कौशल्यांचे उरवडे – ०५ डिसेंबर २०१८

/ / marathi

साधारण काही काळ लोटला की काही घरातील फ्रिजची धोक्याची पातळी उलटते. म्हणजे ‘आता मज सोसवेना भार’ या स्थितीकडे तो फ्रिज जायला सुरवात झालेली असते. एकावर एक भांडी, वाट्या, वाडगे, इत्यादींच्या एकमेकांच्या साहाय्याने शक्य असलेल्या सगळ्या तोल सांभाळण्याऱ्या रचनांचे नमुने तिथे उपस्थित असतात. जरा धक्का लागला तर ती सर्व सर्कस केव्हा खाली कोसळेल याचा नेम नसतो. बरं “किती भरलाय फ्रिज !”  म्हणण्याची टाप म्हणा, छाती म्हणा, धैर्य म्हणा, माचो म्हणा घरातील समस्त पुरुषवर्गापैकी एकाकडेही नसतं. त्यामुळे शक्यतो तो सीमाप्रश्न दुरूनच हाताळण्याचं किंवा टाळण्याचं धोरण असतं. आणि त्यातून पुरुष मंडळी जर त्या एकंदरीत परिस्थितीत आरोपी किंवा दोषी असतील तर ती केस सोडवण्याऐवजी केसच्या तारखांवर तारखा घेण्याकडेच अधिक कल असतो हे वेगळं सांगायला नको. बरं फ्रिजमधील जिन्नस म्हणाल तर, वाटीभर भात, ब्रेडचे दोन चार तुकडे, अगदी चार चमचेच राहिलेली एखाद-दुसरी भाजी, दोन चार चमचाभर कोशिंबिरी, एखादी चुकलेली म्हणून घरी कुणी न खाल्ल्याने अधिक मात्रेत उरलेली भाजी, थोडं सांबार किंवा वरण, विरजण घालण्यासाठी ठेवलेली ताकाची बुडकुली, गुलाबजाम संपून राहिलेला आणि सुधारस किंवा साखरी शंकरपाळे या सारख्या तारीख नसलेल्या दीर्घकालीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत असलेला साखरेचा पाक, शेजारच्या मावशींनी त्यांच्या घरी बरंच राहिलेलं आणि म्हणून आठवणीनी “भावजींना आवडतं , म्हणून मुद्दाम दिलं  हो !!” या टायटलखाली दिलेलं इतर कुणालाच न आवडणार असं कुळथाचं पिठलं, कधीतरी दूध नासल्यावर ‘घरच्या घरी पनीर करू’ म्हणून ठेवलेला दुधाचा साका, एक ना अनेक विविधांगी वस्तूंनी तो फ्रिज दिसामाजी भरत जातो आणि एक दिवस तो ओतप्रोत किंवा तुडुंब भरून वाहण्याच्या स्थितीत येतो.

