
३९.१
एकुलता एक म्हणून त्यांच्या मुलाला त्यांनी कधीच काही कमी पडू दिलं नाही. पण त्यामुळे आपण कुठे कमी पडलो तर काय करायचं, ही गोष्ट तो मुलगा कधीच शिकू शकला नाही.
३९.२
गर्भश्रीमंत घरातल्या मुलांच्या अर्ध्या होऊन टाकून दिलेल्या पेन्सिली कचरा साफ करणारी मोलकरीण आपल्या मुलांसाठी घरी घेऊन जायची. त्या अशिक्षित मोलकरणीला माहीत होतं हीच अर्धी पेन्सिल तिच्या मुलांना शिक्षणही देईल आणि कष्टाने मिळवलेल्या यशाचं समाधानही..
३९.३
ते दोघे अध्यात्मचर्चा करत बोलत बोलत समुद्रकिनारी फिरत होते. सूर्य अस्तंगत होत होता म्हणून एक जण विषण्ण झाला आणि शामरंगांची उधळण पाहून दुसरा आनंदी. नंतर अध्यात्म चर्चा थांबली कारण एकाला त्याची आवश्यकता नव्हती आणि दुसऱ्याला त्याचा उपयोग नव्हता…
३९.४
त्याच्या घरचं ग्रंथालय खूप मोठं होतं. त्याचा नोकर ते खूप स्वच्छ ठेवायचा. अशिक्षित असल्यामुळे त्या नोकराला त्या ग्रंथांची किंमत कळण्याची लायकी नाही असं तो मालक त्या नोकराला नेहमी हिणवायचा. एकदा घराला आग लागली तेव्हा ऐवज वाचवण्यासाठी मालकाची पावलं वळली तिजोरीकडे आणि नोकराची ग्रंथालयाकडे हे पाहून मात्र मालक मनातल्या मनात खजील झाला…
३९.५
एका गरीब नोकराने आपल्या श्रीमंत मालकाकडे मंदिराला दान देण्यासाठी चार रुपये मागितले. मालक म्हणाला, “तुझी औकात इतकीच. अरे ! मी चांगले हजार रुपये दिलेत मंदिराच्या कामासाठी” त्यावर तो नोकर म्हणाला, “मालक अकरा हजार एकशे एक रुपये पूर्ण करायला मला चार रुपये कमी पडत होते म्हणून माझ्या मजुरीतले कापून द्यायची विनंती करत होतो मी तुम्हाला”…