थडग्यावरचे अश्रू – ०८ ऑक्टोबर २०१९

/ / bhavanuvad

माझ्या एका सुहृदांनी मला Mary Frye या अमेरिकन कवयित्रीने १९३२ मध्ये लिहिलेली एक अप्रतिम कविता पाठवली. वाचताना काही स्फुरलं आणि त्या कवितेचा भावकाव्यानुवाद सुचला तो अभिप्रायासाठी पाठवत आहे.

मूळ इंग्रजी कविता;

Do not stand at my grave and weep,
I am not there; I do not sleep.
I am a thousand winds that blow,
I am the diamond glints on snow,
I am the sun on ripened grain,
I am the gentle autumn rain.
When you awaken in the morning’s hush
I am the swift uplifting rush
Of quiet birds in circling flight.
I am the soft star-shine at night.
Do not stand at my grave and cry,
I am not there; I did not die.

Original Poet: Mary Frye

भावकाव्यानुवाद करताना दोन कडवी अधिक स्फुरली ती मूळ कडव्यांनंतर शेवटी लिहिली आहेत.

मूळ कवितेचा भावकाव्यानुवाद ;

थडग्यावरती माझ्या कोणी
नकाच थांबू अश्रू ढाळत।
नसेन माझ्या थडग्यामध्ये
पडू कशाला तिथेच लोळत।।१।।

सहस्र झोतांचा वारा मी
दिशा दहाही विहरत आहे।
हिम स्फटिकांच्या आरस्पानी
पैलूंमधुनी चमकत आहे।
स्वच्छंदी या जगण्यासोबत
डाव मांडुनी बसेन खेळत।
नसेन माझ्या थडग्यामध्ये
पडू कशाला तिथेच लोळत।।२।।

कणसांमधल्या दाण्यांवरची
सोनछटा मी होतो केव्हा।
नभात भरल्या मोत्यांचा
हळूवार स्पर्श मी होतो केव्हा।
सळसळ पानांची केव्हा तर
केव्हा सुगंध राही उधळत।
नसेन माझ्या थडग्यामध्ये।
पडू कशाला तिथेच लोळत।।३।।

जाणीवांचे पंख लावुनी
निरभ्र आकाशी उडतो मी।
कृष्ण निशेच्या गळ्यात सुंदर
कोंदण ताऱ्याचे जडतो मी।
अमर्त्य मी असता थडग्यावर।
कशास बसता अश्रु गाळत।
नसेन माझ्या थडग्यामध्ये
पडू कशाला तिथेच लोळत।।४।।

चुके मरण हे कुणा बापुडे
देह तसाही असे अशाश्वत।
चैतन्याचा खेळच सारा
काळ निरंतर असतो चालत
मरण सोहळा असे जिवाचा 
दुःख कशाला बसू उगाळत
नसेन माझ्या थडग्यांमध्ये
पडू कशाला तिथेच लोळत।।५।।

सार्थक कळले या जन्माचे
देह जगाच्या पडो कारणी।
मी ‘त्याचा’ हे एकच नाते
बाकी सगळी देणी घेणी।
घडते मीलन जयामुळे त्या
मरणाला मी होतो टाळत।
कशास अडकू थडग्यांमध्ये
पडू कशाला तिथेच लोळत।।६।।

मूळ कवी : Mary Frye
मराठी भावकाव्यानुवाद : राजेंद्र वैशंपायन

1 Comment to “ थडग्यावरचे अश्रू – ०८ ऑक्टोबर २०१९”

  1. डाॅ.सतीश शिरसाठ says :Reply

    चांगल्या कवितेचे उत्तम मुक्त भावानुवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *