
अलक ५०.१
त्याला बातमी कळली आणि तो लगोलग सरांच्या घरी पोहोचला. सर तपोवृद्ध तर होतेच , पण वयोवृद्धही होते. कधीतरी ही बातमी अपेक्षित होतीच. तो पोहोचला तेव्हा घराबाहेर लोक जमा झालेच होते.
काय असेल पुढची गोष्ट? सुखांत की दुःखांत ? कारण बातमी पुरस्काराचीही असू शकते किंवा मृत्यूची. तुम्ही कसा विचार केला असता? सकारात्मक की नकारात्मक? का ?
अलक ५०.२
तो विचारात गढून गेला होता. चेहऱ्यावर चिंता होती. अचानक त्याला लांबवर मुलाच्या रडण्याचा आकांत ऐकू झाला. त्याची तंद्री भंगली.
काय असेल पुढची गोष्ट? तुम्ही काय विचार केला असता? सकारात्मक की नकारात्मक? का?
अलक ५०.३
तो परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी कॉलेजमध्ये गेला होता. त्याच्या हातात निकाल पडला. तो निकाल घेऊन तसाच बाहेर पडला रेल्वेच्या पुलावर त्याचे पाय थबकले.
काय असेल पुढची गोष्ट ? तुम्ही कसा विचार केला असता? सकारात्मक की नकारात्मक? का ?
अलक ५०.४
त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ते एकमेकांशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नव्हते. एक दिवस बेल वाजली म्हणून त्याने दार उघडलं समोर ती उभी होती आणि हातात लग्नाची पत्रिका.
काय असेल पुढची गोष्ट? तुम्ही कसा विचार केला असता? का?
अलक ५०.५
तो आता निवृत्त झाला होता. सगळा व्यवसाय मुलाच्या हाती सोपवून मोकळा झाला होता. मृत्युपत्रही करून ठेवलं होतं. आता केवळ बँकेत सह्या बदलणं इतकंच राहिलं होतं. दुसऱ्या दिवशी लगोलग मुलगी आणि जावई घरी आले.
काय असेल पुढची कथा ? तुम्ही कसा विचार कराल? का?
या अलक वाचल्या की मनात येणारे पाहिले प्रामाणिक तरंग म्हणजे वाचकाच्या मानसिकतेचा आरसा म्हणून पाहता येईल. काय वाटतं?