देवाची सुट्टी – ५ नोव्हेंबर २०१७

/ / marathi

काही काही दिवस असे असतात की काहीही न करता आळसात दिवस घालवणे हाच दिवासभराचा प्लॅन असतो.
साधारणतः असं सद्भाग्य क्वचित एखाद्या रविवारी किंवा एखाद्या सुटीच्या दिवशी मिळतं. त्यात घरातली सगळी
मंडळी बाहेर गेलेली असली तर सोनेपे सुहागा!! एकदा एक असाच सोनियाचा दिवस उजाडला. खरं सांगायचं तर त्या
दिवशी अंमळ उशिराच उजाडला. म्हणजे सूर्यदेव मध्यान्ह रेषेवरून थोडा पुढेच कलला होता. आदल्या रात्री थोडा उशिरा
झोपलो असल्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे गजर बंद करून झोपलो. घरात कुणीच नसल्यामुळे
कुणी उठवण्याचाही प्रश्न नव्हता. मग काय निद्रादेवींबरोबर बराच वेळ वार्तालाप झाला. जाग आल्यानंतरही तसाच पडून
राहिलो गादीत. अर्थात, घरात कुणीच नसल्याचा एक तोटा मात्र असा होता की पहिल्या चहापासून दिवसभरात सगळ्या
उदरभरणाची चिंता मलाच करायची होती. शेवटी गादी सोडली आणि मुखमार्जनादी कार्यक्रम करून एक झकास चहा
करून, चहा बरोबर मस्का खारी आणि समोर वर्तमानपत्र असा जामानिमा करून शांतपणे पेपर वाचायला सुरुवात केली.
रविवार पुरवणी सकट सगळं वर्तमानपत्र अक्षर आणि अक्षर वाचून काढलं. “अजून किती वेळ पेपर वाचणार आहेस? खूप
कामं पडली आहेत करायची” असा बाह्यससेमिरा त्यादिवशी आजूबाजूला नसल्यामुळे वर्तमानपत्र जरा मन लावून
वाचायला मिळालं. पेपर संपल्यावर पुढे काय असा प्रश्न पडला. आळशीपणाच करायचा असं त्या दिवशी ठरवल्यामुळे
अंघोळ हा विषय ऑपशनला जाणं साहजिकच होतं. पण लक्षात आलं की अंघोळ नाही म्हणजे देवाची पूजा राहील.
घरच्या देवाची पूजा हे काम माझ्या कार्यपरिघात असल्यामुळे ती करणं माझी जबाबदारी होती आणि तसंही केवळ मीच
घरात असल्यामुळे ते माझ्याच अखत्यारीत येणार होतं. मग मी एक ऐतिहासिक निर्णय घेतला की आज घरच्या देवाला
पण सुट्टी द्यायची. मनाला समजावलं की माझ्यासारखं देवाला वाटत नसेल का की आज सुट्टी घ्यावी? अशा
परिस्थितीत तर आपला युक्तिवाद आपलं मन चटकन ऐकतंच. मग मनाशी ठरवलं आणि खरंच त्या दिवशी मी पूजा न
करता घरच्या देवांना सुट्टी द्यायचं ठरवलं.
बस ! मग काय आता पूजाच करायची नाही म्हटल्यावर अंघोळीचाही प्रश्न नव्हता. आणि नंतरची दुपार मी मला हवं ते
करण्यात घालवली. एक छान सिनेमा पाहिला टॅबवर, तोही गादीत पडल्या पडल्याच. मग उडप्याकडे चायनीज ची
जेवायची ऑर्डर दिली. (उडप्याकडे चायनीज? पण असो तो एक वेगळा विषय आहे !!.). मग चायनीजवर ताव मारून
पुन्हा चहा मग पुन्हा गादीतच एक छानसं पुस्तक मग पुन्हा चहा. या अशा पद्धतीने संध्याकाळ झाली. दिवे लागणीची
वेळ झाली आणि मग मात्र मन बेचैन झालं. मनात आलं देवासमोर संध्याकाळचा दिवा नाही लावायचा? उदबत्ती लावून,
श्री लक्ष्मीला घरात येण्यासाठी, घरातल्या बाजेवर येऊन बसण्यासाठी शुभंकरोती नाही म्हणायचं? रामरक्षा,
मारुतीस्तोत्र नाही म्हणायचं?…
देवाला सुट्टी द्यायची हे ठरवून सुद्धा मनाला कससंच व्हायला लागलं. काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं,
अपराध्यासारखं. आळसापुढे मी त्या बेचैनीला चेपून टाकलं होतं दिवसभर पण तिन्हीसांजा झाल्यावर मात्र मनात काहूर
उठलं. न राहवून गरम पाणी काढलं अंघोळ केली आणि गोरज मुहूर्तावर देवाची साग्रसंगीत पूजा केली. पूजा झाल्यावर
खूप बरं वाटलं आणि मग त्यावेळी लक्षात आलं की देवाची पूजा ही देवासाठी नसतेच मुळी ती असते माझ्यासाठी. घरची
पूजा झाली नाही आणि म्हणून अपराधी वाटलं तर तो माझ्या संस्काराचा भाग झाला. पण पूजा न झाल्यामुळे चुकल्या
चुकल्यासारखं, काहीतरी हरवल्यासारखं वाटलं तर मात्र तो देवावरच्या माझ्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा भाग असतो.
घरातले संस्कार म्हणून लहानपणी पूजा करायला, शुभंकरोती रामरक्षा म्हणायला सुरुवात होते. कंटाळा येतो त्या वयात
पूजेचा आणि रामरक्षेचा. पुढे शिंग फुटल्यावर त्या कंटाळ्यात विज्ञाननिष्ठ विचार, पुढारलेले आचार इत्यादी

