गीता अध्याय १८ मोक्षसंन्यास योग
अर्जुन म्हणे ऋषीकेशा । त्याग संन्यासाची दशा ।
जाणण्याची मज वांछा । सांगावी केशिनिसुदना ।।१।।
भगवान म्हणती त्याग । आधार जायचा भोग ।
हाच संन्यास विराग । त्याग सर्व कर्म फलाचा ।।२।।
सकाम कर्मासी टाकावे । विद्वान म्हणती मनोभावे ।
यज्ञ दान तपा न सोडावे । ऐसे काही म्हणती ।।३।।
भरतश्रेष्ठा देऊनिया कान । निश्चयाचे माझे मत जाण ।
तीन त्यागांचे वर्णन । शास्त्रे सांगती सारी ।।४।।
त्याग यज्ञ याग तापाचा । करू नये कधी त्यांचा ।
यज्ञ दान तपे महात्म्यांचा । साचा उद्धार होतसे ।।५।।
कर्मे आसक्तिरहित । करावी कर्तव्यबुद्धीसहित ।
हेच माझे उत्तम मत । पार्था जाणून घेई ।।६।।
मोहवश कधी न व्हावे । नियत कर्मासी न सोडावे ।
नित्य कर्मे मोही सुटता । त्याग त्याचा तामसी ।।७।।
शरीरकष्ट होती म्हणून । क्लेशास त्या भिउन ।
देई कर्मास त्यागून । त्याग राजसी तयाचा ।।८।।
नियत कर्मे कर्तव्ये म्हणुनी । करी जो ऐसी कोणी ।
आस फळाची सोडुनी । त्याग सात्विक तयाचा ।।९।।
सत्वगुणी जो सदा रत । न करी शुभाशुभाचे द्वैत ।
असे सर्वदा संशयरहित । ऐसा बुद्धिमान त्यागी ।।१०।।
न त्यागू शके कर्म देहधारी । कार्यरत सदा संसारी ।
परी कर्मफले न अंगिकारी । ऐसा तो खरा त्यागी ।।११।।
इष्टानिष्ट मिश्र ऐसे । तीन प्रकारे फल दिसे ।
मरणांती सर्वां मिळतसे । परी विराग्या न तैसे ।।१२।।
कार्यसिद्धीची कारणे । जी पांच अंगीकारणे ।
त्या ऐकण्या लक्ष देणे । कृष्ण म्हणे महाबाहो ।। १३।।
अधिष्ठान आणि कार्यकर्ता । साधनांची यथा योग्यता ।
प्रयत्नांची अचूकता । पाचवे दैव असे ।।१४।।
याच पांचाकारणाने । शरीर मन वा वाणीने ।
कर्म घडे त्या अनुषंगाने । योग्य अथवा विपरीत ।।१५।।
या पांच कारणा जो विसरे । म्हणे जो कर्तुत्व माझेच सारे ।
ऐशा मुर्खास काहीच खरे । दृष्टीस ना येतसे ।।१६।।
मिथ्या अहंकार जो न धरी । बुद्धी बंधनरहित खरी ।
सर्व लोकांस ठार मारी । परी बंधमुक्त तो ।।१७।।
ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता । तीनही कार्य करणे असता ।
इंद्रिये कर्म आणि कर्ता । कार्माचेही घटक तीन ।।१८।।
त्रिगुण सृष्टीच्या आधारे । ज्ञान कर्म करता अनुसरे ।
प्रकार तीन कैशाप्रकारे । ऐका कृष्ण सांगती ।।१९।।
सर्व जीवांमध्ये अस्तित्व । जाणणे सर्वभूती एकतत्व ।
ऐसे ज्ञान जे मनी तत्व । ज्ञान सात्विक जाणावे ।।२०।।
भिन्न शरीरे भिन्न जीव । ऐसे मानी जे सर्वथैव ।
पाळी भिन्नात्वाचा भाव । ज्ञान राजसी जाणावे ।।२१।।
करी कार्य एकमेव । तया मानुनी सर्वस्व ।
सदा जेथ आसक्तीभाव । ज्ञान तामसी जाणावें ।।२२।।
कर्म जे आसक्तिरहित । रागद्वेषांस करुनी त्यक्त ।
फालाशेच्या व्यतिरिक्त । कर्म सात्विक जाणावे ।।२३।।
फलतृष्णा मनी राखुनी । भाव अहंतेचा ठेउनी ।
करी अतिप्रयास कष्टुनी । कर्म राजसी मानावे ।।२४।।
मोहित कर्म जेंव्हा घडे । शास्त्रबंधनांची आज्ञा मोडे ।
क्लेश हिंसा परपीडा वाढे । कर्म तामसी जाणावे ।। २५।।
भौतिक संगापासुनी मुक्त । मिथ्या अहंकार करी त्यक्त ।
याशापयशी अविचल चीत्त । निश्चयी सात्विक कर्ता ।।२६।।
कर्मफळासी आसक्त । इर्षा हर्ष शोक युक्त ।
