
४१.१
मंदिराच्या आत मी मूर्तीसमोर उभा होतो आणि मंदिराबाहेर दाराजवळ तो भिकारी. काय फरक होता आमच्यात? नाही सांगू शकलो मी…
४१.२
मंदिरात सेल्फी घेणाऱ्या एकाला एका लहान मुलाने देवाचा फोटो विकत घ्यायची विनंती केली. “देवाच्या फोटोत देव नसतो” असं त्या मुलाला सांगून त्या सेल्फीवाल्याने फटकारलं. मी माणसातला विरोधाभास पाहून नुसता स्वतःशीच हसलो.
४१.३
माणसाची ज्याच्याशी संगत असते त्याप्रमाणे त्याची किंमत ठरते हे मला समजावण्यासाठी त्याने मला एकच आकडा दोन वेळा कागदावर लिहायला सांगितला आणि मग एका आकड्याच्या डावीकडे डॉलरचं चिन्ह काढलं दुसऱ्या डावीकडे रुपयाचं. पुढे त्याला काहीच समजावं लागलं नाही मी माझं समजलो.
४१.४
एका तत्वज्ञाला एका माणसाने विचारलं,”तुम्ही पूर्वीसारखी समाज प्रबोधनाची प्रवचनं का करीत नाही?”
तत्वज्ञ उतरला,”पूर्वी मी समाजाला सांगितलं की ‘तोंडाला काळं लागलं आहे,आरशात पहा !’, की समाज आरशात बघून ते काळं पुसण्याचा प्रयत्न करायचा. आता मी समाजाला, ‘तोंडाला काळं लागलं आहे आरशात पहा!’ असं म्हटल्यावर समाज आरसाही फोडतो आणि माझं तोंडही !”
४१.५
काही धर्मनिरपेक्ष समाजचिंतकांना सगळीकडे सारखा पाऊस पडतो हे मान्य नाही म्हणे. त्या ऐवजी निवडणूकक्षेत्राच्या समाजबहुल्याचा विचार करून त्या त्या भागात त्या त्या रंगाच्या थेंबांचा पाऊस पाडावा अशी सरकारकडे मागणी करून उपोषणाला बसण्याच्या विचारत आहेत म्हणे…