
अलक ४३.१
गुरुजींनी श्रीमदभगवद्गीतेतील संकल्पना समजावण्यासाठी एका हातात पटवलेली उदबत्ती आणि दुसऱ्या हातात पटवलेली सिगरेट पकडली आणि शिष्यांना म्हणाले,” धूर दोन्हीतून येतोय पण त्यातला फरक समजून घ्या. एक सत्वगुणी आहे आणि एक तमोगुणी. पण तुम्हाला मात्र व्हायचं आहे ते उदबत्ती आणि सिगरेट दोघांनाही एकामागोमाग एक पेटवून आपलं काम करून विझून जाणारी काडी. खरी कर्मयोगी स्थितप्रज्ञ”…
अलक ४३.२
तो अत्तराची रिकामी बाटली पाहत पाहत मला म्हणाला ,”म्हातारपण असं पाहिजे, या रिकाम्या अत्तराच्या बाटली सारखं!” मी विचारलं,”म्हणजे?”
तो उत्तरला,”रिकामं झाल्यावर सुद्धा मंद दरवळणारं”…
अलक ४३.३
पहिल्या पावसाचा पहिला थेंब तिने नीट डबीत बंद करून ठेवला. तो तिला म्हणाला,”अगं वेडे, राहणार आहे का तो? कधीच वळून जाईल”. ती एवढंच म्हणाली,”थेंब वाळू दे की, पण त्याबरोबरची हळुवार आठवण तर साठलेली राहील ना डबीत तशीच?”…
अलक ४३.४
मोहोल्यातलं ते कोपऱ्यावरचं शंभर वर्षे जुनं घरही आज बिल्डरने शेवटी पाडलं आणि शहरातला अजून एक भाग भारतातून इंडियात निघून गेला.
अलक ४३.५
स्पर्धेचं सुवर्णपदक मिळालेल्या एका खेळाडूला पत्रकाराने विचारलं,”तुझ्या यशाचं गमक काय?” तो एवढंच म्हणाला”मी स्पर्धेत भागच घेतला नाही”