
१२.१
त्याने स्वतःच्या फायद्यासाठी खांद्यावरच्या झेंड्यांचे आणि स्वतःचेही रंग बदलले खूप वेळा. या भानगडीत तो इतका बदलला की आता लोकांचं तर सोडाच पण ओळख न पटून त्याच्या घरातलं कुत्रदेखील भुंकतं त्याच्यावर.
१२.२
ज्या धर्मादाय संस्थेच्या कार्यात त्याने इतकं वाहून घेतलं होतं स्वतःला की तो गेल्यानंतर यदाकदाचित संस्थेनं त्याच्या मनाविरुद्ध पण त्याच्या सन्मानार्थ फोटो लावला भिंतीवर तर त्याचं भाडं संस्थेला द्यावं अशी तरतूद केली होती त्याने मृत्युपत्रात.
१२.३
त्याच्या जुन्या कृष्णधवल फोटोंकडे तो पाहत होता तेव्हा त्याला लक्षात आलं की जेव्हा तो फोटो काढला होता तेव्हा त्याचं जीवन मात्र खूप रंगीत होतं.
१२.४
एकदा एक तिरंगा छिन्नविच्छिन्न होऊन पडलेला पाहिला. मी धावत गेलो त्याला हळुवार उचललं आणि विचारलं “काय झालं?” झेंडा म्हणाला,”काल एका नेत्याचं भाषण ऐकलं आणि अख्खा झेंडा माझ्याच रंगाचा हवा असं म्हणून सगळे रंग भांडायला लागले एकमेकांशी”
१२.५
घराला रंग लावायचा म्हणून रंगांच्या दुकानात गेलो. तिथे त्याने माझं नाव कुठल्या रजिस्टर मध्ये टाकू असं विचारलं. माझा गोंधळात पडलेला चेहरा पाहून तो म्हणाला ,” हल्ली रंगावर कॉपीराईट आले आहेत. एका विशिष्ट समाजगटालाच विशिष्ट रंग वापरण्याची मुभा आहे”.