
श्री रामकृष्ण परमहंसांच्या एका भक्ताची एक गोष्ट वाचनात आली. ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे आणि ज्यांची श्रद्धा आहे अशी मंडळी
त्यांच्या गाडीत त्यांच्या आराध्य देवतेचा किंवा सद्गुरूंचा फोटो ठेवतात. साधारणतः तो फोटो गाडीत बसलेल्या माणसांच्याकडे तोंड करून
ठेवलेला असतो. पण या श्री रामकृष्णांच्या भक्ताने त्या फोटोचं छोटं मंदिर आणि त्यातील श्रीरामकृष्णांचा फोटो समोरच्या बाजूला ड्रायव्हर
सारखा गाडीच्या समोरच्या काचेतून बाहेर पाहता येईल असा काचेकडे तोंड करून
ठेवला होता. कुणीतरी मित्राने
त्याच्या गाडीत बसल्यावर त्या भक्ताला विचारलं की श्रीरामकृष्णांचा फोटो असा उलटा कसा लावलास?. त्यावर तो शिष्य उत्तरला. ‘असाच
बरोबर आहे !. अरे ठाकूर माझ्याकडे कितीवेळ बघत बसणार? त्यांना कंटाळा नाही का येणार. मी त्यांना असं स्थानापन्न केलं आहे की
माझ्यासारखे ते पण काचेतून बाहेरची मजा बघतील.’ मी जेव्हा ही गोष्ट वाचली तेव्हाच मला मनाला खूप भावली. ठाकूर खरंच त्या फोटोत
आहेत असं वाटल्याशिवाय हा विचार येणारच नाही मनात. आपल्या आराध्याला सगुणात पाहण्याची किती सुंदर संकल्पना आहे ही, किती
गोड भाव आहे हा.
ही गोष्ट वाचली आणि देवाची पूजा मी पूर्वी कशी करायचो ते मला आठवलं. देवाची पूजा करणे म्हणजे भांडी लावणे, झाडाला पाणी घालणे,
इत्यादी घरगुती कामांसारखं एक काम असतं आणि ते लवकरात लवकर उरकायचं असतं असाच पूजेप्रती माझा भाव होता. त्यामुळे पूजा सुरु
असताना गप्पा काय, रेडिओच्या बातम्या काय, सिनेमाची गाणी काय असं काहीही ऐकता ऐकता मी पूजा करत असे. माझा एक मित्र तर
पूजा करताना ‘माडीवरी चल ग गडे!’ हे नाट्यपद गुणगुणत होता असं खरंच माझ्या कानावर आलं आहे, अतिशयोक्ती नाही. तर
सांगण्याचं तात्पर्य हे की ‘काम उरकणे’ हा एकमेव भाव त्या पूजेत असायचा. मग त्यात फोटोंना अडवंतिडवं करून, गंध लावलेल्या भागावर
पळीभर पाणी सोडून, देवाच्या वस्त्राने कालचं गंध पुसलं जाईल इतकाच, फोटोचा पृष्ठभाग पुसून काढून त्या फोटोतील देवाला ड्राय वॉश
देणे. त्या ड्राय वॉशने गंध नाही निघालं तर अगदी नखाने खरवडून काढणे किव्हा खूप जोर लावून लावून त्या वस्त्राने पुसणे. धातूंच्या मूर्तींना
नळाचं थंडगार पाणी भांड्यात घेऊन पळीपळीने किंवा तितका वेळ अथवा सबुरी नसेल तर भांड्यातील पाणी सरळ त्या धातूच्या मूर्तींवर
ओतून त्यांना धुवून काढणे आणि नंतर वस्त्राने भांडी पुसतात तसं पुसून काढणे अशा देवांच्या अंघोळी व्हायच्या. गंमत म्हणजे या सगळ्या
प्रकारात काही गैर चाललं आहे ही शंकासुद्धा मनाला शिवली नाही. बरं देवाचं वस्त्र म्हणाल तर कधीतरी नवीन घेतलेलं वस्त्र त्यावर गंध,
हळदीकुंकू, बुक्का, इत्यादी परिमलद्रव्यांचे डाग पडून पडून त्याचा मूळचा रंग पूर्णपणे अदृश्य होईपर्यंत कधी साबणाने धुतलंही जात नसे.
