
गेल्याच आठवड्यातली गोष्ट. माझ्या रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये एका शाळेच्या वार्षिकोत्सवासाठी काही मुलांच्या नाटिका ध्वनिमुद्रित करणं
सुरु होतं. त्या शाळेचे, ती नाटिका बसवणारे शिक्षक आणि दहा पंधरा मुलं, अशी स्टुडिओ मध्ये आली होती. आठवी ते दहावी अशा
उच्चमाध्यमिक वर्गातील सगळी मुलं होती. रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये येण्याची त्यांची पहिलीच वेळ होती म्हणून काहीशी भांबावलेली पण
प्रचंड कुतूहलाने ती मुलं स्टुडिओतल्या सगळ्या गोष्टी पाहत होती. माझ्या स्टुडिओच्या स्वागतकक्षामध्ये संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांचं
गाण्यात किंवा वाजवण्यात विभोर असताना काढलेल्या फोटोंच्या तसबिरींचं एक शिल्प आहे. त्या शिल्पातील तसबीरी आणि त्यातील
संगीत क्षेत्रातील दिग्गजांकडे बऱ्याच वेळ पाहून त्यांचं निरीक्षण करून झाल्यावर स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या
तसबिरीकडे बोट दाखवून एका मुलाने अचानक मला प्रश्न विचारला, “सर, ये अंकल कौन है?” हा प्रश्न मला थोडा अनपेक्षित आणि
माझ्यासाठी आश्चर्यजनक होता. पण तरीही मी शांतपणे सांगितलं की “ये भारतरत्न पंडित भीमसेन जोशी है” त्यामुलाचा पुढचा प्रश्न, “ये
क्या करते है?” पुढचा अनपेक्षित आणि थोडा अधिक धक्कादायक प्रश्न. मी उत्तर दिलं “ये बहोत महान गायक थे. उन्हे स्वरभास्करका
किताब मिला था.” इतकं ऐकूनही त्या मुलाच्या चेहेऱ्यावरच प्रश्नचिन्ह काही पुसलं गेलं नव्हतं. त्याचा पुन्हा एकदा प्रतिप्रश्न “इतने बडे है तो
MTV पर नही दिखे कभी?” मी या धक्क्यातून सावरत नाही इतक्यात दुसऱ्या मुलाचा पंडित रविशंकर जी यांच्या तसबिरीकडे पाहून पुढचा
प्रश्न, “सर ये गिटार बजाने वाले अंकल कौन है?” आता मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकत होती. तरी शक्यतो सावरत मी उत्तर दिलं,
“ये भारतरत्न पंडित रविशंकर है, और वोह जो बजा रहे है वो गिटार नही सितार है। ये भी बहोत महान कलाकार थे” या पुढचे धक्के
अनुभवायला लागू नयेत म्हणून मी सगळ्यांना, “चलो अंदर, रेकॉर्डिंग शुरू करते है” असं म्हणून स्टुडिओत पिटाळलं.
गम्मत म्हणजे जी गोष्ट बाहेर तीच रेकॉर्डिंगच्या वेळी सुद्धा. बरोबर असणारे शिक्षक इंग्रजीचे अपेक्षित बोबडे शब्दोच्चार
(Pronunciation) अगदी नीट यावेत म्हणून जीवाचं रान करत होते. पण हिंदी, मराठी आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ यासारखी काही सोपी
संस्कृत वचनं यांच्या होत असलेल्या चुकीच्या बोबड्या शब्दोच्चाराकडे मात्र कानाडोळा करत होते. त्यांना मी थोडं हटकलं आणि नमुद केलं
तर उत्तर आलं,”सर, इंग्लिश मिडीयम स्कूल है। हिंदी, मराठी, संस्कृतमे मिस्टेक चला लेते है, पर इंग्लिशपर सबका ध्यान बराबर रेहेता है।
वहापर थोडीभी गलती नही चलती.” या संभाषणानंतर मात्र माझ्यात मानसिक त्राणच उरले नाहीत. मी काही न बोलता काम पूर्ण केलं आणि
ती सगळी देशांतर्गत गहूवर्णीय फॉरेनर जनता निघून गेल्यावर मीच मनातल्या मनातच हुश्श केलं.
त्या दिवशीच्या या अनुभवाने मला दिग्मूढ केलं. अंतर्मुख केलं. संगीत क्षेत्रातल्या या दोन महान भारतरत्नांना माझ्या पुढची सुशिक्षित,
शहरी समजली जाणारी पिढी ओळखू शकत नाहीये. पण त्याच पिढीला पाश्चात्य जगात काय चाललंय याची खडान खडा माहिती आहे. या
पिढीला इंग्रजी गाणी तोंडपाठ आहेत अगदी त्याच्या पाश्चात्य उच्चरांसह पण त्याच मुलांना रामरक्षा किंवा हनुमानचालिसा पाठ नाही.
इतकंच नाही तर शिक्षकही या संदर्भात जागृत नाहीत ही खेदाची गोष्ट वाटली मला. वाटलं संस्कृती म्हणून कुठे चाललोय आपण?
