
साक्षी हे गण आप्त मित्र मिळुनी
जमली इथे मंडळी।
येऊनी घटिका समीप शुभ या स्थानावरी थांबली।
वरमाला धरुनी करी सुखकरी
लक्ष्मी उभी मंदिरी
विष्णूचे व्रत घेऊनि वर उभा वरण्या वधू लाजरी।।1।।
सौख्याने भरू देत हा प्रतिदिनी
संसार ऐसा खरा।
आतिथ्या करण्यास मात्र कधिही
देईन ना अंतरा।
ऐशा या वाचनास नित्य दृढ या ठेऊनिया अंतरी।
विष्णूचे व्रत घेऊनि वर उभा वरण्या वधू लाजरी।।2।।
अर्थाचे वय हे खरी मिळविण्या
सर्वांग संपन्नता।
मदनाचे शरचाप लागुनि मनी व्याकुळ अस्वस्थता।
धर्माच्या परी कोंदणात रमणे
ठेऊन निष्ठा उरी।
विष्णूचे व्रत घेऊनि वर उभा वरण्या वधू लाजरी।।3।।
विद्येची असली जरी कुशलता ठेवी मनी नम्रता।
देण्याच्या मनिषेत सौख्य दडले
जाणूनिया सत्यता।
दोघांच्या मिळुनी करी सढळ या
दानास चारी करी।
विष्णूचे व्रत घेऊनि वर उभा वरण्या वधू लाजरी।।4।।
सौख्याचे मिळते कुणास कधिही सद्भाग्य आप्तांमुळे।
कष्टांचे पिढीजात कर्म घडते
पुढच्यास त्याची फळे।
ऐसा नम्र कृतज्ञ भाव अवघा
ठेऊनिया अंतरी।
विष्णूचे व्रत घेऊनि वर उभा वरण्या वधू लाजरी।।5।।
दोघांचे घर हे समान म्हणुनी दोघांत वागायचे।
दोघांच्या नयनात स्वप्न फुलते दोघांत वाटायचे।
दोघांचे मन एकसंध परि हे
अद्वैत राखी उरी।
विष्णूचे व्रत घेऊनि वर उभा वरण्या वधू लाजरी।।6।।
आप्तांच्या स्मरूनि ऋणास करितो
आनंद हा साजरा।
कर्तव्यास खऱ्या स्मरून करितो
संकल्प हा गोजीरा।
वैवाहीक सुखास नित्य मिळुदे
आशिष इच्छा धरी।
विष्णूचे व्रत घेऊनि वर उभा वरण्या वधू लाजरी।।7।।
ईशाच्या स्मरणात नित्य सरूदे
घटिका पळे सर्वदा।
आनंदात सदा सरोत दिन हे
कुठली नको आपदा।
इच्छा ठेऊन जीवनात असुदे
आधार राधा हरी।
विष्णूचे व्रत घेऊनि वर उभा वरण्या वधू लाजरी।।8।।