कॉंटिनेंटल नैवेद्य- २ ऑक्टोबर २०१७

/ / marathi

आमच्या घराजवळच्या एका संस्थेमध्ये गणपतीमध्ये विसर्जनाच्या आदल्या दिवशी महाआरती असते. लहानपणी आम्ही त्या दिवसाची अगदी वाट पाहत असू. बेंबीच्या देठापासून ओरडून गायल्या जाणाऱ्या वीस पंचवीस आरत्या, ढोल , ताशे, टाळ, मृदंग, रिंगण, फुगड्या, नाच, गजर अशी धमाल असायची. असायची कशाला अजूनही असते. आणि अगदी खरं सांगायचं तर लहानपणी पाहायचो तशी अजूनही मी त्या महा-आरतीची वाट पाहतो. त्या सगळ्या आनंदाचा परमोच्च बिंदू काय? असं जर कोणी मला विचारलं तर मी अजूनही सांगेन की आरतीनंतर मिळणारा कॉंटिनेंटल प्रसाद. साधारण पंचवीस तीस घरातून वेगवेगळ्या चवींचे, वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य त्या दिवशी गणपतीबाप्पाच्या सामोर दाखवले जातात. अगदी बटन इडली पासून ते ‘फाय स्टार’ चॉकलेट पर्यंत आणि कॉर्नभेळेपासून ते पुरणाच्या कडबूपर्यंत काहीही त्यादिवशी त्या प्रसादाच्या ताटलीत असू शकतं. तो वेगवेगळ्या चवींचा गोपाळकाला बोटं चाटून शेवटच्या कणापर्यंत खाणं यापुढे पंचतारांकित हॉटेलचं कॉन्टिनेन्टल फूड फिकं पडतं हे मी स्वानुभवाने छातीठोकपणे सांगू शकतो. ‘फाय स्टार’ चॉकलेट चा सोनेरी बार हा देवाचा नैवेद्य कसा असू शकेल असा विचार ना लहानपणी मनाला शिवला ना आताही शिवत.

असाच एक प्रसंग माझ्याच घरात घडलेला. आपण जे जे खातो त्याचा देवाला मनातल्या मनात नैवेद्य दाखवावा आणि मग खावं असं माझ्या मुलाला एकदा तो लहान असताना सांगितलं. बस, त्या दिवसापासून त्याचं आणि देवाचं डील झाल्यासारखं प्रत्येक गोष्ट देवाला नैवेद्य दाखवूनच पठ्ठा खाऊ लागला. त्यात आमच्या देवाने नैवेद्य म्हणून मॅगी खाल्ली, चीझ सँडविच खाल्लं. सकाळी सिरीयल, उपमा, मऊभात खाल्ला, बोर्नव्हिटा प्यायला, आणि अजून काय काय खाल्लं असेल ते त्या परमेश्वरासच ठाऊक. एक दिवस तर छानपैकी आम्लेटचा नैवेद्य देवाला मिळाला. त्याला मी म्हटलं अरे देव आम्लेट खाईल का रे? त्यावर त्याचा निरागस प्रश्न की “आपण खातो तर देव का नाही खाणार?” मीही त्याला अन्नाचे सात्विक, राजसी व तामसी इत्यादी प्रकार समजावले नाहीत आणि तामसी अन्नाचा नैवेद्य देवाला दाखवू नये वगैरे सांगण्याच्या भानगडीतही पडलो नाही. कारण एकतर या सगळ्या शास्त्राच्या गोष्टी समजण्याचं त्याचं वयही नव्हतं आणि मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात हे प्रश्न मलाही पडत होते. आमच्या ओळखीत एका घरी दररोज न चुकता केवळ आणि केवळ साखरेचा नैवेद्य देवाला दाखवला जायचा आणि नंतर ती साखर कधी कधी प्रसाद म्हणून मला मिळायची. त्याही वेळी माझ्या मनात विचार यायचा की नेहेमी नेहेमी साखर खाऊन मला कंटाळा येतो तर देवाला कंटाळा येत नसेल का? इतक्या घरची इतकी साखर खाऊन देवाला डायबिटीस कसा होत नाही? देवाला नसेल का वाटत की थोडी व्हरायटी असावी?

आताही विचार मनात येतो की नैवेद्य म्हणजे तरी नक्की काय? का दाखवायचा देवाला नैवेद्य? मी एकट्याने नाही दाखवला देवाला नैवेद्य तर काय बिघडलं ? या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की कुठलीही गोष्ट आपण ग्रहण करण्यापूर्वी देवाची आठवण करणं म्हणजे नैवेद्य. माझ्याकडे जे आहे ते त्याच्या कृपेने आहे ही जाणीव ठेऊन ‘त्याचं त्याला अर्पण करणं’ म्हणजे नैवेद्य. थोडं पुढे जाऊन मला तर असं वाटतं की त्याने आपल्या ओटीत, जे उदरभरणाचं यज्ञकर्म करण्यासाठी मुक्तहस्ताने बहाल केलेलं हविर्द्रव्य आहे ते ग्रहण करण्यासाठी त्याची परवानगी मागणं म्हणजे नैवेद्य. कारण ज्याने अनंतकोटी ब्रह्मांड निर्माण केली, एका दाण्यापासून शेकडो दाणे निर्माण करण्याचं ज्याचं सामर्थ्य, जो प्राण, अपान, व्यान, उदान आणि सामान युक्त अन्न पचवतो तो साक्षात वैश्वानर, सृष्टीचं अन्नचक्र युगानुयुगं चालवणारा असा तो परमेश्वर आपल्या दूधसाखरेच्या नैवेद्यासाठी आसुसला असेल? कोट्यवधी मुखांनी जगभर जेवणाऱ्या ईश्वराला खाद्यपदार्थाची काय कमी आहे हो?

मग प्रश्न असा पडतो की, हे जर मानलं तर देवाला नैवेद्य दाखवायचा तरी कशाला? उत्तर मिळालं की देवाला नैवेद्य दाखवायचा कारण तो थांबलेला असतो खऱ्या भक्ताने मनापासून अर्पण केलेल्या एका फळासाठी, एका फुलासाठी, किंवा अगदी चमचाभर पाण्यासाठी सुद्धा. तो थांबलेला असतो तुलेच्या वेळी सोन्याने भरलेल्या पारड्यात रुक्मिणीमातेने शेवटी ठेवलेल्या एका तुळशीच्या पानासाठी. तो थांबलेला असतो एखादा नामदेव दररोज येऊन जेऊ घालेल याची वाट पाहत. तो थांबलेला असतो सुदाम्याच्या पोह्यांसाठी. तो थांबलेला असतो शबरीच्या बोरांसाठी. किंवा कोण जाणे तो थांबलेला असेल एखादवेळी कोणीतरी अगदी निरागस मनाने, मनापासून आठवण ठेऊन, मनानेच देऊ केलेल्या आम्लेटसाठी सुद्धा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *