
कृपया पुढील कुठल्याही अलक चा संबंध राजकारणाशी जोडू नये. काही व्यक्ती किंवा प्रसंगाशी साम्य हा केवळ नकळत घडलेला योगायोग आहे.
३०.१
आपली एकजूट कशी दाखवायची या विषयावर वाद वाढत जाऊन शेवटी ते एकमेकांच्या उरावर बसले आणि तो प्रश्न त्यांनी परस्पर सामंजस्याने सोडवला.
३०.२
एक तरुण खोलीतून बाहेर आला आणि बाबांना म्हणाला ,”बाबा बाबा !, बघा ना मला माझ्या पायजम्याची नाडीच बांधता येत नाहीये. आता तुम्ही आपल्या कंपनीच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना माझं मार्गदर्शन मिळावं यासाठी ठेवलेल्या मिटींगला मी कसा वेळेवर पोहोचणार?”
३०.३
एक मुलगा आपल्या आईकडे गेला आणि म्हणाला,” आई आई! ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या ओळीचा अर्थ काय?”
आई म्हणाली “अरे सोपं आहे . ‘हे’ देवाघरी गेल्यावर, मी तुला आपल्या कंपनीचा अध्यक्ष केल्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांच्या मनातल्या भावना टिपणाऱ्या ओळी आहेत या !”
३०.४
एका पुतण्याने आपल्या काकांना विचारलं,”भ्रष्टाचार आणि शिष्टाचार यात फरक काय?”
काका म्हणाले “आपलंच काम करण्यासाठी वरचे पैसे मागणं म्हणजे भ्रष्टाचार आणि ते कृत्य उजळ माथ्याने दुसऱ्याला समजावण्याचा प्रयत्न करणं म्हणजे शिष्टाचार”
३०.५
हलवायाच्या दुकानात समोसा बांधत असताना मालक नोकरला म्हणतो,” अरे सामोसे बांधायला ते कोपऱ्यातले वर्तमानपत्राचेच कागद वापर बर का ” नोकर बुचकळ्यात पडलेला पाहून मालक म्हणतो,” अरे घरी येणाऱ्या वर्तमानपत्रातील संपादकीय लेख आहेत ते. वाचकमंडळींच्या रक्ताचं राहू दे, त्या लेखाने सामोसे तरी गरम राहतात का याचा प्रयोग करून बघायचा आहे मला”