
माझ्या ओळखीचं एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातील काका रिटायर झाले आता. पण ते जेव्हा नोकरी करीत होते त्यावेळी खूप सकाळी पहिल्या शिफ्टला जाण्यासाठी घरातून निघत असत. आमच्या जवळच राहायचे ते. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जात असे तेव्हा त्यांच्या घरातलं घड्याळ मला नेहेमी दिसायचं. ते घड्याळ लक्षात राहण्याचं कारण की ते नेहेमी ४५ मिनिटांनी पुढे असायचं. मी एकदा न राहवून विचारलं की तुमचं घड्याळ नेहेमी पुढे का असतं? त्यावर ते काका म्हणाले, ” अरे सकाळी ऑफिसला जायचं तर पहाटे पावणे पाचला उठायला लागतं. इतक्या लवकर उठायचा कंटाळा येतो पण उठायला तर लागतच, म्हणून पावणे पाचला जरी उठलो पण घड्याळ पाऊण तास पुढे ठेवलेलं असलं की साडेपाच ला उठल्यासारखं वाटतं आणि थोडी अधिक झोप मिळाल्याचं समाधान मिळतं. हा तर्क ऐकून मी चक्रावलोच. मनात आलं की काकांना माहित आहे की घड्याळ पाऊण तास पुढे आहे आणि घड्याळ साडेपाचची वेळ जरी दाखवत असलं तरी त्यांना हेही माहित आहे की खरोखर ते पावणे पाचला उठत आहेत. मग असं असताना मानसिक समाधान कसं मिळतं? हे स्वतःला फसवणंही होत नाही कारण सत्य परिस्थिती मनाला माहित असते.
लहान असताना तर या तर्काची गम्मत वाटायची. आता त्याच प्रसंगाचा विचार करताना एक वेगळीच दृष्टी मिळते आहे. लक्षात येतंय की मनाची ही वेळेचा फ्लॅशबॅक आणि फ्लॅशफॉरवर्ड करण्याची ताकद सकारात्मकरित्या वापरण्याची ही नामी युक्ती आहे.
बऱ्याच वेळेला आपण विचारधन असं ऐकलेलं असतं की भूतकाळाची चिंता करू नका कारण तो काळ मागे पडलेला असतो आणि भविष्यकाळाची चिंता करू नका कारण तो अजून आलेला नसतो. भूतकाळात राहिलात तर केलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप होतो म्हणून दुःख होतं आणि भविष्यात राहिलात तर येणाऱ्या गोष्टी माहित नसल्यामुळे काळजी लागते त्यामुळे नेहेमी वर्तमानात रहा. मनात येतं, ही सगळी थिअरी ठीक आहे हो ! पण प्रत्यक्षात सतत केवळ वर्तमानात राहणं किती कठीण आहे ! केवळ संत, योगी यांना साधू शकेल अशी ही गोष्ट त्यांना जमत असेल ते, पण माझ्या सारख्या सामान्य मनुष्याने काय करायचं? यावर नामस्मरण करणे, श्वासावर लक्ष केंद्रित करणे वगैरे उपाय सांगितले जातात आणि ते लागू पडतही असतील त्यांना ज्यांच्या मनाची तशी धारणा आहे. आणि नामस्मरण किंवा साधना वाढली कि आपोआप ती धारणा वाढत जाते अशी संतमंडळींची अनुभवसिद्ध शिकवणही आहे. पण आताचं माझं मन इतकं चंचल आणि डॅम्बीस आहे की हळूच नामस्मरणाचं काम तोंडाकडे सोपवून, म्हणजे हल्लीच्या भाषेत तोंडाकडे डेलिगेट करून, पळून जातं की भूतकाळात किंवा भविष्यकाळात !! मग मी काय करू? अशावेळी मला त्या घड्याळ पुढे करणाऱ्या काकांची आठवण झाली आणि एक कल्पना सुचली. जर माझं मन भूतकाळात किंवा भविष्यात जाणारच असेल तर माझ्या मनाला उलटच वळण लावलं तर?
म्हणजे समजा माझं मन भूतकाळात जात असेल तर आधी याकडे लक्ष घायचं की मी या क्षणाला कटू भूतकाळ आठवतोय की आनंदी भूतकाळ. आणि या दोन प्रकारांच्या संदर्भात माझ्या दोन प्रतिक्रिया मी ठरवू शकतो.
१. जर मन आनंदी भूतकाळात गेलं असेल तर आपल्याला झालेला आनंद, कुणाकडून मिळालेलं प्रेम, आपलं यश, भेटलेली चांगली माणसं, घडलेले चांगले प्रसंग, चांगले अनुभव यांची मनाशी उजळणी करायची, आणि मग या सुंदर आठवणीतील संबंधित व्यक्तींचे आपल्या आयुष्यात येण्याबद्दल मनातल्या मनात आभार मानायचे आणि ती माणसं, ते प्रसंग आपल्या आयुष्यात आपल्याला दाखवले म्हणून ईश्वराचे आभार मानायचे आणि पुन्हा वर्तमानात परत यायचं.
