
३७.१
त्याचं वय झालं होतं. ज्यांनी मानसन्मान दिले त्यांना तो विसरला पण ज्यांनी अपमान केले त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजारसुद्धा विस्मृतीत ढकलू शकला नाही..
३७.२
स्वातंत्र्यसैनिक म्हणून अनेक वेळा कारागृहाच्या फेऱ्या त्याने पचवल्या. पण राहत्या घरात म्हातारपण नावाचं कारागृह मात्र त्याला असह्य झालं होतं…
३७.३
खूपशा आवडी निवडी त्याने म्हातारपणी करू म्हणून राखून ठेवल्या. त्याच्या लक्षात आलं की त्या राखून ठेवल्या म्हणून म्हातारपणच लवकर आलं की त्याला !!
३७.४
त्यानं त्याची कवळी हातात घेतली आणि कवळीकडे पाहून हसून स्वतःशी पुटपुटला “हेच मला माझ्या पूर्ण देहाच्या बाबतीत करता आलं तर ?”…
३७.५
आजही ते दोघे एकत्र बाहेर पडले. नेहेमीच्याच दुकानातून आजोबांनी आजीला गजरा घेतला. थोडे पुन्हा चालत गेले आणि आजोबांनी नेहेमीसारखा आजीच्या डोक्यात गजरा माळला. सगळं नेहेमीसारखच झालं फक्त फरक इतकाच की आज जागा तेवढी बदलली होती आणि आजी अचेतन होती..