
कोकणात गावी आमची छोटी जागा आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी तिथे बांबूची चार पाच रोपटी रुजवली होती. त्या चारपाच रोपट्यांचं आता बांबूचं बनच तयार झालं आहे. त्या पहिल्या चार पाच रोपांनंतर तिथे नवीन बांबूची रोपणी केलीच नव्हती. मग ते बन कसं वाढलं याच उत्तर शोधताना असं लक्षात आलं की बांबूची वाढ चक्रवाढ दराने झाली आहे. त्यावेळी एक किस्सा आठवला. एकदा अल्बर्ट आईन्स्टाईन या महान शास्त्रज्ञाला विचारलं होतं की जगातील सर्वात मोठी शक्ती कुठली? त्यावर लोकांना अणुशक्ती, विद्युतशक्ती असं उत्तर आईन्स्टाईन देईल असं वाटलं होतं. पण त्याने उत्तर दिलं ” जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे चक्रवाढ व्याज. आणि हे ज्याला कळलं तो मिळवतो आणि ज्याला नाही कळलं तो ते चुकतं करतो”.
याच चक्रवाढीच्या शक्तीची अजून एक प्रसिद्ध दन्तकथा आहे की ज्या माणसाने बुद्धिबळाचा डाव शोधून काढला त्यावर तो डाव खेळून प्रभावित झालेला राजा खुश झाला. राजाने त्या माणसाला म्हटलं , “मी खुश झालो आहे तुझ्यावर, तुला काय हवं ते माग, मी द्यायला तयार आहे.” त्यावर तो मनुष्य म्हणाला, “मला बुद्धिबळाच्या पहिल्या घरात गव्हाचा एक दाणा, दुसऱ्या घरात दोन दाणे, तिसऱ्या घरात चार दाणे, चौथ्यात ८ दाणे असे गव्हाचे दाणे द्यावे.” यावर राजाला ती गोष्ट फारच क्षुल्लक वाटली, पण जेव्हा खरंच द्यायला सुरवात केली तेव्हा असं लक्षात आलं की पटाच्या पहिल्या २१ घरातच पूर्ण राजकोठार रिकामं झालं होतं आणि ३२ घरं भरेपर्यंत राजाला त्याचं सगळं राज्यच त्या मनुष्याच्या हवाली करायला लागणार होतं आणि तरी ३२ घरं अजून शिल्लकच होती.
खरं तर दंतकथा म्हणून मी इथेच सोडून द्यायला पाहिजे होतं. पण माझं इंजिनीअरचं डोकं मला स्वस्थ बसू देईना. पूर्ण चेसबोर्डची ६४ घरं भरल्यावर त्या राजाला नक्की किती गहू द्यायला लागला असता हे शोधायचं ठरवलं. एक्सेल शीट मध्ये फॉर्मुला टाकला आणि उत्तर आलं, साधारणपणे ९ वर १८ शून्य इतके दाणे. थोडी अधिक आकडेमोड केल्यावर लक्षात आलं कि राजाला त्या मनुष्याला 1,199,000,000,000 मेट्रिक टन इतके गहू द्यायला लागले असते. म्हणजे सध्याच्या संपूर्ण पृध्वीवर उगवणाऱ्या गव्हाच्या जवळजवळ १६०० पट..
हे आकडे पाहिल्यानंतर आईन्स्टाईन चक्रवाढ व्याजाबद्दल असं का म्हणाला असेल हे लक्षात आलं.
थोडा अधिक विचार करता चक्रवाढीबद्दल काही बारीक गोष्टी लक्षात आल्या.
१. याची सुरुवात अगदी नगण्य मात्रेने होते. म्हणजे माणसाला सुरुवातीला अतिशय सोप्या पद्धतीने चक्रवाढ तंत्र आत्मसात करता येतं.
२. चेसबोर्ड सारखं अगदी दुप्पट नाही तरी थोड्या मात्रेने म्हणजे १० टक्के किंवा २० टक्के वाढीचा दर ठेवला तरी काही काळाने खूप काहीतरी हाती लागतं.
३. सुरुवातीच्या काळात प्रगती अगदीच नगण्य वाटली तरी ती होत असते आणि काही कालांतराने खूप मोठ्या संख्येच्या मागे हीच सुरवातीची नगण्य वाटणारी प्रगती कारणीभूत असते. म्हणजेच मोठा बदल हा काही कालांतरानेच होतो. लगेच नाही.
४. चक्रवाढीचा एक नियम म्हणजे मध्येच मुद्दलाचा विनियोग करता येत नाही. मुद्दल बऱ्याच काळपर्यंत अबाधित ठेवावं लागतं. आणि खूप निरलसपणे याचा पाठपुरावा करून आपल्याकडून नियमित गुंतवणूक करावी लागते.
मग गम्मत अशी लक्षात आली की माणसाने केवळ आर्थिक सुबत्ता किंवा संपत्ती मिळवण्यासाठीच याचा उपयोग न करता आपल्या सत्वगुणांच्या वाढीसाठी हे तंत्र वापरलं तर? हे शक्य आहे का? आणि खरंच शक्य असेल तर त्याला मात्रामान (quantification) काय? पुन्हा इंजिनीअरचं डोकं एक्सेलकडे वळलं. सुरुवात केली आकडेमोडीला. मांडलं की पाहिल्यावर्षी दररोज एक माळ केली आणि दर वर्षी ३० टक्के जप जरी वाढवला आणि वर्षातून ३६५ पैकी २५० दिवसच जरी जप झाला तरी २५ वर्षात साडे सहा कोटी जप पूर्ण होतो की.
या सगळ्या आकडेमोडीतून काही मुद्दे मनाला पटले. एक म्हणजे चक्रवाढ हि जगातली सर्वात महान शक्ती आहे हे सांगणाऱ्या आईन्स्टाईनने रिलेटीव्हिटी चा शोध नसता लावला तरी तो तितकाच महान ठरला असता. दुसरं म्हणजे नुसत्या अकडेमोडीचाच विचार केला तर हे करता येणं शक्य आहे हा दिलासा मिळतो. तिसरं म्हणजे संत मंडळी सांगतात तसं अनियंत्रित षड्विकारांचं निराकरण करण्यात जमवलेल्या पुण्याचं मुद्दल खर्च करून चालणार नाही आणि तरच या चक्रवाढीचा फायदा मिळेल. चौथं असं की चक्रवाढ देणाऱ्या संपत्तीच्या गुंतवणुकीकरिता जसं आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याशिवाय मी काही करत नाही तसंच सत्वगुणयुक्त आत्मिक चक्रवाढीचं गणित न चुकण्यासाठी आपला जन्मोजन्मीचा हिशेब ठेवणाऱ्या आपल्या “श्री सद्गुरू” रुपी अध्यात्मिक मार्गदर्शकाला धरून, चिकटून त्यांच्या सल्ल्यानेच हे घडू शकेल.
आणि पाचवं आणि सर्वात महत्वाचं हे की जर केलेली आकडेमोड खरंच या जन्मी प्रत्यक्षात आणता येणं साधलं तर थोड्या “येरझारा” वाचतील कदाचित. आणि अर्थात त्यावेळी ना एक्सेल