
मागच्या आठवड्यात सलूनमध्ये गेलो होतो केस कापायला. रविवार असल्यामुळे बरीच गर्दी होती आणि माझा नंबर दोन गिर्हाईकांनंतर लागणार होता म्हणून तिथेच बसलो. माझ्यासमोर एकाची दाढी कोरणे, एकाची दाढी करणे आणि एकाचं फेशिअल अशी तीन कामं चालली होती. ज्याचं फेशिअल चाललं होतं त्याच्याकडे जरा कुतूहलाने पहात होतो. बराच वेळ बरीच क्रीम्स तो सलूनवाला त्या गिर्हाईकच्या चेहेऱ्यावर लावून मसाज करत होता. दरम्यान अधिक माहिती कळली की वेगवेगळ्या समारंभांना वेगवेगळी क्रीम लावून वेगवेगळ्या किमतीची फेशिअल करतात. कॉर्पोरेट फेशिअल वेगळा, ब्राईडल फेशिअल वेगळा इत्यादी.. जवळजवळ तासभर तो फेशिअलचा प्रकार सुरू होता. जेव्हा फेशिअल पूर्ण झालं तेव्हा त्या गिर्हाईकाच्या चेहऱ्यात त्याचा चेहरा थोडा स्वच्छ झाला यापलीकडे मला तरी फार फरक झालेला दिसला नाही पण त्या माणसाने मात्र आरशात स्वतःकडे वेगवेगळ्या अँगलने बघत आपण तेजःपुंज झाल्याचा आविर्भाव चेहऱ्यावर आणला होता. त्या सलूनवाल्यानेही त्या गिर्हाईकच्या नितळ कांतीचं कौतुक करून ‘दोन दिवस थांबा अजून उजळेल’ असा बोनस सल्लाही दिला. आणि तो सगळा प्रकार पाहून मी स्वतःशीच थोडा हसलो. मला एकदम काही लग्नांची आठवण झाली. ब्राईडल मेकअप या नावाखाली नवरीमुलगी आणि तिच्या सयाबया आणि कधीतरी नवरोबाही आपल्या चेहऱ्याची जी अवस्था करतात ते पाहून हसावं की लाजावं ते कळत नाही. बर इतकं होऊन ‘छान दिसतेस किंवा दिसतोस हं !’ असंही साळसूदपणे आणि उत्साही चेहऱ्याने म्हणावं लागतं. त्यामुळे तो ब्राईडल चेहराही थोडा सुखावतो आणि फेशिअलला त्याने मोजलेली किंमतही त्याला वसूल झाल्यासारखं वाटतं.
मी त्या सलूनमधल्या फेशिअलवाल्याला हसलो खरा पण मी अलगद माझ्या मनात डोकावलो. मी त्या माणसाला का हसलो? मी दिवसरात्र कुठलीतरी फेशिअल करत असतोच ना! . कधी आदर्श मुलगा असल्याचं क्रीम लावून, कधी आदर्श पती असल्याचं क्रीम, कधी आदर्श बॉस असल्याचं क्रीम, कधी मोठ्या मनाचा शेजारी असल्याचं, कधी सजग पालक असल्याचं, कधी विनयशील कलाकार असल्याचं, कधी यशस्वी बिझनेसमन असल्याचं, इतकंच कशाला मंदिरात किंवा सत्संगाला गेल्यावर सात्विकतेच क्रीम तर इतकं बेमालूम लावतो की ‘ते फार पोहोचलेले आहेत बरं , पण किती साधे आहेत नाही!’ असं आदरयुक्त कौतुकही लोक करतात. बरं असं काही कौतुक कानी पडलं की नम्रतेचं आणि विनायशीलतेचं क्रीम असतंच खिशात लगेच चोपडायला. गंमत म्हणजे त्या सलूनमधल्या गिर्हाईकाप्रमाणे माझं मलाच उगाच वाटत असतं की मी किती तेजःपुंज किती आदर्श व्यक्तिमत्व! पण प्रत्यक्षात मात्र लोक मनातल्या मनात, लग्नात आपण ब्राईडल मेकअपचं जसं कौतुक करतो तसंच माझंही साळसूद कौतुक करत नसतील कशावरून? उलट बहुतांशी ते तसंच असतं
मला वाटतं की मी आत खरा कसा आहे हे पूर्णपणे माहीत असूनही अहंकारापायी मी ते मान्य करत नाही. आदर्श व्यक्तिमत्वाची वरवरची क्रीम्स लावून मीच माझा आभासी तेजःपुंज चेहरा या मायेच्या आरशात वेगवेगळ्या अँगल ने बघून तो खरा आहे असं स्वतःलाच समजवायचा प्रयत्न करत असतो आयुष्यभर.
का असं? मी कोणाला फसवतोय? कशासाठी फसवतोय? माझा चेहरा जसा आहे तसा जगाला दिसला तर जास्तीत जास्त काय बिघडेल? मी जसा नाही तसा जगाला दाखवण्याचा का इतका आटापिटा?
खूप विचार केल्यावर एक लक्षात आलं, आणि पटलंही. जीवनात माझ्या वाट्याला आलेल्या वेगवेगळ्या भूमिका प्रामाणिकपणे करताना आत्मिक समाधान,शांती मिळवण्याचा मार्ग चोखाळला तर जी आंतरिक शुद्धी होईल, त्याचं सौम्य तेज चेहऱ्यावर आलं आणि त्याला हास्याची हलकी पावडर लावली की जो दिसेल तो माझा खरा चेहरा असेल. आणि मग कोणी ‘छान दिसतोस ह’ असं म्हणावं ही इच्छाही मनातून मावळली असेल. कारण माझ्या अंतरंगातल्या सद्सद्विवेकबुद्धीच्या आरशात माझं स्वतःच खरं प्रतिबिंब स्वछ पडलेलं मला दिसत असेल आणि तेही कुठल्याही फेशिअलशिवाय…