Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • kavyageeta
  • काव्यगीता अध्याय १७ – श्रद्धात्रय विभाग योग  (ShraddhaTraya Vibhag Yog)

काव्यगीता अध्याय १७ – श्रद्धात्रय विभाग योग  (ShraddhaTraya Vibhag Yog)

by Rajendra Vaishampayan / Friday, 14 January 2011 / Published in kavyageeta
अध्याय १७ : श्रद्धात्रय विभाग योग 
 
तीन तऱ्हांची भक्ती असते कसे तयांसी जाणावे ।
सात्विक राजस तामस त्यांचे प्रकार कैसे वर्णावे ।
कृष्ण सांगती ऐक अर्जुना कसे तयांसी उमजावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।१।।
 
जशी प्रकृती असे जिवाची श्रद्धा तशीच उद्भवते ।
जशा स्वभावे असे जन्मला श्रद्धा तशी तया मिळते ।
देह जसा मिळतसे जिवाला श्रद्धा मिळते त्या भावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।२।।
 
देवा पुजिती सात्विक राजस यक्ष राक्षसांना पुजिती ।
भूत प्रेत तामसी पूजितो जैसी ज्याची मनस्थिती ।
उत्तम आणिक हीन प्रकृती यातिल अंतर जाणावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।३।।
 
दंभ अहंता मिश्रित तप हे कठोरतेने जे करिती ।
शास्त्र सोडुनी उग्रमार्ग तो निष्ठापूर्वक जे धरिती ।
काम क्रोध आसक्तीरत त्या असुर म्हणोनी जाणावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।४।।
 
भक्ती जैसी जया अंतरी उठे भावना त्या तैसी ।
आहाराची तशीच आवड असे स्वभावे मनुजासी ।
यज्ञ दान तप तीन तऱ्हांचे कसे वर्णिती समजावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।५।।
 
स्निग्ध शुद्ध रसयुक्त पूर्णसा सत्वगुणी हा आहार ।
सौख्य बलासी प्रदान करितो आयुष्याला आधार ।
सत्वगुणी जो जनास प्रिय अन हृदयालाही जो भावे।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।६।।
 
आंबट खारट कडू तिखट व शुष्क उष्ण अति आवडते ।
रजोगुणी तो असे तयासी व्याधी दु:खद उद्भवते ।
रजोगुणी आहार सेविता दु:ख लागते भोगावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।७।।
 
निरस नासके उष्टे अथवा अशुद्ध जुनेच शिजलेले ।
दुर्गंधीने भरलेले वा कदान्न म्हणुनी उरलेले ।
जया  आवडे अन्न असे त्या तमोगुणाचा समजावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।। ८।।
 
आहाराच्या तीन तऱ्हा त्यापरी यज्ञ ते तीन गुणी ।
नसे फलाशा सात्विक यज्ञी शुद्धभावना एक मनी ।
शास्त्राधारे यज्ञ करोनी सत्कर्तव्या पाळावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।९।।
 
लौकिक व्हावा म्हणुनी अथवा भौतिक लाभासाठी जो ।
दंभयुक्त तो जाण सर्वथा यज्ञ राजसी असतो तो ।
कृष्ण म्हणे रे भारतश्रेष्ठा ऐशा यज्ञा टाळावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।१०।।
 
शास्त्राविधींची होय उपेक्षा प्रसाद वितरण ना करिती ।
मंत्रोच्चारण घडे तेथ ना नसे दक्षिणा द्विजाप्रती ।
अश्रद्धेने घडती जे ते यज्ञ तामसी वर्णावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।११।।
 
देवद्विजांना प्राज्ञजनांना सद्गुरुचरणांना पुजति ।
आर्जव चित्ती आणि अहिंसा ब्रह्मचर्य जे आचरती ।
शारीरिक तप तया  म्हणावे तसे जीवनी वागावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।१२।।
 
सत्य गोड हितकारक आणिक अनुद्वेगकर शब्द मुखी ।
वेदपठण करण्याचा निश्चित नेम सदाचा जो राखी ।
कृतीस ऐशा वाचिक तप या संज्ञेने संबोधावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।१३।।
 
समाधान सरलता मनी जो आत्मसंयमी गंभीर ।
शुद्धभाव राहती मानसी विचार त्याचे सुंदर ।
ऐसे तप जे मानस घडवी तया मानसिक जाणावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।१४।।
 
आकांशा भौतिक लाभाची नसे जेथ ज्या हृदयात ।
भक्ती असते दिव्य मनी अन ईशसमर्पण कर्मात ।
त्रिविध असे हे सात्विक तप मनुजाच्या चित्ती जाणावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।१५।।
 
मान मिळावा पूजा व्हावी अथवा व्हावा सत्कार ।
दंभ ठेउनी मनात ऐसा तप करितो वारंवार ।
अस्थिर असते क्षणभर टिकते तप राजस थे समजावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।१६।।
 
आत्मदंड देउनी स्वत:ला व्यथित करण्या इतरांना ।
विनाश व्हावा इतरांचा हि इच्छा तप आचारिताना ।
मूर्खपणाचा असे दाखला तप ते तामस जानवे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।१७।।
 
योग्य स्थळी काळाचे अन वेळाचे राखुनिया भान ।
परत फिरोनी मिळेल अथवा होईल माझा सन्मान ।
टाकुनी ऐसा विचार सात्विक दान घडे हे जाणावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।१८।।
 
अडला नडला म्हणुनी कुणाला दान देई जो व्याजाने ।
परतफेडिच्या बोलीने वा नफा करू या इच्छेने ।
संकुचित या वृत्तीचे हे दान राजसी जाणावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।१९।।
 
अयोग्य काळी अयोग्य वेळी अप्रस्तुतशा स्थळी असे ।
अपात्र व्यक्तीसाठी अथवा अनादराने होत असे ।
दान तामसी निश्चित म्हणुनी ऐशा दाना जाणावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।२०।।
 
ॐ तत सत तीन शब्द हे परमसत्य दर्शवितात ।
वेदयुक्त मंत्रांनी ब्राह्मण ब्रह्म वर्णना करतात ।
बह्माची तुष्टी करण्याला यज्ञ समंत्रक योजावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।२१।।
 
परमेशाच्या प्राप्तीसाठी क्रिया यज्ञ तप वा दान ।
ॐकाराच्या प्रारंभाने ब्रह्मवृंद करिती गान ।
वेदशास्त्रसंमत यज्ञांनी ईशतत्व ते उमजावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।२२।।
 
तत शब्दाचा प्रयोग करुनी यज्ञ दान तप साधावे ।
भौतिक माया सोडुनी हा भवसागर उल्लंघुनी जावे ।
यज्ञ दान तप तीन क्रियांनी मोक्ष अंतिम साधावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।२३।।
 
सत शब्दाचा एक अर्थ आकळतो केवळ सद्भावे ।
भक्तिभाव ठेविण्या मनाशी सतशब्दाला योजावे ।
कृष्ण म्हणे रे पार्था सतशब्दाचे महत्व जाणावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।२४।।
 
परब्रह्म संतुष्ट होतसे यज्ञ दान तप मार्गांनी।
या मार्गा सतशब्दाचे संबोधन दिधले सर्वांनी ।
सतशब्दाचा प्रयोग करुनी परब्रह्म ते तोषावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।२५।।
 
श्रद्धा नसता निष्फळ ठरते हवन दान तप व यज्ञ ।
असत अनित्या धरुनी ठेवितो पार्था जन्मभरी अज्ञ ।
व्यर्थ असा हा जन्म मृत्युही व्यर्थ तयांचा समजावे ।
श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।२६।।
 
राजेंद्र (?) १४ जानेवारी २००८ 
  • Tweet

About Rajendra Vaishampayan

What you can read next

काव्यगीता अध्याय २ : सांख्य योग (Sakhkya Yog)
काव्यगीता अध्याय ५ : कर्म संन्यास योग (Karma Sanyaas Yog)
काव्यगीता अध्याय १ : अर्जुनविषाद योग ( Arjun Vishad Yog)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP