्या स्मार्टफोनवर कसे कॉल घेऊ शकतात आणि ते त्यांना त्यांच्या या स्मार्ट श्रवणयंत्रामुळे कसे सहजी ऐकू येतात इत्यादी माहिती त्यांनी सांगितली आणि मला थोडं प्रात्यक्षिकही दाखवलं. नंतर ते म्हणाले, “तुला या श्रवणयंत्राची सर्वात महत्वाची खुबी सांगू?” हे विचारताना त्यांच्या चेहऱ्यावर आणि आवाजात एक मिश्किल भाव होता. आता काहीतरी खुसखुशीत ऐकायला मिळणार या अपेक्षेने मी होकारार्थी मान डोलावली. “या स्मार्टवॉचला एक बटन आहे ते दाबल्यावर या श्रवणयंत्रातून मला काहीही ऐकू येत नाही. बायकोशी बोलताना या बटणाचा इतका उपयोग होतो की विचारायची सोय नाही म्हणून याला ‘वाईफ म्युट बटन’ असं म्हणतात. या एका खुबीपायी मी हे श्रवणयंत्र आणि त्याबरोबरच स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच ऍप मी लगेच डाउनलोड केलं” हे ऐकून मी आणि ती ज्येष्ठ व्यक्ती आम्ही दोघेही मनापासून मोठ्याने हसलो. मला माहित आहे की हे वाचत असताना सर्व नवरोबांना त्या ज्येष्ठ नागरिकबद्दल आपलेपणा, आपल्याकडे असं मशीन का नाही ही खंत, आणि हे मशीन ताबडतोब कुठे मिळेल हे कुतूहल या तीनही भावना जागृत झाल्या असतील. आणि स्रीवर्गाचा ‘वाईफ म्युट बटन’ ही कल्पना ऐकून खरं तर मनोमन हसू येऊनही मला रोष पत्करावा लागेल याची शक्यता आहे. पण मुळात ती संकल्पना माझी नसल्याने मी केवळ इथे याचा संदर्भ देत असल्याने माझं हे पातक माफ केलं जाईल याची मला खात्री आहे. असो.
तर त्या व्यक्तीबरोबर हा इतकाच संवाद झाला आणि माझं स्टेशन आलं म्हणून मी रेल्वेतून उतरलो. या प्रसंगातील गमतीचा भाग सोडून देऊ पण मला त्या ज्येष्ठ व्यक्तीबरोबर बोलत असताना आणि नंतर घडलेल्या प्रसंगावर विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही की त्या व्यक्तीने म्हातारपणामुळे आलेल्या शारीरिक मर्यादांवर मात करण्यासाठी,आपलं दररोजचं जीवन सुखावह करण्यासाठी, आपल्या स्वतःला स्वावलंबी, स्वयंपूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आणि त्यामुळे उपलब्ध झालेल्या सुविधांचा किती छान उपयोग करून घेतला आहे. मी जेव्हा माझ्या आजूबाजूला तंत्रज्ञानाचा बागुलबुवा करून त्यापासून दूर पळणारी ज्येष्ठ नागरिक मंडळी मी पाहतो तेव्हा मला कधीतरी आश्चर्य वाटतं आणि दुःखही. कुठलीही गोष्ट जेव्हा नवीन असते त्यावेळी तिला आपलंसं करणं कठीण असतंच. आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक गटात सामील झाल्यावर नवीन तंत्र आणि तंत्रज्ञान शिकणं नक्कीच थोडं जड जात असेल हे मला मान्य आहे. पण रेल्वे मध्ये भेटलेल्या त्या ज्येष्ठ व्यक्तिप्रमाणे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी हळू हळू, प्रयत्नांनी, मुला-नातवंडांच्या मदतीने नवीन तंत्रज्ञान आपलंसं केल्याची उदाहरणंदेखील मी पहिली आहेत.
तसं पाहिलं तर आता ज्येष्ठ नागरिक झालेल्या भारतातील एका पिढीने तर लाकडाच्या चुलीपासून ते मायक्रोवेव्हपर्यंतचा प्रवास याची देही याची डोळा पहिला आहे. पूर्वी पत्र आठवड्यानी मिळायची त्याजागी आता व्हिडीओचॅट करून ज्येष्ठ नागरिक मंडळीं आपल्यापासून दूर असणाऱ्या आपल्या मुला- नातवंडांशी क्षणार्धात बोलू शकत आहेत. त्यामुळे हे नक्की की तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवन अधिक आरामदायी, आल्हाददायी होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो हे अनुभवलं ही आहे. म्हणून आवश्यक आहे ते ” मला नाही बुवा काही कळत तुमच्या त्या मोबाईलमधलं” असं न म्हणता ज्येष्ठांनी पूर्वीच्याच उमेदीने नवीन तंत्रज्ञान जसं जमेल तसं आत्मसात करून, नवीन मोबाईल तंत्रज्ञानाबद्दलच्या आपणच आपल्या मनात निर्माण करून मोठ्या केलेल्या बागुलबुवाला आपल्या मनातून आणि आयुष्यातून हद्दपार करणे.
पूर्वी वय झालं की ज्येष्ठ नागरिकांच्या हातात ज्ञानेश्वरी यायची. माणसाच्या अध्यात्मिक सौख्याचा मार्ग ज्ञानेश्वरी जवळ केल्यामुळे मोकळा होतो असं म्हणतात. आता जसा काळ बदलतो आहे त्याबरोबर वेगवेगळ्या उपकरणांद्वारे उपलब्ध असलेली नवीन काळातील ‘तंत्रज्ञानेश्वरी’ आपलीशी करून आपलं जीवन शारीरिक, मानसिक भावनिक पातळीवर अधिक सुसह्य आणि समृद्ध होऊन म्हातारपणामुळे निर्माण होणारा तक्रारीचा सूर कमी होऊन मला रेल्वेमध्ये भेटलेल्या ज्येष्ठ व्यक्तिप्रमाणे अधिक आनंदी खुसखुशीत जीवन ज्येष्ठ नागरिक व्यतीत करू शकतील असं मला नक्कीच मनापासून वाटतं.