तसंच नळाखाली धरून, पाण्यानी खळबळून, पिळून पुन्हा वळत टाकलं जात असे. ‘असा घाणेरडा टॉवेल मला नको’ अशी देव कधीच
तक्रार करत नसल्यामुळे तशाच वस्त्राने दिवसेंदिवस देव पुसले जायचे. त्यानंतर मग गंध, हळद, कुंकू इत्यादी परिमल द्रव्य देवाच्या
चेहऱ्याचा साधारण अंदाज घेऊन फोटोवर टेकवली जायची. मग फोटोच्या साईज प्रमाणे आणि बोटाच्या आकाराप्रमाणे कधी गंधाने देवाचा
पूर्ण चेहरा झाकला जाई, कधी हळद कानाला किंवा कुंकू हनुवटीला असं बोट टेकेल तिथे लावलं जाई. देवाचा फोटो आणि फुलांचा साईज
याचा बऱ्याचवेळा ताळमेळ नसल्यामुळे झेंडूचं एकच फुल पायापासून डोक्यापर्यंत देवाला वाहिलं जायचं. किंवा फुल अधिकच मोठं असेल तर
दोन देवांना मिळून एकच फुल वाहून मी तो सीमाप्रश्न सोडवत असे. गुलाबासारख्या फुलांना वाहायचं असेल तर देवाच्या तसबिरीचाच
आधार घेऊन ते फुल देवाच्या डोक्यावर चढवलं जायचं. पुढे नैवेद्याला साधारणपणे दररोज साखर आणि अगदीच विशेष व्हरायटी म्हणजे
दूध पण ते मात्र साखरेशिवाय. नंतर ओवाळायला रेडिमेड तुपाच्या वातींचं निरांजन आणि उदबत्ती आणि पुढे फास्ट फॉरवर्ड स्पीड मध्ये एक
किंवा फार तर दोन आरत्या. आरती ही लहानपणी गणपती उत्सवात आपोआप पाठ होणारी गोष्ट असल्यामुळे जे कानावर पडेल तशीच
ती पाठ झालेली असते. आरतीलाही अर्थ असतो, आरतीच्या शब्दांना महत्व असतं, आरती ही देवाची आर्जवाने केलेली आळवणी असते
आणि ती आर्त होऊन म्हणायची असते इतका खोल विचार करण्याची ना समज होती ना इतकी फुरसत. आरतीनंतरची मंत्रपुष्पांजली हे
पूजेची आवराआवर करताना एकीकडे म्हणायचे मंत्र आहेत, त्यायोगे पूजेचा वेळ वाचतो असाच माझा बरेच दिवस समज होता. सांगायचं
तात्पर्य असं की पूजा हे परंपरेने चालत आलेलं काम आहे आणि ते बिनबोभाट झालं पाहिजे या विचाराने पूजेचा विधी दररोज पूर्ण होत असे.
पूजेचा आणि सगुणभक्ती या संकल्पनेचा जणू काहीच संबंध नाही असाच तो परिपाठ असायचा.
पण नंतर पूजेतली खरी सगुणभक्ती कळू लागली. सगुणभक्तीबद्दल सर्व संतमंडळी कळकळीने सांगून गेली आहेत. श्रीरामकृष्ण, संत
ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा संत मांदियाळीने तर सगुणभक्ती नुसती सांगितली असंच नाही तर आचरून सिद्ध करून दाखवली.
.
काही दिवसापूर्वी मी एका मंदिरात गेलो होतो तिथे उन्हाळ्याचे दिवस असले की देवाच्या गाभाऱ्यात एअर कंडिशनर लावलेला असतो
मला वाटलं कि पुजाऱ्यांसाठी असेल. पण नंतर असं कळलं की तो रात्रभरही देवासाठी म्हणूनही तो लावलेला असतो. इतकंच नाही तर
हिवाळ्यात देवाच्या मूर्तीला स्वेटरपण घातला जातो, कधीतरी अगदीच थंडी असेल तर शाल आणि कानटोपी सुद्धा. मला ही सगुणभक्ती
खूप भावली. आपल्याला जसं राहायला आवडतं तसं देवाच करावं ही सगुणभक्तीची कल्पना मला मोहवून गेली. आपण देहाचे जे आणि
जितके चोजले पुरवतो तितके आणि त्याच भावनेने देवाचे लाड पुरवणे म्हणजे सगुणभक्ती ही व्याख्या हृदयाला अधिक भिडली.
मग लक्षात आलं षोडशोपचार पूजा मीही करत होतो आणि पूजा करतात संतही. पण संत जशी पूजा करतात ते पाहून ते निर्गुणही सगुणात
यायला आतुर होत असेल. आणि असं निर्गुण जेव्हा सगुणात येतं त्यावेळी ते चारचाकी गाडीच्या समोरच्या काचेतून बाहेरची मजा बघतं ,
श्रीरामकृष्णाच्या दक्षिणेश्वरीच्या आईसारखं त्यांच्याशी सदोदित बोलतं आणि गोंदवल्याला श्रीब्रह्मचैतन्य महाराज नैमिषारण्यात जायला
निघालेले पाहून श्रीरामरुपात अगदी डोळ्यात अश्रू आणून रडतं देखील…