सात्विकतेची जबरदस्ती – २५ नोव्हेंबर २०१७

/ / marathi

स्थळ हॉस्पिटलचा एक वॉर्ड. संध्याकाळची वेळ. प्रसंग असा की माझे एक नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते
आणि त्यामुळे मी ​त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबतीसाठी म्हणून हॉस्पिटलमध्ये थांबलो होतो. मी आणि ​माझे नातेवाईक
असलेल्या खोलीतच एक दुसरा रुग्ण आणि त्याचा नातेवाईक हे दोघेही होते. संध्याकाळी जवळजवळ दोन तासांच्या
व्हीजिटिंग आवर्स मध्ये त्या खोलीत त्या ​दुसऱ्या रुग्णासाठी जमलेल्या लोकांची अखंड बडबड चालली होती. माझ्या
नातेवाईक रुग्णाचं आणि माझं असं दोघांचंही डोकं त्या जमलेल्या गोतावळ्याच्या अखंड बडबडीमुळे दुखू लागलं होतं.
दोन चार वेळा नर्सने सांगूनसुद्धा जमलेल्या मंडळींच्या आवाजाच्या पातळीत फार फरक पडला नव्हता. व्हीजीटिंग
आवर्स असल्यामुळे नर्सना पण फार काही करता येत नव्हतं. आम्ही नाईलाजाने कसेबसे ते दोन तास काढले आणि वेळ
संपल्यावर तो गोतावळा बाहेर गेला आणि आम्ही दोघांनी हुश्श केलं. ​पण इथे संपलं नव्हतं. ​संध्याकाळची वेळ होती
म्हणून​ असेल कदाचित पण त्या दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईका​ने ​नामस्मरण करणारं मशीन बाहेर काढलं आणि त्या
रुग्णाजवळ ते मशीन ठेऊन दिलं आणि ते मशीन ​खोलीत सगळीकडे मोठयाने नामस्मरण पसरवू लागलं.
नामस्मरणाच्या महतीबद्दल किंवा त्याच्या अद्भुत परिणामांबद्दल ​माझ्या ​मनात तिळमात्रही शंका नाही. पण
मनापासून सांगतो की त्या क्षणाला ​त्या ​नामस्मरणाच्या आवाजाचाही त्रास होऊ लागला आणि शेवटी ते बंद करावं किंवा
निदान हेडफोन लावून रुग्णाला ऐकवावं असं मी त्या व्यक्तीला सुचवावं का ​असं मनापासून वाटत होतं. ​ती वेळ
माझ्यावर आली नाही कारण ​काही कारणाने ​लवकरच त्याने ते ​मशीन ​बंद केलं आणि तीनेक तासांच्या चिलबिलाटानंतर
एकदा त्या खोलीत शांती प्रस्थापित झाली आणि आम्हीही शांतावलो.
या नामस्मरणाच्या मशीनचीसुद्धा गम्मत असते. नामस्मरणाच्या मशीनचे आणि त्या मशीन वापरणाऱ्यांचे पण बरेच
नमुने पाहण्यात आले. ​एका मशीन मध्ये साधारणतः २१, ५१ किंवा १०१ असे देवांचे जप असतात. जप बदलण्यासाठी
स्विच असतो. वाद्यमेळाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या सांगीतिक गायत्री मंत्रापासून, साडेसातीपासून मुक्ती देणाऱ्या
शनिमंत्रापर्यंत सर्वच मंत्र त्या मशीनमध्ये असतात. काही मशीनमध्ये तर मशीनने जप किती केला हे मोजण्यासाठी
काउंटरही असतो. ऐकणारेही ऑफिसमध्ये, ट्रेनमध्ये, बसमध्ये हे मंत्र ऐकत असतात. स्मार्टफोनच्या रिंगटोन पासून
घराच्या डोअरबेल पर्यंत कुठेही हे मंत्र हल्ली कानी पडतात. हे सगळे प्रकार बघितले की मनात येतं की या प्रकारच्या
मशीन वापरून केलेल्या नामस्मरणातलं किती नाम अंतःकरणापर्यंत पोहोचत असेल? आणि दुसरं हे की नामस्मरण हे
मशीनमार्फत करण्याची गोष्ट आहे का?
​यावर असा युक्तिवाद असू शकतो की नामस्मरण कसंही कानावर पडलं तरी त्याचा परिणाम होतोच. आणि ते मला
मान्यही आहे. तसंच, कलियुगात उद्धार होण्यासाठी नामस्मरण हा उपाय आहे असं सगळ्याच​ साधुसंतांनी
सांगितलंही आहे. ​शिवाय वैयक्तिक किंवा सामूहिक नामस्मरण हे नामस्मरणाचे दोन्ही प्रकार सर्वमान्य​ही​ आहेत.
​पण​ नामस्मरण करताना ‘आवडीने भावे हरिनाम घेसी’ हे घडणं अपेक्षित नाही का नामस्मरण आवडीने आणि भाव
ठेऊन नामस्मरण करणाऱ्याचं मन तिथे असणं अपेक्षित नाही का? मशीनमधून सुरु असलेलं नामस्मरण ऐकलं की मला
तर कधी कधी फिल्टरचं मशीन सुरु करून नळ सोडून भांड्यात पाणी घेतात तसं काहीसं गमतीदार चित्रच डोळ्यासमोर
येतं.
जी गोष्ट नामस्मरणाच्या मशीनची तीच गोष्ट देवस्थानातल्या प्रसादाची. देवस्थानी दर्शनाला गेल्यावर देवाला नैवेद्य
न दाखवता परस्पर दुकानातून रेवड्या, पेढे, साखरफुटाणे, शेंगदाणे, चॉकलेट, बत्तासे, बुंदीचे लाडू विकत घेऊन ते प्रसाद
म्हणून भक्तांनी माझ्या हातावर आणून ठेवले की तो प्रसादाचा आग्रह​ त्यांचं मन मोडू नये म्हणून मान्य करतो मी.
पण त्यावेळी वाटत की ​या अशा विकत आणलेल्या प्रसादाचा कसला आग्रह ?

