अध्याय ८ : अक्षरब्रह्म योग
सांग मजसी तू खुणा ।
मोहना सांग मजसी तू खुणा ।।ध्रु १॥
काय ब्रह्म अध्यात्म कोणते ।
म्हणू कर्म अधिभूत कुणा ते ।
अधिदैवत अधियज्ञ कोणते ।
अंतकाळी तुज कसे स्मरू ।
अधिदेह म्हणावे कुणा ।
मोहना सांग मजसी तू खुणा ।।१।।
ओळख या तू खुणा ।
अर्जुना ओळख या तू खुणा ।।धृ २।।
अक्षर ऐसे परम तत्व ते ।
ब्रह्म म्हणती त्यालाच जाणते ।
सृजन सृष्टिचे करी कर्म ते ।
स्वधर्म जो वस्तुचा म्हणती
अध्यात्म तयांच्या गुणा ।
अर्जुना ओळख या तू खुणा।।२।।
नाशिवंत अधिभूत भूतली ।
अधिदैवत चेतना आतली ।
उमज अशी संज्ञा हि चांगली ।
यज्ञी मी अधिदेव म्हणती
अधिदेह माझिया तना ।
अर्जुना ओळख या तू खुणा ।।३।।
ज्या भावे नर देह टाकितो ।
तैसा तो स्थानास पोचतो ।
स्मरे मला तो मला मिळवितो ।
यास्तव पार्था जन्मभरी तू
आठवी माझ्या गुणा ।
अर्जुना ओळख या तू खुणा ।। ४।।
धरुनि उभा तू खड्ग हे जरी
लढशिल या तू धर्मसंगरी ।
ठेव भाव माझाच अंतरी ।
जरी इंद्रिये तुझी झुंजती
अर्पी मज तू मना ।
अर्जुना ओळख या तू खुणा।।५।।
कवी पुरातन आणिक शास्ता ।
अचिंत्य हा अणुहुनी धाकटा ।
वर्ण जणू आदित्य देवता ।
ॐकाराचे रूप दिव्य
वितरगि वंदी निर्गुणा ।
अर्जुना ओळख या तू खुणा ।।६।।
अनन्यभावे भजे सर्वदा ।
ॐकाराची दिव्य संपदा ।
नसे जन्म त्या नसे आपदा ।
पुनर्जन्म अभिशाप अन्यथा
कधी न चुकला कुणा ।
अर्जुना ओळख या तू खुणा ।।७।।
चार युगांचे सहस्र फेरे ।
बह्मलोकी दिन एक ओसरे ।
तशी निशा ही एक अंतरे ।
ब्रह्मदिनी हे सृजन होतसे
विलय निशेच्या खुणा ।
अर्जुना ओळख या तू खुणा।।८।।
पंचभूत सामावुन घेई ।
विलय जन्म स्वाभाविक होई ।
परी तत्व जे अक्षर राही ।
कर्मयोगी त्या तत्वा मिळतो ।
कधी न राही उणा ।
अर्जुना ओळख या तू खुणा ।।९।।
राजेंद्र (?)
१३ डिसेंबर १९९९