
अलक ४८.१
गाण्यासाठी ‘लाइफटाइम अचिवमेंट अवॉर्ड’ घेऊन तो व्यसपीठावरून खाली उतरला. पत्रकाराने त्याला विचारलं ,” तुम्हाला स्वतःला आज कसं वाटतंय?,
“अपूर्ण आणि म्हणूनच अपराधी” नम्रपणे इतकंच तो म्हणाला…
अलक ४८.२
अमेरिकेत चौथ्या पिढीत जन्माला आलेला एक मुलगा आपलं मूळ शोधण्यासाठी भारतात आला. खूप जणांना विचारलं शेवटी एकाने सांगितलं आपला सगळा कुलवृत्तांत कॅलिफोर्नियाच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये जनिओलॉजि रिसर्च लॅब मध्ये नीट जपून ठेवलाय. तिथेच परत जा. भारतात काहीच मिळणार नाही तुला.
अलक ४८.३
ती अडाणी बाई दिवसभर देवळासमोर फुलं विकायची आणि रात्री त्याच गल्लीत देह. तिला याबद्दल कुणीतरी विचारलं तर ती म्हणाली,”अवो सायेब! फुलं काय अन् ह्ये शरीर काय, काम संपल्यावर निरुपयोगी निर्माल्य होऊन गंगेला जाऊन मिळनार. मी दोन्ही इकते अन् म्हनून माह्या मुलींची सरसोतीची पूजा नीट होत्ये बगा!”
अलक ४८.४
एका स्वयंसेवकाने आपल्या नेत्याला सहज विचारलं समाजकारण आणि राजकारण यात काय फरक आहे? त्यावर तो म्हणाला,” एकाच विचाराची माणसं खोलीत जास्त जमली की समाजकारण होतं आणि ज्यास्त माणसांमधील विचारांची खोली कमी झाली की राजकारण.”
अलक ४८.५
एकदा अचानक गुरुजी शिष्याला म्हणाले,”उपासना आणि साधना यातला फरक नीट लक्षात घे. साध्य मनात ठेवलंस तरच उपासना होईल आणि उपास्य मनात ठेवलंस तरच साधना”