
माझ्या कार्यक्रमांच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने खूप ठिकाणी प्रवासाचा योग येतो. प्रवास करून नंतर छान गरम पाण्याचा शॉवर हा एक परमानंद देणारा कार्यक्रम असतो. एकदा असंच जवळजवळ 10 तासांच्या प्रवासानंतर खूप रात्री उशिरा मुक्कामी पोहोचलो. नियोजकाने माझी राहण्याची सोय, काही कारणाने हॉटेल मध्ये न करता कुणाच्या तरी घरी केली होती. त्या यजमानांनी सर्व सोय खरोखर अप्रतिम आणि अतिशय आपुलकीनं केली होती. त्यांनी माझी खोली मला दाखवली, स्नानगृह दाखवलं, गरम पाणी कसं मिळेल हेही दाखवलं. रात्री खूप उशीर झाला होता. म्हणून त्यांना अधिक त्रास होऊ नये या विचारांनी मी माझ्या यजमानांना (होस्टना) आराम करायला सांगितला. “काही लागलं तर आम्हाला जरूर उठवा हं.” असा त्यांनी प्रेमाचा आग्रह केला. आणि ‘गुड नाईट’ म्हणून आम्ही आपापल्या खोलीत समाविष्ट झालो.
माझ्या सवयीने मी एक छानसं स्नान करायला स्नानगृहात शिरलो आणि लक्षात आलं की मी माझी प्रवासातली शॅम्पूची बाटली विसरलो होतो. आता आली का पंचाईत!! 10 तासांच्या प्रवासानंतर केसांना तर शॅम्पूची तहान लागली होती आणि ती कशी भागवायची या चिंतेत मी पडलो. बाहेरगावी इतक्या रात्री दुकानं उघडी मिळणं शक्य नव्हतं. यजमानांना केवळ शॅम्पूसाठी उठवावंसं वाटेना. शॅम्पूशिवाय अंघोळ करवेना. आणि अंघोळीशीवाय झोपवेना. अशी काहीतरी विचित्र अवस्था झाली होती.
त्या चमचाभर शॅम्पूसाठी किती जीवाची तगमग झाली माझ्या?
आणि अचानक मला आठवलं, माझ्या बॅगच्या बाहेरच्या खणात मी एकदा शॅम्पूचा 1 रुपयावाला पाऊच काही दिवसांपूर्वी पहिला होता. माझ्या दृष्टीने अतिशय नगण्य म्हणून पूर्णपणे दुर्लक्षित असणारा तो पाऊच आज मात्र या क्षणी सुवर्णमोलाचा होता. मी आधाशासारखी माझ्या बॅगची चेन उघडली आणि मला तो पाऊच दिसला. “आजी म्या ब्रह्म पाहिले” ही अनुभूती काही कोटयांश प्रमाणात मला त्या वेळी आली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. माझी त्यांनंतर शॅम्पू इत्यादी उपचारांनी षोडशोपचार अंघोळ झाली आणि मी शांतावलो.
नंतर मात्र, विचार करताना माझी मला एक गोष्ट अशी जाणवली की बऱ्याचवेळां आपल्याला नगण्य वाटणाऱ्या गोष्टी आजूबाजुला खूप असतात. त्या आपल्याजवळ असतात म्हणून आपल्याला त्या नगण्य वाटतात आणि गंमत कशी असतें पहा, बऱ्याचवेळा एखाद्या गोष्टीचं महत्व, ती गोष्ट मिळाली नाही की अधिक जाणवतं. मग तो शुद्ध प्राणवायू असो, गोड पाणी असो, हातात असणारा वेळ असो, आपल्या सुहृदांचा सहवास, त्यांचं प्रेम असो किंवा त्या प्रसंगामधील नाट्यनायक, एक चमचाभर शॅम्पू असो. त्या गोष्टी आयुष्यातून निघून गेल्यावर त्यांचं महत्व आपल्याला कळतं.
दुसरी गोष्ट ही लक्षात आली की आपलं समाधान खरं तर किती लहान लहान गोष्टींवर अवलंबून असतं. त्या प्रसंगात तो 1 रुपयावाला छोटा पाऊच मला किती समाधान देऊन गेला? पण या लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांना अध्यारूत धरून आपण किती छोटे छोटे समाधानाचे क्षण अनुभवण्यापासून वंचित राहतो!
आणि तिसरी गोष्ट ही जाणवली की कुणीच नगण्य नसतं. महत्व प्रसंगाच असतं गोष्टींचं नव्हे.
या प्रसंगानंतर मला माझ्या आजूबाजूला असणारे असे समाधानाचे 1 रुपयावाले पाऊच शोधून काढून त्यांना जपून ठेवायची सवय लागली आहे. कारण त्यांचं माझ्या आयुष्यातलं नसणं मला तरी परवडणारं नाही, आत्ता ते अगदी कितीही नगण्य वाटले तरीही…