मग एकदाचा रविवार येतो आणि तो पर्यंत रेटत नेलेली सहनशक्ती ज्याची पहिली संपेल ती व्यक्ती फुटते. एकत्र कुटुंबपद्धतीत ही फुटण्याची वारंवारता अधिक असते आणि ही व्यक्ती म्हणजे साधारणत: घरातील रिटायर्ड पण अंगात थोडी शक्ती असणारा पुरुष जातीचा ज्येष्ठ नागरिक असतो. “घरात कुणाचं म्हणून लक्ष नाही” या ठाम मतानेच ही व्यक्ती घरात वावरत असते . आणि “आता मलाच काहीतरी केलं पाहिजे” या घराच्या कळवळ्या अंतर्गत मग तावातावात सगळी फ्रिजमधली भांडी न पाडता कसरत करत बाहेर ओट्यावर किंवा टेबलवर मांडली जातात. एकीकडे तोंडाने, “हा बाबा आदमच्या वाढदिवसाला केलेला गुलाबजामचा पाक काय कलंकी अवताराच्या नामकरण विधीला वापरणार का?” असे प्रश्न विचारले जातात. आतील भाज्यांच्या आणि जिनसांच्या तारखांची इतिहासातील बखरींमधून सनावळ्या वाचल्यासारखी उधळण होते. ” १८५७ मध्ये तात्या टोपेंच्या घोड्याला घालून उरलेले छोले आहेत वाटतं !” किंवा “अरे चवीला म्हणून कुळथाचं पिठलं इतकं देतात का? घरी संपत नाही तर आहे हा इथे बैल संपवणारा, असं वाटत का यांना? देतात आणून आपले भावजींना कुळथाचं पिठलं आवडतं म्हणून उरलेलं सगळं”  इत्यादी वाक्यातून सात्विक संताप उचंबळत असतो. हे सर्व सुरु असताना घरतील ज्येष्ठ नागरिकच, पण निवृत्त न झालेली स्त्री मात्र शांत आहे हे पाहून तर पारा अधिकच चढतो. “यांची कामं करा, यांचे फ्रिज साफ करा, पण एक कप कोणी चहा विचारेल तर शपथ !” हे वाक्य म्हणजे आता डोक्यावरून पाणी गेलं आहे आणि हस्तक्षेपाची वेळ झाली आहे याची ज्येष्ठ नागरिक स्त्रीला सूचना असते आणि मग ती स्त्री “राहूदे तुम्ही आता, मी बघते, तुम्ही बसा बाहेर मी चहा आणते” असं म्हणून एकंदरीत परिस्थितीवर पडदा टाकते. पण या वेळपर्यंत ज्येष्ठ नागरिक पुरुषाने फ्रिज पूर्ण रिकामा केला आहे ना ! याची खात्री मात्र चाणाक्षपणे करून मगच चहाचं पांढरं निशाण उभं करते हेही इथे नमूद करणे आवश्यक आहे.

‘वरील सर्व वर्णन हे काल्पनिक असून आमच्या किंवा कुणाच्याही घरातील कुठल्याही व्यक्तीशी त्याचा काहीही संबंध नाही आणि तसा तो आढळ्ल्यास तो निव्वळ योगायोग समजावा’ असा वैधानिक इशारा देऊनही मी हे नक्की सांगू शकतो की ज्याच्या घरी फ्रिज आहे त्याच्या घरी असा किंवा तत्सम प्रसंग घडला नाही असं घरच विरळा. आमच्या घरी फ्रिज रिकामा करणे हा कार्यक्रम जेव्हा होतो तेव्हा आमच्याकडे एक अतिशय पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ केला जातो ज्याला आम्ही “उरवडे” असं म्हणतो. या वड्याच्या पिठात, फ्रिजमधील खराब न झालेली कुठलीही खाद्य किंवा पेय वस्तू वर्ज नसते.  अळूची पातळ भाजी किंवा भोपळी मिरचीची भाजी किंवा तत्सम जर त्यात असेल तर त्या मिश्रणाची चव किती अमृतासमान होते हे वर्णनातीत आहे. हा केवळ प्रत्यक्ष कृतीचा आणि तदनंतर अनुभूतीचा भाग आहे हे मी नमूद करू इच्छितो. ज्यांना हा प्रकार अखाद्य किंवा अतर्क्य वाटत असेल तर त्यांच्यासाठी हा विषय वर्जच आहे अशी एक सूचना इथे मुद्दाम देतो. शेवटच्या भातात आमटी, ताक, थोडं लोणचं आणि ताटातील उरलेली भाजी इत्यादी पदार्थ एकत्र करून ज्याला कोकणात ‘अंबोण’ म्हणतात तसं रसभरीत मिश्रण तयार करून शेवटचा भात खाण्याच्या कल्पनेने ज्यांना अंगावर शहारे येतात अशा कमकुवत मनाच्या आणि बोथट जाणिवांच्या लोकांसाठी हे वर्णन नाही याचीही वाचकांनी विशेष नोंद घ्यावी.

तर जेव्हा हे उरवड्याचं षड्रसमिश्रण तयार होतं आणि त्यात बेसनाचं पीठ, किंवा कॉर्न फ्लोर घालून ते मिश्रण कढईत गरम झालेल्या तेलात तळण्यासाठी तयार होतं तेव्हा माझी उत्कंठा दिवाळीच्या फराळाच्या चकलीच्या पहिल्या घाण्याइतकीच ताणली गेलेली असते.  त्या उरवाड्याचा वास सगळीकडे घमघमतो आणि जेव्हा पहिला घाणा बाहेर येतो आणि तो गरमागरम नुकताच तळणीतून बाहेर आलेला पहिला उरवडा तोंडात घालून वाफ बाहेर घालवत घालवत खाल्ला जातो त्या वेळी तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या हुंकाराची तुलना ही एखादी सुंदरशी तान एक छान वेलबुट्टी काढून समेवर येते तेव्हा, ” आहा ! क्या बात है” हा जो सहजोद्गार बाहेर पडतो त्याच्याशीच करता येईल.
या उरवड्याचं मला जाणवलेलं एक वैशिष्ट्य आहे. इतक्या नाना चवीच्या, नाना पोताच्या , नाना प्रकृतीच्या पदार्थांना एकत्र सामावलेलं असलं तरी या नवीन निर्माण झालेल्या पदार्थाचा आपलाच एक वेगळाच स्वाद असतो. त्या ‘उरवाड्यात’ मग भोपळी मिरची, किंवा अळूच्या पातळ भाजीची चव लागतच नाही. तिथे असतो विसंगत चवींचा, एकत्र आल्यानंतरचा निर्माण होणारा एक सुसंगत मिलाफ. ते असतं मुख्यपदार्थाच्या उरलेल्या शिळवडीतून उद्भवलेलं एक नवनिर्माण. ती असते अशी निर्मिती जी पुन्हा एका सारखी दुसरी होत नाही. एकदा केलेल्या उरवाड्याची चव आयुष्यात एकदाच.  दुसऱ्यांदा नाही. दुसऱ्यावेळी त्याच उरवड्यांची दुसरीच चव. प्रत्येकवेळी नवनिर्माण तितकंच विसंगत पदार्थांनी घडलेलं पण तितकंच साजरं गोजरं आणि चविष्ट.