आजूबाजूला सगळीकडे पाहिलं तर पोशाखापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सगळीकडेच गहूवर्णीय फॉरेनर दिसू लागलेत हल्ली. फॅशन या
नावाखाली घातली जाणारी वेशभूषा, रंगबिरंगी केशभूषा, आणि बर्गर पिझ्झा यांच्या दुकानातली वाढती गर्दी पहिली की मी नक्की कुठल्या
देशात राहतोय असं वाटत कधी कधी. पूर्वी हातावर कपाळावर गोंदलेलं असलं तर खेडूत समजायचे त्या व्यक्तीला पण त्याच गोंदण्याचं
आता ‘टॅटू’ हे नामकरण झाल्यावर काही काहींनी तर शरीरावरचा एक चौरस इंच भागही ठेवला नाहीये मोकळा. मराठी माध्यमातून शिकून
‘तर्खडकरी’ सुस्पष्ट इंग्रजी बोलणाऱ्या आमच्या पिढीच्या कुठल्याच युवकाला पाश्च्यात्य जगताने वाळीत नाही टाकलं कधी. आई वडिलांना
‘मदं-फादं’ च्या ऐवजी अगदी रामरक्षेतल्या ‘रं’ च्या सुस्पष्ट उच्चरासह ‘मदर-फादर’ असा जरी शब्दोच्चार केला तरी फासावर गेलं नाही
कुणी. उलट उत्तम यशस्वी झाले सगळे पाश्च्यात्य देशात. आमचे राम, कृष्ण, भरत, शत्रुघ्न हे अकारांतच राहिले जन्मभर. त्यांचे ‘रामा’,
‘क्रिश्ना’, ‘भर्ता’, ‘शत्रुघना’ असं रूपांतर झालं नाही कधी. मी जगभरात फिरलो. जपानी माणूस जपानी शब्दोच्चारांसह इंग्रजी बोलतो,
चायनीज माणूस चायनीज शब्दोच्चारांसह इंग्रजी बोलतो. तसेच युरोपमधल्या बऱ्याचशा मंडळींच्या इंग्रजीत त्यांच्या मूळ मातीचा गंध दडलेला असतो. आणि या बद्दल कणभरही लाज वाटत नाही त्यांना. आणि अगदी तसाच्या तसा अमेरिकन किंवा ब्रिटिश शब्दोच्चार करण्याचा ते प्रयत्नही करत नाहीत. आणि या बद्दल त्यांना काहीच संकोच किंवा कमीपणा वाटत नाही.
मग प्रश्न पडतो की भारतीयांनाच आपली स्वतःची ओळख सोडायची काय एवढी घाई झाली आहे? आपली भाषा, आपली वेशभूषा, आपली
राहणी, आपलं तत्वज्ञान, आपलं साहित्य, आपलं संगीत, आपले सणवार, आपली परंपरा याबद्दल अभिमानानं बोलायचं सोडून उलट ते
सोडून दिल्याचा अभिमान का बाळगतो आपण? मला असं वाटायला लागलय की इंग्रज 1947 पूर्वी भारतात ‘ऑन साईट’ राहून राज्य
करायचे आणि आता अमेरिकन नवीन मॉडर्न कॉर्पोरेट सारखे ‘वर्किंग फ्रॉम होम’ करून राज्य करत आहेत बहुतेक! कारण त्यांनी
आपल्याला एका दृष्टीने त्यांच्या अंकित, गुलाम करूनच ठेवलय जणू, एका वेगळ्याच पद्धतीनं मानसिक पातळीवर. आणि तेही आपल्या
नकळत.
या परिस्थितीवर तोडगा म्हणून मी माझ्यापुरतं यासंदर्भात काही वागणं बदलण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत जी अष्टसूत्री ठरवली आहे
ती अशी;
१. मी कुठल्याही प्रकारची भीड न बाळगता मराठी गंधयुक्त इंग्रजी बोलण्याची लाज वाटून घेणार नाही.
२. शक्यतो माझ्या मायबोलीची भाषा समजणाऱ्यांबरोबर माझ्या मायबोलीतच शक्यतो बोलण्याचा प्रयत्न करणार, पण कुठलाही ‘स्वदेशी’
अभिनिवेश न आणता
३. पाश्चात्य चांगलं ते घेणार आणि आपलं तेही राखणार.
४. पुढच्या पिढीला मागच्या पिढीतल्या महानुभावांशी जोडण्याचा प्रयत्न करणार.
५. आधुनिक तंत्रज्ञान वापरून परंपरा जतन करणार.
६. आपल्या संस्कृतीचा उज्ज्वल, वैभवशाली भूतकाळ मनात ठेऊनच काळाच्या पुढे पावलं टाकायचा प्रयत्न करणार.
७. आपल्या संस्कृतीच्या पायाभूत रचनेला अबाधित ठेऊन त्याचा गाभा समजून घेऊन पुढच्या पिढीला तो वारसा हस्तांतरित करण्याचा
प्रयत्न करणार.
८. भाषासमृद्धी आणि संवर्धन यासाठी माझ्या परीने मूल्यवर्धन करण्याचा प्रयत्न करणार.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्या भारतरत्न महानुभावांची मी स्वतः माहिती करून घेणार, त्यांच्याविषयी त्यांच्या
कार्याविषयी मी स्वतः जाणून घेणार आणि त्यांना पुढच्या पिढीचे ‘अंकल’ किंवा ‘आंटी’ होण्यापासून वाचवण्याचा मनःपूर्वक प्रयत्न
करणार…