अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यास योग
काळे ज्यास अद्भूत ऐश्वर्यरूप ।
जयासी कळे ज्ञान कर्मस्वरूप ।
पुन्हा ना कधी तो हि जन्मासी आला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।१।।
भयासाक्ती क्रोध त्यजूनी विचारी ।
पवित्र प्रगल्भ स्थिरे निर्विकारी ।
तयासी हरीची मिळे प्रेमलीला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।२।।
जयाचा जसा भाव अभ्यंतरीचा ।
तसा लाभ होतो तयासी फलाचा ।
क्रमी मार्ग जो जी परमेश्वराला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।३।।
सकामी पुरे होत संकल्प सारे ।
म्हणोनी कुणी नित्य कर्म स्विकारे ।
सकामी फलेच्छा असे साधकाला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।४।।
चातुर्वर्ण तेही गुणाची त्रयीही ।
जरी निर्मितो तोच सारे तरीही ।
अकर्ता म्हणोनी उरे शेवटाला।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।५।।
नसे बद्ध तो कार्य घडले तरीही ।
न ठेवी फलाची अपेक्षा कधीही ।
असे जाणता जाणितो त्या इशाला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।। ६।।
निषिद्धादि कर्मा विकार्मा विकारी ।
अकर्मा सकर्मात बुजती विचारी ।
म्हणोनी खऱ्या मेळवावे कृतीला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।७।।
अकर्मात जो पाहतो नित्य कर्म ।
दिसे ज्यास कर्मात वसते अकर्म ।
असा बुद्धिमानी सुदैवी निघाला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।८।।
समाधान तो स्वावलंबी समत्वी ।
त्यजूनी फलाला रामे कर्मतत्वी ।
करी कर्म पाही कधी ना फळाला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।९।।
मनाचे मतीचे हि स्वामित्व ज्यास ।
त्यजूनीच तो देत वस्तू उदास ।
नसे पाप जो देह राखी प्रभूला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।१०।।
सुसंतुष्ट जो स्वल्पलाभात होतो ।
कधी मत्सरी ना कधी द्वंद्व करितो ।
न दे तो महत्ता हारण्या जिंकण्याला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।११।।
ब्रह्मरूप अग्नीत हविर्द्रव्य ब्रह्म ।
परब्रह्म कर्मांत लाभ्यांश ब्रह्म ।
ब्रह्मरूप होण्या करी साधनेला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।१२।।
करुनी तपे यज्ञ पूजाविधीला ।
मुनी अर्पिती द्रव्य ते देवतेला ।
परब्रह्म यज्ञी कर्म ते आहुतीला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।१३।।
कुणी टाकिती संयमाग्नीत श्रव्य।
कुणी टाकिती संयमी शब्द द्रव्य ।
जसे ज्यास लाभे तसे आहुतीला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।१४।।
कुणी प्राण रोधून आत्म्यात टाकी ।
समाधिस्त होती कुणी चित्त टाकी ।
असे संयमी होम आत्मोन्नतीला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।१५।।
संशयात नासे मती साधकाची ।
नसे सौख्य स्वर्गात न भूतलाची ।
नसे मोक्ष अश्रद्ध असतो तयाला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।१६।।
ज्ञानकर्मसंन्यास जाणून आता ।
फलत्याग करुनी मती स्थीर होता ।
ज्ञानरूप मार्गे दुरी संशयाला ।
नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।१७।।
राजेंद्र (?) २७ जून १९९९