अपवित्र विचलित चित्त । प्रसिद्ध राजसी कर्ता ।। २७।।
शास्त्रविरोधी ज्याचे कर्म । हट्ट कपट आळस ज्याचा धर्म ।
अपमाने दुखवी इतरांचे वर्म । ऐसा तामसी कर्ता ।।२८।।
त्रिगुण प्रकृतीच्या अनुषंगे । बुद्धी निश्चयाची तीन अंगे ।
विस्ताराने श्रीकृष्ण सांगे । ऐक म्हणे धनंजया ।।२९।।
प्रवृत्ती निवृत्तीची जाणीव । कार्याकार्याचा भेद भाव ।
भयाभय बंधमोक्षाचा ठाव । जाणी बुद्धी सात्विक ।।३०।।
धर्माधार्माचे अंतर । कार्याकार्याचा विचार ।
न कळे जिया सत्वर । जाणी बुद्धी राजसी ।। ३१।।
जी धर्मा मानी अधर्म । अधर्मासी गणिते धर्म ।
विपरीत मार्गे करी कर्म । जाणी बुद्धी तामसी ।। ३२।।
जो निश्चये झाला स्थिर । योगाभ्यासे खंबीर ।
संयमी मन प्राण शरीर ।निश्चय सात्विक म्हणावा ।।३३।।
जेथे अर्थ कामाचा विचार । धर्मही आसक्ती अनुचर ।
होई फलाशेचा प्रबळ विचार ।निश्चय राजसी म्हणावा ।।३४।।
स्वप्न भय शोकाच्या पुढती । विषादमोहे अडकून मती ।
दुर्विचारी रमे धृती । निश्चय तामसी म्हणावा ।।३५।।
कृष्ण म्हणे भरतर्षभा ।ऐक त्रीसुखांचा गाभा ।
अभ्यासे रमुनी बद्ध उभा । अंत होई दु:खाचा ।।३६।।
आरंभी विषसमान भासे । परी अंती होई अमृतसे ।
स्वरूपसाक्षात्कार घडवीतसे । म्हणावे सुख सात्विक ।।३७।।
इंद्रियविषय संयोगे । सुख हे अमृतची लागे ।
विष उरोन राही मागे । मानावे सुख राजसी ।।३८।।
प्रारंभापासोन अंतापर्यंत ।आत्मा रमे मोही निवांत ।
निद्रा आळस प्रमादजात । म्हणावे सुख तामसी ।।३९।।
भूलोकी वा देवलोकी । अथवा इतरही उच्चलोकी ।
दिसे कुणी ना तो येकी । त्रिगुणातुनि मुक्त जो ।।४०।।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचे । किंवा असो क्षुद्रांचे ।
स्वभावश: ज्याचे त्याचे । वर्ग जाहले गुणांनी ।।४१।।
शांती संयम तपश्चरण । शुचिता शांती पुरस्करण ।
ज्ञान बुद्धी धर्माचरण । गुण ब्राह्मणांचे वर्णिले ।।४२।।
शौर्य तेज दृढनिर्धार । युद्धनेता धैर्यशील उदार ।
घेई जो दक्षता अपार । क्षत्रिय तया वर्णिले ।।४३।।
व्यापार शेती गोपालन । वैश्यांचे स्वभाव वर्णन ।
श्रमयुक्त वर्तन । स्वभाव शूद्रांचे म्हणती ।।४४।।
आपापल्या कर्मस्वभावे । केल्या कर्तव्य प्रभावे ।
मनुष्यप्राणी सिद्धी पावे । कृष्ण म्हणे ते ऐका ।।४५।।
करुनी आपली स्वकर्मे । जो भगवंतपूजेत रमे ।
सिद्धीप्राप्ती स्वधर्मे । मानव करी निश्चित ।।४६।।
स्वकर्मे दोषपूर्ण जरी । परधर्माहूनी निश्चित बरी ।
स्वधर्म कर्मे जो करी । पापकर्म न घडे त्या ।।४७।।
स्वधर्मे सहजी कर्म घडता । दोष त्यामाजी जरी असता ।
टाकू नये तया सर्वार्था । जैसा धूर अग्नीचा ।।४८।।
अनासक्त बुद्धीने राहिला । मन:संयमन करोन ठेला ।
निष्कर्माने भोग टाकिला । पावे संन्यासी परमगती ।।४९।।
नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त जया । ब्रह्मावस्था घडे तया ।
संक्षेपाने ऐक कौंतेया । परमदिव्य ज्ञान हे ।।५०।।
बुद्धीद्वारे शुद्धीयुक्त । दृढनिश्चयी नियमासक्त ।
सर्व इंद्रियविषय त्यक्त । राग द्वेषासी पारखा ।।५१।।
जो एकांतवासे विहरे । कायावाचामनासी आवरे ।
ध्यानयोग समाधी धरे । विरागी मिताहारी हा ।।५२।।
टाकी दंभ बल अहंकार । सोडी कामक्रोध वस्तुस्वीकार ।
ममत्वाचा न करी अंगिकार । शांत ब्रह्मज्ञाना योग्य तो ।।५३।।
प्रसन्न राही जो ब्रह्मीभूत । शोकमुक्त तो आकांशारहित ।
समभाव सर्व प्राणीमात्रात ।लाभे त्या परमभक्ती ।।५४।।
जितुका मी आहे जैसा । भक्तीने जाणे मज तैसा ।
होई तत्वत: ज्ञान माणसा । अंती मिळे भगवंता ।।५५।।
सर्व कर्मे करी हाते । माझ्या पायी मन रमते ।
माझ्या प्रसादे तया मिळते । शाश्वत परमस्थान ते ।।५६।।
बुद्धीने सर्व कर्मे तुझी । अर्पोनी मज चरणामाजी
बुद्धीयोगे भावना तुझी । मत्पदी सदा ठेव तू ।।५७।।
मजप्रती निष्ठा ठेउनी । सर्व संकटे जाशी तरुनी ।
अहंकारे माझे न ऐकुनी । कर्म करिता नष्टसी ।।५८।।
अहंकारापायी या समरी । युद्धा टाळोनी जाशी दुरी ।
सर्व मिथ्या मानुनी जरी । करशील स्वभावे युद्ध तू ।।५९।।
स्वकर्म टाळिसी जरी मोहाने । युद्धास करशील स्वस्वभावाने ।
जो तो बांधला स्वकर्माने । या जगती कौंतेया ।।६०।।
सर्वाभूती ईश्वर । हृदयस्थ बसला परमेश्वर ।
यंत्रवत चालावी शरीर । मायामोही या जगी ।।६१।।
म्हणोनी जा तया शरण । हे भारता आमरण ।
तया प्रसादे लाभे जाण । परमशांती स्थान शाश्वत ।।६२।।
सांगितले ज्ञान जे गुह्यतर । करी तयाचा पूर्ण विचार ।
मग इच्छी तैसा आचार । करी तू भारता ।।६३।।
सांगेन आता गुह्य तुज ।ऐकोनी घे पुन्हा आज ।
कृष्ण म्हणे तू अतिप्रिय मज । म्हणोनी हित सांगतो ।।६४।।
माझ्या मनी मिळवी मना । भक्त होऊनी करी नमना ।
अंती पावसी माझिया स्थाना । प्रतिज्ञा माझी तू सखा ।।६५।।
सर्व धर्माचा त्याग करुनी । शरण मज तू जा झणी ।
सर्व पापे तुझी वारुनि । मोक्ष देईन निश्चित ।।६६।।
तपी नाही भक्त नाही । भक्तीत जो लीन नाही ।
दोष माझे काढी काही । सांगू नये त्या गुह्य हे ।।६७।।
गुह्य हे जो कथन करी । माझी भक्ती शिरोधार्य करी ।
माझ्या हृदयी तो वास करी । जाणे हे नि:संशय ।।६८।।
ऐसा मनुष्य असे या भूती । त्याच्यापरी न कोणावरी प्रीती।
न भूती न भविष्यांती । प्रिय होई मजलागी ।।६९।।
या धर्मसंवादाचा अभ्यास । करील जो करुनी प्रयास ।
माझीच पूजा घडे तयास । कृष्ण म्हणे मत माझे ।।७०।।
जो श्रद्धावान करी श्रवण । मनी द्वेषरहित होऊन ।
मुक्त होई पुण्यवान । शुभलोकी प्राप्त तो ।।७१।।
एकाग्र चित्ताने धनंजया । श्रवण यासी तू केलिया ।
अज्ञान मोह नष्ट झालिया । ऐशी तुझी स्थिती ये ।।७२।।
अर्जुन म्हणे मोह गेला । पुर्वस्मृतीचा आठव झाला ।
तवप्रसादे संशय सरला । करीन कृष्णे कथिल जे ।।७३।।
संजय वदला संवाद ऐसा । कृष्णार्जुनाचा झाला जैसा।
ऐकिला मी वदलो तैसा । अद्भुत रोमहर्षक हा ।।७४।।
व्यासदेवांची कृपा झाली । गुह्याची श्रवणक्रिया घडिली ।
प्रत्यक्ष योगेश्वरे कथिली । परम योग साधला ।।७५।।
संवाद आठवी वेळोवेळा । कृष्णार्जुनाचा अद्भुत आगळा ।
राजन हर्ष दाटे सकळा । पुन:पुन्हा मजसी ।।७६।।
रूप अद्भुत ते घडी घडी । कृष्ण रुपाची ती दिव्य कुडी ।
आठविता मना वाटे गोडी । विस्मये हर्ष दाटतो ।।७७।।
जिथे कृष्ण योगेश्वर । जिथे पार्थ धनुर्धर ।
विजय श्री सामर्थ्य स्थिर । मत माझे त्या स्थळी ।।७८।।
संवाद कृष्णार्जुनाचा । मोक्षसंयास योगाचा ।
कृष्णार्पण करुनी साचा । काव्यानंदे विराम हा ।।७९।।
— राजेंद्र (?) २५ मे २०१५