
हिंदी भाषेतील एक दंतकथा ठरून गेलेले प्रतिभावान कवी गुलजार यांचे काही स्वैर शेर वाचनात आले.. वेगवेगळे शेर एकत्र करून एकसंध काव्य करण्याचा हा प्रयत्न आहे. यातील बहुतांशी कल्पना या कवी गुलजार यांच्या आहेत हे इथे नम्रपणे नमूद करतो. गुलजार साहेबांच्या कल्पनांवर आधारित ही कविता असल्याने याला गुलछडी असं नाव दिलं आहे. त्या शेरांचा एकत्रितपणे केलेला हा मराठी भावानुवाद आपल्याला आवडेल ही आशा आहे.
आयुष्याच्या घटना ऐशा घडून आल्या।
जीवन थोडे थोडे मजला शिकवत गेल्या।।धृ।
वयात आलो नव्हतो म्हंणुनी बालपणीच्या,
इच्छा काही खट्टया मिठठ्या राहून गेल्या।
वय हे आता सरले म्हणुनी वृद्धपणीही,
इच्छा काही खट्टया मिठठ्या राहून गेल्या।।१।।
किती जाहल्या, कुणामुळे अन कारण त्यांचे,
सोडून दे तू चिंतन माझ्या या जखमांचे।
उत्तर केवळ एक मागतो अरे जीवना,
प्रवासात या किती यातना शिल्लक उरल्या।।२।।
गर्व यशाचा ठेऊन थोडे ताठर व्हावे,
उगा कुणाहीपुढे कशाला फुका झुकावे।
झुकणाऱ्याची कदर कुणाला नसते वेड्या,
पायघड्याही झुकलेल्या पाठींच्या झाल्या।।३।।
निकट मानले त्यांच्यावरती रुसवे फुगवे,
त्याच्यापरते सगळ्यांमध्ये उगी राहावे।
जरी सर्व हे क्षम्य युद्ध अन प्रेमामध्ये,
पिढ्या आपसामधे लढूनी वाया गेल्या।।४।।
दुःखाचीही एक अदा मज विस्मित करते,
सहन करे त्याच्यावरती ते मोहित होते।
मिळते इतके तरी मोजतो मानव वेडा,
कुठल्या जिनसा मिळायच्या त्या राहून गेल्या।।५।।
चूक एकदा झाली परतुन पुन्हा न करणे,
नकोच देवाजीला जीवन पुन्हा मागणे।
इच्छाही या चावट त्यांनी दगाच केला।
पूर्ती होता होता त्याही बदलुन गेल्या।।६।।
कधीतरी तक्रार कराया आलो मीही,
देवापुढची रांग पाहुनी भ्यालो मीही।
अरे जीवना तुझी शहाणा म्हणून ख्याती।
घटिका हातातून तुझ्याही गळून गेल्या? ।।७।।
ग्रंथ वाचुनी झाले कोणी असोत साक्षर।
शब्दावाचून ना कळले तर तेच निरक्षर।
उघडी ठेवा मैत्रीच्या कप्यांची दारे।
बंद कोठड्या जळमट लेऊन थिजून गेल्या।।८।।
मूळ कल्पना : कवी गुलजार
भावानुवाद : राजेंद्र वैशंपायन