भानगडीपण डोकं काढतात. त्यावेळी डोक्यात प्रश्न पडतात पण समर्पक उत्तरं न मिळाल्यामुळे शेवटी पूजा हे एक
नावडीचं काम होऊन जातं आणि रामरक्षा ही संध्याकाळी वेळ मिळत नाही या सबबीखाली आयुष्यातून नाहीशी होते.
पूजा कंटाळवाणी का वाटते? शुभंकरोती, रामरक्षा आपलीशी का नाही वाटंत याचा खोलवर विचार केल्यावर लक्षात आलं
की पूजेतलं सौंदर्य, रामरक्षेतला गोडवा समजवलाच जात नाही कित्येक वेळा. पूजेचा, रामरक्षेचा मानसशास्त्रीय आणि
शास्त्रीय आधारच समजून घेतला नाही कधी आणि यंत्रमानवासारखी पूजा केली आणि पोपटासारखी रामरक्षा म्हटली
तर प्रेम कसं लागेल त्याचं ?
हे लक्षात आल्यावर मी एकदा एक प्रयोग करायचं ठरवलं. पूजा करताना नेहेमीचे मंत्र वा स्तोत्र न म्हणता ठरवलं की
गप्पा मारायच्या देवाशी अगदी मित्राशी मारतो तशा. आणि गंमत म्हणजे असं केल्यावर त्यादिवशी पूजा कधी संपली हे
कळलंच नाही आणि मन पण थोडं मोकळं झालं. मनात एक प्रकारची शांती दाटली. आपल्याला आवडणाऱ्या कुठल्यातरी
बुजुर्ग व्यक्तीशी बोलल्यावर जसं वाटतं तसं वाटलं पूजा संपल्यावर. विचार आला की हाच अनुभव घेणे हीच पूजेची
प्राथमिक फलश्रुती नाही का ?
प्रयोगाचा हा अनुभव घेतल्यावर तर देवाच्या पूजेत अजूनच मजा यायला लागली. मित्र भेटल्याची भावना ठेऊन पूजा
करताना देवाशी मस्त गप्पा मारू लागलो. कधी मग त्या गप्पात कामाच्या ठिकाणी समोर असलेली आव्हानं, समस्या
आणि त्यावर मी काय उपाय योजना करायचं ठरवलं आहे इत्यादी बोलायचं. कधी नजीकच्या भूतकाळातली घडलेली
एखादी चांगली वाईट घटना सांगायची, त्यावर माझी प्रतिक्रिया, विचार बोलून दाखवायचा. वर्तमानपत्रातील बातमी
असेल, एखादं नुकतंच वाचलेलं छान पुस्तक असेल, त्याविषयी बोलायचं, किंवा यासारखं माझ्या आयुष्यातील काहीही.
पण एकच नेम ठेवला की जे बोलेन ते सकारात्मक बोलेन. समस्याही सकारात्मकतेने मांडेन. कटकट नाही करणार
देवाच्या कानाशी… गम्मत सांगतो, असं करताना, गप्पांच्या ओघात मला कधीतरी समस्यांवरचे तोडगे सुचायचे,
गोष्टीचे वेगळे अर्थ उलगडायचे. बंदीशीच्या सुरावटी किंवा कवितेचे शब्द स्फुरयचे. आताही मी लिहीत असलेल्या
लेखांमधील काही विषय असेच पूजा करताना सुचले आहेत.
आता मी पूजा चुकवत नाही शक्यतो. पण आता ती मी माझ्या सवडीने करतो, सवड काढून करतो. कारण वेळ नाही
म्हणून झटपट आवरली तर माझ्या देवाबरोबरच्या गप्पांचा वेळ कमी होतो आणि पूजेत मजाच येत नाही. एखाद दिवशी
काही कारणाने झाला गोरज मुहूर्त पूजेला तर देवासमोर उभा राहतो, भेटायला यायला का उशीर झाला याचं कारण
सांगतो, देवाला सॉरी म्हणतो. आणि मग पूजा आणि त्या दिवशीच्या गप्पा एकदम सुरु करतो.
देवाबरोबरची सख्यभक्ती म्हणजे असंच असेल का काहीतरी ? ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *