
३.१
लक्ष्मी सरस्वतीला म्हणाली,
“मी असेन तर तुझी कुणालाच गरज नसेल”
सरस्वती उत्तरली,”मी नसेन तर तुला मुळात कुणी ओळखणार कसं?”
३.२
टेक्नॉलॉजिमुळे वृद्ध आईवडीलांशी परदेशातून खूप वेळ व्हिडिओ चॅट करून त्यांना भेटल्याचं मनाचं समाधान तो नेहेमी करून घ्यायचा .
पण त्याच्या आठवणीने पाणावलेले त्याच्या आईवडिलांचे डोळे कधी पुसू शकला नाही तो मोबाईलवरून.
३.३
रस्त्यावर पुस्तक विकणाऱ्या एका पोराला कुणीतरी कुत्सितपणे विचारलं ,”तू विकत असलेल्या पुस्तकाचं महत्व तुला कधी कळणार ?!”
तो उत्तरला, “गाडीमध्ये असणाऱ्यांकडून माणुसकीची वागणूक मिळेल त्या दिवशी !”
३.४
भक्ताने ईश्वराला प्रश्न केला ,” देवा तू सर्वांसाठी सारखा आहेस मग प्रत्येकाची परिस्थिती वेगळी का ?”
ईश्वर म्हणाला ,” प्रत्येकाच्या प्रारब्धाच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ त्यांच्या प्रयत्नांची त्रिज्या ठरवते माझा ‘पाय’ सगळ्यांसाठी सारखाच असतो.”
३.५
एक भक्त देवाला विचारतो,” देवा मी सुखी कधी होईन?
देव उतरतो, “कधीच नाही”
भक्त विचारतो,”असं का देवा?”
देव उत्तरतो,”आजूबाजूला बघ. हा प्रश्न ज्यांना पडतो त्यांना कितीही मिळालं तरी सुखी झालेलं पाहिलं आहेस कधी?”
३.६
एक रसिक एका कवीला विचारतो,”कविता आणि लेख यातला फरक काय?”
कवी उत्तरतो,” लग्नापूर्वी आणि लग्नानंतर जोडप्याच्या प्रेमात जो असतो तोच “
३.७
देवळाबाहेर भीक मागत बसलेल्या एका भिकाऱ्याला एक भक्त विचारतो,” धडधाकट शरीर असताना भीक मागताना लाज नाही का वाटत ? ”
भिकारी उत्तरतो,” देवळाच्या आत देवासमोर तुम्हाला वाटली का?”
३.८
जसजशी हवा मिळाली तसतसा खूप उंचावर गेला पतंग आणि बेभान झाला.
ज्याने त्याचा मांजा हातात धरला होता त्याची एकच टिचकी पुरली त्याला काबूत आणायला.
३.९
एकदा मी फुलांना विचारलं,” एका दिवसाचं आयुष्य असूनही दररोज आनंदानं कसं उमलू शकता तुम्ही?”
फुलं म्हणाली,” उमलल्यानन्तर देवाच्या पायी जाणार की कुणाच्या मढ्यावर याची चिंता उमलताना आम्ही करत नाही म्हणून”
मी विचार केला कर्मयोग यापेक्षा अजून वेगळा काय असतो?
३.१०
एक शिष्य त्याच्या गुरूंना विचारतो,” जीवनाचा खरा अर्थ मला समजावून सांगा.”
गुरुजी म्हणतात,” अरे सोप्पं आहे. उद्या माझ्यासाठी अळवावरच्या मोत्यांची माळ करून आण की लग्गेच तुला सांगतो.”