आयुष्याचं FMEA- २० सप्टेंबर २०१७

/ / marathi

परवा youtube वर एक विडिओ पाहत होतो. त्यामध्ये वैमानिक अभियांत्रिकी (एरोनॉटिक इंजिनीरिंग) मध्ये काय प्रगती सुरु आहे या बद्दल चर्चा केली होती. अधिक जलद, अधिक ताकदीची, अधिक सुरक्षा असणारी, अधिक प्रवासी घेऊन जाणारी अशी विमानं बाजारात घेऊन येताना विमान कंपन्या किती चाचण्या करतात याचाही थोडा उहापोह त्या व्हिडिओमध्ये केला होता. सुरक्षेचे अतिशय कडक नियम पाळून त्या चाचण्या केलेल्या असतात हे बघताना खूप आश्चर्य वाटलं. आपण आरामात विमानप्रवास करतो पण त्यामागे किती जणांचा आपल्या सुरक्षेच्या दृष्टिने हातभार लागलेला असतो याचा आपल्याला असे विडिओ बघून अंदाज येतो व त्या अभियंत्यांबद्दल कौतुक आणि आदरही दुणावतो.

कुठल्याही प्रणालीचा, विशेषतः सुरक्षा प्रणालीचा विचार करताना FMEA (Failure Mode Effect Analysis) म्हणून एक तंत्र वापरल जातं. या संकल्पनेचा अर्थ असा की एखादी प्रणाली (system) कुठे कोलमडू शकते आणि त्यापासून काय परिणाम होतील याचा विचार करून, त्या प्रणालीत ती कोलमडू नये अशी उपाय योजना त्याच्या नियोजनाचा (डिझाईन प्लॅनिंग) चा भाग म्हणून केली जाते.

हे ऐकल्यावर मला माझी परीक्षेची तयारी आठवली. मी परीक्षेला जाताना तीन नीट चालणारी पेनं बरोबर नेत असे. कारण सगळी पेनं व्यवस्थित चालत आहेत याची जरी खात्री केलेली असली तरी आयत्यावेळी परीक्षेमध्ये एक पेन बंद पडलं किंवा संपलं तर? मग दुसरं वापरता येईल म्हणून जवळ असे . आणि तेही समजा अगदीच काही कारणामुळे बंद पडलं किंवा संपलं तर तिसरं वापरता येईल म्हणून जवळ ठेवलेलं असे. खरं तर दोन व्यवस्थित चालणारी, शाई पूर्ण भरलेली पेनं बंद पडणं किंवा संपणं याची शक्यता खूपच कमी असते पण तरीही मी तीन घेऊन जात असे म्हणजेच मी अनाहुतपणे ‘परीक्षेत घेण्याची काळजी’ या प्रणालीचं FMEA करत होतो. आता प्रश्न असा पडतो की याच विचारशृंखलेमध्ये मी तीन ऐवजी पाच पेनं का नेत नसे? याचं उत्तर असं लक्षात आलं की घटनांची शक्यता, साधनांची उपलब्धता आणि साधनांच्या उपलब्धतेसाठी मोजावी लागणारी किंमत या सगळ्याचा ताळमेळ मनात कुठेतरी होत असे आणि ते गणित तीन पेनांवर संतुलित होत असे.
आचार्य पतंजलींच्या अष्टांगयोगातील ‘अपरिग्रह’ या संकल्पनेचा विचार करताना मला असं कळलं की ‘मला समाधानी जीवन जगण्यासाठी जितकं आवश्यक, ते सोडून इतर गोष्टी न जमवणे म्हणजे अपरिग्रह’. आता मला माझ्या आयुष्यात समाधानी होण्यासाठी किती हवं याचं उत्तर काढताना मी FMEA तंत्र वापरू शकतो का असा विचार मनात आला आणि असं लक्षात आलं की ती संकल्पना वापरून मी माझ्या आयुष्याच्या संदर्भात आणि माझ्यापुरतं ते ठरवू शकतो. माझ्या आयुष्यतील जबाबदाऱ्या, दायित्व आणि माझी परिस्थिती, माझ्या आवडी निवडी, माझ्या इच्छा, माझी स्वप्न, माझ्यावर अवलंबून असणारी नाती या सगळ्या गोष्टींवर मी किती जमवणं आवश्यक आहे हे ठरतं. एकदा माझी आवश्यकता किती या कठीण प्रश्नाचा निकाल लागला की FMEA वापरून काय काय प्रतिकूल घडू शकेल आणि त्यासाठी मला काय तयारी करावी लागेल हे ठरवता येईल. आणि मग मला आयुष्यात जे जे आवश्यक ते जमवायचं आहे त्यासाठी शारीरिक, मानसिक, आर्थिक, आणि आत्मिक शक्ती, वेळ, पैसे, इत्यादी साधनं मला किती लागणार आहेत, इतकंच काय पण अगदी माझ्या संबंधात येणारी कुठली माणसं आणि नाती मला जपायला लागणार आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी मला किती किंमत, की जी फक्त आर्थिक किंमत एवढ्यापुरतीच मर्यादित नसते, मला मोजायला लागणार आहे याचं संतुलन ठरवणं म्हणजेच माझ्या आयुष्याचं FMEA करणं. आणि असं FMEA झाल्यावर अनावश्यक वस्तूच काय पण माणसं आणि अगदी नाती सुद्धा न जमवणं म्हणजे अपरिग्रह हा विचार मनात आला. हा विचार मुद्दाम ठरवून करायचा म्हटलं की स्वतःला कितीही शुष्क किंवा भावनाशुन्य झाल्यासारखं वाटलं तरी अनाहूतपणे कुठेतरी मनामध्ये ही आकडेमोड होत नसते का? आणि ही मानसिक आकडेमोड झाल्याशिवाय ‘मला जीवनात आवश्यक काय आणि किती? ‘ या प्रश्नाचं बऱ्यापैकी योग्य उत्तर मिळणं तरी शक्य आहे का ?
एक मात्र खरं की आयुष्याचं FMEA करताना मला ‘हवं’ किती आणि मला ‘पुरेसं’ किती याचं प्रामाणिक उत्तर मात्र माझं मलाच द्यायचं आहे. आणि मग अशावेळी ओळी सुचतात;
एकच संधी या जन्माचे गाणे सुरेल गाण्यासाठी,
वाद्यमेळ तू जमवू नको रे,
एकतारीही पुरेल तुला,
एकतारीही पुरेल तुला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *