कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एक सामायिक मंत्र नेहेमी सांगितला जातो. तो म्हणजे “एक सधे तो सब साधे”. प्रत्येक क्षेत्रात असं एक कौशल्य, अशी एक चावी असते की ज्या चावीने त्या क्षेत्रातील यशाचे दरवाजे उघडायला खूप मदत होते. मी संगीत क्षेत्राचा जेव्हा विचार करतो आणि त्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर ती चावी कुठली हा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा “स्वर” आणि “लय” या दोन मूलभूत तत्वांशी येऊन विचार थांबतो आणि असं लक्षात येतं की ‘स्वर’ आणि ‘लय’ साधली की कलाकाराला सगळंच साधतं. अर्थात हे नुसतं तोंडाने म्हणणं किंवा लेखणीने लिहिणं खूप सोपं असलं तरी ‘स्वर’ आणि ‘लय’ साधणं या साठी आयुष्यभराच्या साधनेची आवश्यकता असते याचीही एक संवादिनीवादक आणि एक संगीतकार म्हणून मला संपूर्ण कल्पना आहे. पण अगदी नवशिक्यांपासून ते पारंगतांपर्यंत सगळ्यांनाच या ‘स्वर’ आणि ‘लय’ या द्वयीने पछाडलेलं असतं आणि ज्या दोन गोष्टींच्या साधनेसाठी जवळजवळ प्रत्येक संगीताचा साधक आपलं संपूर्ण जीवन खर्च करतो ते साधण्याची काही प्रक्रिया आहे का याचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न केला.
एक विज्ञानाचा, ध्वनीचा अभ्यासक म्हणून कुठलाही स्वर हा एक ध्वनी असतो हे वैज्ञानिक मूलभूत सत्य हा या शोधयात्रेचा पाया धरून विश्लेषणाचा पुढचा प्रवास सुरु केला. या विश्लेषणात असं उमजलं की कुठल्याही मुख्य नादामध्येच त्याचे अंतर्नादही लपलेले असतात. आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते सर्व अंतर्नाद वेगवेगळे ऐकवून दाखवता येतात. पण स्वर हा त्याही पलीकडे असतो असा सगळ्याच स्वरसाधकांचा अनुभव असतो. जी गोष्ट स्वराची तीच लयीची. लय म्हणजे केवळ वारंवारता किंवा दोन आघातांमधील एक विशिष्ट कालअवकाश नसून एक जिवंत आकृतीबंध असतो असा सर्व संगीतसाधकांचा अनुभव असतो. मग स्वर लयीच्या अभ्यासाला सुरवात करणाऱ्या विद्यार्थ्याला कुठल्या प्रक्रियेमुळे स्वरातील आणि लयीतील हा जिवंतपणा जाणवण्यासाठी मदत होते याचा विचार करताना पूर्वीच्या बुजुर्गांनी ज्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत त्याचा आधार घेऊन मला त्या प्रक्रियेतील चार टप्पे जाणवले.
पहिला टप्पा म्हणजे शारीरिक पातळीवर करायचा अभ्यास. यात गायकाच्या बाबतीत गळा आणि वादकांच्या बाबतीत हात तयार करणे याचा यात समावेश होतो. गाण्याच्या बाबतीत स्वरसाधना करणे, आणि वाद्याच्या बाबतीत अक्षरसाधना करणे याला या टप्प्यावर अनन्यसाधारण महत्व आहे. स्वराच्या जागा, हात वाद्यावर ठेवण्याची पद्धत, बैठकीची पद्धत या सर्वांचा बारकाईने अभ्यास गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करणे हे या टप्यात अंतर्भूत आहे. आणि हा अभ्यास जसा सांगितला जाईल तसा, तर्कटपणाने कुठलेही प्रश्न न विचारता, निमूटपणे, गुरूंवर आणि त्यांच्या तंत्र आणि पद्धतींवर संपूर्ण श्रद्धा ठेऊन करायचा असतो.
दुसरा टप्पा म्हणजे बौद्धिक अभ्यास. या टप्प्यापर्यंत साधारण गायकाचा गळा किंवा वादकांचा हात बऱ्यापैकी तयार झालेला असतो. डोक्यात आलेली कल्पना गळ्यात किंवा वाद्यावर उतरायला लागलेली असते. या स्थितीत अधिकाधिक ज्ञान, विद्या ग्रहण करणे हे अपेक्षित असतं. वेगवेगळ्या रागांचा अभ्यास करणे. त्यांचे स्वरूप समजून घेणे, तालाचा आणि त्यातील रचनांचा अभ्यास करणे, एका रागाच्या अनेक अंगांनी मांडल्या जाणाऱ्या बंदिशी किंवा गती आत्मसात करणे याप्रकारे मानसिक बौद्धिक अभ्यास करत अधिकाधिक ज्ञान मिळवणे हे या टप्प्याचं प्रमुख वैशिष्ट्य.
तिसरा टप्पा म्हणजे भावनिक किंवा स्वर आणि लयीच्या सौंदर्यसाधनेचा. या टप्प्यापर्यंत गळा किंवा हात चांगला तयार झालेला असतो. चांगल्यापैकी विद्या आत्मसात झालेली असते. मग या पुढे अपेक्षित असतं ते रागांमधील सौंदर्यस्थळं, तालरचनांमधील सौंदर्यस्थळं शोधणं. स्वरबंधातील, स्वराकृतीमधील नजाकत ओळखून त्याचा स्वतः आस्वाद घेणं आणि तो श्रोत्यांना देणं हा तो टप्पा असतो. साधारणतः या टप्प्यापर्यंत संगीताचा विद्यार्थी लोकांसमोर आपली कला सादर कारण्यायोग्य झालेला असतो आणि या टप्प्यापासून कार्यक्रमाद्वारे तो आपलं कौशल्य लोकांसमोर मांडायला सुरुवात करतो आणि कलाकार म्हणून त्याची ओळख व्हायला लागते. ज्याचा या तिन्ही टप्प्यांचा नीट अभ्यास झालेला असतो तो चांगला कलाकार म्हणून हळू हळू गणला जाऊ लागतो. या टप्यात कलाकाराला भौतिक यश मिळू लागतं.
चौथा टप्पा म्हणजे अध्यात्मिक टप्पा. साधारणपणे काही काळ भौतिक दृष्ट्या यशस्वी कलाकार म्हणून व्यतीत केल्यावर तरल संवेदनेच्या कलाकाराला एक गोष्ट जाणवायला लागते की तो अजूनही स्वर आणि लयीच्या खऱ्या अनुभूतीपासून लांब आहे. स्वर आणि लय या मध्ये असणारं परातत्व त्याला जाणवायला लागलेलं असतं आणि हळू हळू त्या स्थितीत कलाकाराच्या अहंकाराचा लय व्हायला सुरवात होते. स्वर आणि लयीपुढे आपण कोणीच नाही ही जाणीव व्हायला लागते आणि कलाकार स्वर आणि लयीपुढे लिन होतो. शरणागत होतो. या टप्प्यात कलाकाराचा आंतरिक प्रवास सुरु होतो. तो स्वर आणि लयीचा केवळ अभ्यासक न राहता उपासक होतो.
कुठल्याही व्यक्तीसाठी स्वराच्या आणि लयीच्या उपासनेचा हा एकंच मार्ग आहे. याला कुठला आडमार्ग किंवा सोपा मार्ग नाही. सुरुवातीला मर्यादित वाटणारं संगीताचं स्वर, लयीचं क्षितिज हे जसं जसं त्याच्या अधिक जवळ जावं तसं तसं अधिक रुंदावत जाणारं आणि अथांगतेचा मागोवा घेत शेवटी अभ्यासकाला, उपासक, साधक आणि मग शरणागत करत पिढ्यानुपिढ्या भुलवणारं. या स्वरलयप्रवासाची एक गम्मत अशी की मुक्कामी पोहोचण्याच ध्येय मनात ठेऊन म्हणजेच स्वर आणि लय यांना साधायचं ध्येय ठेऊन सुरु झालेला प्रवास, बाकी सगळं साधलं तरी असाध्य, अमूर्त, अज्ञेय अशा ‘स्वर’ आणि ‘लयीच्या’ मागे त्यांचा शोध घेत अनंत काळ पर्यंत सुरूच राहतो आणि हा स्वरलययात्री ध्येय हाती लागत नाही म्हणून दुःखी न होता या प्रवासातच मस्त कलंदर राहतो.
माणूस क्षितिजाचा शोध घेत चंद्राला स्पर्श करून आला तरी क्षितिज आवाक्यात आलं असं ठामपणाने तो कधीच म्हणू शकला नाही, आणि म्हणू शकणारही नाही. स्वरलयीच्या विस्तीर्ण क्षितिजाची कथा तरी त्याहून वेगळी कशी असेल?