हे उरवडे खाता खाता मला एक असं जाणवलं की उरवड्यांचा आणि माणसाच्या आयुष्याचा खूप निकटचा संबंध आहे. माणसाकडे बरीच कौशल्य असतात.  काही लहानपणापासून अंगात भिनवलेली, काही कालानुरूप निर्माण झालेली, आणि काही आजूबाजूच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली. त्यातली काही अंगभूत तर काही ठरवून अंगात भिनवलेली आणि काही तर आपल्याही नकळत अंगात भिनलेली. या निर्माण झालेल्या कौशल्यांपैकी काहीच कौशल्य उपजीविकेची किंवा चरितार्थाची म्हणून विशेषत: वापरली जातात. मला माणसात निर्माण झालेली ही कौशल्यं स्वयंपाकातील पदार्थांसारखी वाटतात. त्यातली काही कौशल्य उदरभरणासाठी वापरली जातात, काही वापरून उरलेली असतात आणि काही न वापरताच ठेऊन दिलेली असतात आणि काही अशी की जी कधीतरी वापरून नंतर ठेऊन दिलेली असतात आयुष्याच्या डीप फ्रिजमध्ये पुढे कधीतरी त्याचा उपयोग होईल म्हणून त्या गुलाबजामच्या पाकासारखी. माझं असं निरीक्षण आहे की बऱ्याच जणांना आपल्यातली उदरनिर्वाहासाठी मिळवलेली कौशल्य तर माहित असतात पण कितीतरी कौशल्य अशी असतात की जी आपल्यात आहेत हे जाणवतच नाही.  किंवा जाणवली तरी त्यांना ती पुरेशी किंवा उपयोगी आहेत की नाही याबद्दल शंका असते. किंवा काही डीपफ्रीज केलेली कौशल्य अशी असतात की जी बाहेर काढायलाही भीती वाटते किंवा संकोच वाटतो.
मी दोन्हींचा अनुभव स्वतः घेतला आहे. मी जेव्हा नोकरी करत होतो तेव्हा माझ्या अंगातली फक्त काहीच कौशल्य मी वापरत होतो. पण नोकरी सोडून जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरु केला तेव्हा असं लक्षात आलं की नकळतपणे मी माझ्या संदर्भाने कौशल्यांच्या उरवड्यांची ही संकल्पना माझ्या व्यावसायिक जीवनात वापरात आणलेली होती. लक्षात आलं की माझ्या आयुष्याच्या फ्रिजमधली सगळी कौशल्य, व्यवसाय उभा करण्याच्या दृष्टीने आधी मी शोधून बाहेर काढली आणि  कमी आधी दर्जाची का असेना, कमी अधिक प्रभुत्वाने मला ती का जमेनात, पण माझ्याकडची सगळी कौशल्य शोधून ती सगळी माझ्या व्यवसायापुरती एकत्र आणली. उदाहरणार्थ लहानपणी लोकांचं निरीक्षण करून त्यांच्या नकला करणे हे एक कौशल्य निर्माण झालं होतं की ज्याचा उपयोग आता मुलांचे अनिमेशनपट तयार करताना मला निरनिराळी पात्रे उभी करण्यासाठी होतो. खरं तर ते लहानपणी अंगात भरलेलं कौशल्य कधी उपयोगाला येईल असं स्वप्नात पण नव्हतं पण आता त्याचा खूप उपयोग होतो आहे.  तात्पर्य असं की अशा प्रकारच्या सगळ्याच कौशल्यांच्या एकत्रित वापरातून दररोज नवीन निर्माण होणाऱ्या उरवड्यांची चव मी अजूनही इतक्या वर्षांनंतरही तितक्याच ताजेपणाने चाखतो आहे हे मी स्वानुभवाने छातीठोकपणे सांगू शकतो. मी आयुष्यात जे जे शिकलो, अंगी ज्या ज्या ‘नानाकळा’ जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे निर्माण झाल्या त्या सगळ्याच्या सगळ्या माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात हे ‘कौशल्याचे उरवडे’ करण्याच्या कामी आल्या आणि ज्या मुळे केवळ माझा व्यवसायच नाही तर माझं आयुष्यही दररोज अधिक अर्थवाही, अधिक उत्कंठावर्धक आणि अधिक परिपूर्ण झालं आणि “आहा ! क्या बात है!” या हुंकाराने भरून गेलं .

मग मला प्रश्न पडला की जे माझ्या बाबतीत घडू शकलं ते प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत घडू शकेल का? तर मला त्याचं उत्तर होकारार्थी मिळालं. एवढंच कशाला तर समाजातही वावरताना आपली अंगभूत कौशल्ये समाजाच्या दुसऱ्या घटकांबरोबर एकत्र येऊन जर वापरली गेली आणि त्यात प्रमाचं किंवा आपुलकीचं कॉर्नफ्लोर घातलं तर अधिक नाविन्यपूर्ण आणि खूप अनपेक्षित पण चविष्ट अशा ‘सामाजिक उरवड्यांची’ नवनिर्मिती होऊ शकेल या बद्दल मला तरी पूर्ण खात्री आहे.

गम्मत अशी आहे की कुणी उरवडे करण्याची पद्धत विचारली तर पद्धत सांगता येईल पण त्यातील पदार्थांचं प्रमाण विचारलं तर ते सांगणं खूप कठीण होऊन बसेल. तसंच मला कुणी विचारलं की हे वैयक्तिक कौशल्याचे उरवडे करायचे असतील तर कुठली कौशल्य किती प्रमाणात लागतील तर ते सांगणं अवघड आहे. कारण शेवटी ज्याचं त्याचं आयुष्य, ज्याचा त्याचा फ्रिज, ज्याची त्याची शिळवड आणि ज्याचे त्याचे स्वतःचे उरवडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *