
११.१
त्याला अनंत व्याधी होत्या पण तरीही तो नेहेमी प्रसन्न असायचा. त्याला एकाने विचारलं,”इतक्या आजारातही कसा आनंदी राहू शकतोस तू?” तो म्हणाला,”या आजाराने मला वेदना आणि दुःख यातला फरक शिकवला आणि तेंव्हापासून मी वेदना सहन करूनही आनंदात असतो,”
११.२
एकदा एका दारुड्याचा एका धर्मप्रसारकला धक्का लागला. त्या एका कारणावरून तो धर्मप्रसारक त्या दारुड्याला खूप अद्वातद्वा बोलला. तेव्हा मला लक्षात आलं नशा ही नशा असते. मग ती दारूची तामसी असो वा धर्माची सात्विक.
११.३
तो लहान होता तेव्हा जीवन निश्चिन्त होतं त्याचं. त्याचा गाव त्याला सुंदर वाटायचा आणि गावकरी घरच्यासारखे. गावात वर्तमानपत्र यायला लागलं आणि सगळं चित्रच पालटलं.
११.४
तिचा पती गेल्यावर त्या तरुण विधवेच्या आयुष्यात दोन गोष्टी एकदम बदलल्या. एक म्हणजे तिचा जगाकडे पाहायचा दृष्टिकोन आणि जगाचा तिच्याकडे पाहण्याच्या.
११.५
एका भक्ताने देवाला विनंती केली, “देवा मृत्यूनंतर मुक्ती दे,” देव उत्तरला,”मुक्तीसाठी मृत्यूपर्यंत थांबावं लागतं हे कुणी सांगितलं तुला?”