२. जर मन कटू भूतकाळात गेलं तर लक्षात घ्यायचं की आयुष्यात ज्या माणसांमुळे आपल्याला कटू अनुभव आलेला असतो, ज्या माणसांमुळे आपल्यावर अन्याय झाला असं आपल्याला वाटतं, ज्या कारणांनी आपण चुकीचे निर्णय घेतले असं आपल्याला वाटत असतं, याचप्रमाणे या उलट ज्यां माणसांना आपण अन्यायकारक वागणूक दिलेली असते, ज्या माणसांना आपण त्रास दिलेला असतो आणि ते आपल्याला लक्षात आपल्यावर त्याबद्दल मनात पश्चात्तापही होत असतो. त्या कारणांना, त्या माणसांना, अगदी स्वतःला सुद्धा मनातल्या मनात क्षमा करायची. कारण प्रसंग घडून गेलेला असतो. सद्यस्थितीत आपल्या हातात करण्यासारखं काही नसतं आणि आजची परिस्थितीही त्यामुळे बदलणार नसते. म्हणून मनातल्या मनात माझ्यासकट सगळ्या संबंधित व्यक्तींना मी क्षमा करायची आणि इतकं घडूनही त्या कटू परिस्थितीतून मी आज बाहेर येऊ शकलो आहे या बद्दल ईश्वराचे आभार मानायचे आणि पुन्हा वर्तमानात यायचं.
आता समजा माझं मन भविष्यकाळात फिरायला गेलं तरीही मी दोन प्रकारे भविष्यात राहू शकतो. एक म्हणजे कल्पनेत असलेला माझा उज्वल भविष्यकाळ आणि दुसरं म्हणजे आज ठरवलेल्या गोष्टी उद्या ठरावल्यासारख्या होतील का याची भविष्यातील चिंता. याही दोन्ही अवस्थांना मी दोन प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतो.
१. मन जेव्हा उज्ज्वल भविष्याचा विचार करत असेल, छान कल्पनांमध्ये भराऱ्या मारू पाहत असेल तेव्हा भविष्यात आपण स्वतःला कसं पाहू इच्छितो तसं अन्तःचक्षूंनी पाहण्याचा प्रयत्न करायचा. याला कल्पना तंत्र (Visualization Technique) म्हणून बरेच जण वापरतात. खेळाडू, कलाकार यांना याचा खूप उपयोगही होतो. तेच तंत्र मी माझ्या नेहेमीच्या आयुष्याबद्दल वापरलं तर? मला उत्तम माणसं भेटत आहेत, मला उत्तम अनुभव येत आहेत आणि माझं आयुष्य आनंदानी भरून गेलं आहे असं स्वप्न रंगवायचं आणि भविष्यात माझ्या आयुष्यात येणाऱ्या उत्तम माणसांचे कल्पनेतच आभार मानायचे आणि इतक्या सुंदर कल्पनेतलं आयुष्य फुलावल्याबद्दल ईश्वराचे आभार मानून पुन्हा वर्तमानात यायचं.
२. भविष्याबद्दल जेव्हा चिंता वाटते तेव्हा सद्यपरिस्थितीचा अंदाज घायचा, माहिती असलेल्या तथ्यांची (फॅक्टस) मी उजळणी केली आहे ना त्यांचा सर्व बाजूंनी विचार केला आहे ना? याची शहानिशा करायची, स्वतःची गृहीतकं (Assumptions) तपासून पाहायची, माझ्या कृतीमुळे मी कुणावर अन्याय करत नाही ना? याची खात्री करायची, माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला साक्षी ठेवायचं, माझे प्रयत्न १०० टक्के आहेत ना ? याची मनाशी खूणगाठ बांधायची, माझ्या कर्तव्याची आठवण करायची आणि संपूर्ण सश्रद्ध मनाने तो भविष्यकाळ आणि त्याची चिंता ईश्वरचरणी अर्पून त्याची प्रार्थना करून पुहा वर्तमानात यायचं.
मनाच्या भूतकाळातले आणि भविष्यकाळातले कप्पे कायमचे बंद करता येणं हे साधंसुधं काम नाही . म्हणून या फ्लॅशबॅक आणि फ्लॅशफॉरवर्ड तंत्राचा गाभा हा की आपल्या मनातलं घड्याळ वर्तमानाच्या क्षणाच्या पुढे किंवा मागे जरी गेलं तरी मनाला भविष्यातून किंवा भूतकाळातून वर्तमानात लगेच खेचडत आणायचं नाही. मनातला भूतकाळ किंवा भविष्यकाळ प्रसंग प्रसंगाने हळू हळू शक्यतो सकारात्मकतेने भरायला सुरुवात करायची आणि मग सकारात्मक भावाने वर्तमानात येण्याचा प्रयत्न करायचा. असं मी करत राहिलो तर मग माझं मन भूत-भविष्य-वर्तमान कुठेही असलं तरी समाधानानं, सकारात्मकतेनं भरलेलं राहील आणि मग कुठल्याही काळात ते वावरलं तरी स्वस्थच असेल. आणि तीच स्थिती मनाला क्षणस्थ होण्यासाठी मदत करेल. खरं पाहता अंततः मला तेच साधायचंय. नाही का? …