अध्याय ४ : ज्ञानकर्मसंन्यास योगांतर्गत अवतार मीमांसा
आता सांगे तो माधव कधी अवतार होतो ।
कधी येई धरेवर सगुणात दृश्य होतो ।
जेव्हा घालीतसे साद धरा आर्त या स्वरात ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।१।।
कली माततो जगात होई स्वैराचार रीत ।
जाई स्वधर्म पाताळी चढे अधर्म व्योमात ।
नीच राहतो सुखात राही सज्जन व्यथेत ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।२।।
व्यभिचाराची ना लाज भ्रष्टाचाराची न खंत ।
अर्थ कामाच्या नशेत धर्म मोक्ष हा विस्मृत ।
वाटे मर्दांना आनंद स्वाभिमानाच्या विक्रीत ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।३।।
होई स्त्रियांची बेअब्रू नसे शिक्षका आदर ।
ज्ञानी तपवयोवृद्ध यांचा होई निरादर ।
आईबापाची किंमत जेव्हा होतसे पैशात ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।४।।
मत्त होई राजसत्ता नसे न्यायाचा आधार ।
स्वामी होतसे उन्मत्त छळी प्रजेसी अपार ।
काल कंठती हे जन जीव धरून मुठीत ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।५।।
तुला सुवर्णाच्या होती भांडी चांदीची पुजेस ।
होतो साजुक तुपाचा शुद्ध नैवेद्य देवास ।
कर्मकांडाचा सोहळा भक्ती राहते पोथीत ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।६।।
येतो सज्जन रक्षिण्या येतो दुर्जन मारण्या ।
येतो घेउनि धर्माचा ध्वज पुन्हा उभाविण्या ।
धर्मपालक होउनि येई प्रत्येक युगात ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।। ७।।
जरी अजन्मा अमर्त्य असे प्राचीन पवित्र ।
ह्रास उत्पत्ती स्थिराचा असे संगम विचित्र ।
जेव्हा निर्गुणास लागे गुण रुपाची मदत ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।८।।
राजेंद्र (?) ११ मे १९९९