​मग असं लक्षात आलं की अशी सात्विकतेची जबरदस्ती ​सुरूच असते सतत आपल्या आजूबाजूला. मग ती सकाळी
साडेपाचला साखरझोपेतून उठवणारी बांग असो, मंदिरात आरतीच्यावेळी वीस पंचवीस घंटा आणि मशीनने वाजवलेला
नगारा यांचा गोंगाट असो. गणपतीच्यावेळची सार्वजनिक मंडळात द्यावी लागणारी वर्गणी असो, बिल्डिंग मधल्या
सत्यनारायणाचा उरलेला आणि वाया जाऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशी वाटण्यात येणारा रव्याच्या शिऱ्याचा प्रसाद असो
किंवा लोकलमधून प्रवास करताना रेल्वे भजनीमंडळांचा, रेल्वेच्या डब्याचा तबला, आणि लोखंडाच्या हाथ धरण्याच्या
कड्यांच्या चिपळ्या आणि झांजा करून मोठमोठ्याने केलेल्या भजनाचा कार्यक्रम असो किंवा दररोज सकाळी
जीवनाच्या तत्वज्ञानाचे न चुकता पर्सनल प्रोफाइलवर फॉरवर्ड केलेले भक्तिपूर्ण व्हाट्सऍप संदेश असो. किंवा
आपल्याला न विचारता व्हाट्सऍपच्या एखाद्या भक्ती ग्रुपमध्ये आपल्याला समाविष्ट केलेलं असो. अशा जबरदस्तीने
लादलेल्या सात्विकतेचा भडीमार होतच असतो.
​असं का होत असेल याचा विचार करताना मग उमगलं की एकंदरीतच सध्या सुरु असलेल्या ट्रेंडप्रमाणे भक्ती हाही एक
इव्हेंट झाला आहे. भक्ती करण्यापेक्षा भक्ती करताना दिसणे अधिक महत्वाचं झालं आहे. ज्याची भक्ती अधिक दिसेल
तो अधिक श्रद्धाळू किंवा ‘पोहोचलेला’ अशी समजूत होऊ लागली आहे. भक्तीची दिशाच चुकली आहे. बाह्यअंगाने सुरु
होऊन अंतर्मुख होण्याऐवजी भक्ती अधिकाधिक बहिर्मुख होत चालली आहे.
हा कलियुगाचा महिमा असेल असं म्हणू कदाचित. यावरचा उपाय श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सांगितला
आहे. ते म्हणत असत की, ‘जग सुधारण्यासाठी वेगळ्या विभूती जन्माला याव्या लागतात, थंडी पडलेली असली की
जगाला उब देण्याचा प्रयत्न करू नये. आपल्याला थंडी वाजली की आपण बंडी घालावी.’ म्हणून मी तरी माझी
सात्विकता माझ्यापुरती सीमित ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्यापुरती बंडी घालण्याचा प्रयत्न करतो.
हे लिहिताना एका गोष्टीचं स्मरण झालं. माझे चिंतनपर लेख मी ज्या सुहृदांना व्हाट्सअँप वर पाठवतो त्यांना जर ते
नको असतील तर माझ्या ब्रॉडकास्ट लिस्ट मधून त्यांचं नाव वगळण्याची सूचना मला जरूर करा. मी हमी देतो की तशी
प्रामाणिक सूचना करणाऱ्या व्यतीचे आणि माझे सबंध यात काही बिघाड येणार नाही कारण माझ्या चिंतनाची लोकांवर
जबरदस्ती करण्याची माझी तरी अजिबात इच्छा नाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *